Reply – आमची गल्ली..
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आमची गल्ली..
— by navin navin
आमची गल्ली, गल्लीच म्हणू शकतो त्याला कारण चाळ म्हणण्यासारखी सुसंस्कृत ती नव्हती. खरेतर प्रत्येकाच्या घरी सकाळी सकाळी एखादे भजन किंवा प्रार्थना असायची पण आमची गल्ली ती तर न्यारीच होती. तुझ्या तिरडीचा बांबू ढासळला ढसाढसा, तुझा मुडदा बसविला नेऊन ह्या सर्व शिव्या ऐकून आमची सकाळ सुरु व्हायची आणि त्या शिव्या नसल्या कि काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे कारण त्याशिवाय सकाळ झाली आहे हे कळायचे नाही आम्हाला. तसे आमच्या गल्ली मध्ये भांडणासाठी काही कारणांची गरज नसायची, कारण दररोज एक ना एक भांडण नक्कीच व्हायची तिथे. आमच्या पूर्ण गल्ली मध्ये फक्त एक सार्वजनिक नळ होता त्यामुळे पाणी भरायला प्रत्येक जण तिथेच येत होते, पाणी जरी पहाटे ५ वाजता येत असेल पण भांड्याच्या रांगा रात्रीपासून तिथे असायच्या आणि एखादे वेळेस चुकून जर भांड्याची अदलाबदली झाली तर मग काही खरे नसायचे असे जोरात भांडण व्हायचे कि काही विचारूच नका. बायका एकमेकांच्या उरावर बसून भांडण करायचे बर त्यातली एखादी पार्टी जर कमजोर असेल तर मग त्यावेळेस दुसरी पार्टी इम्पोर्ट केली जायची, त्यावेळेस असेच काहीतरी चालायचे. मग आमच्यासारखे चिल्ली पिल्ली कमजोर पार्टी चे नातेवाईक म्हणजेच तिच्या नवर्याच्या बहिणीला बोलवून आणणार मग तर खरा खेळ सुरु होणार. खरेच आम्हा सर्वांची हि तर एक खास करमणूक होती, WWF ला पण लाजवेल अशी भांडणे तिथे व्हायची.
दररोज भांडण होत असले तरी प्रत्येक घराचा एकमेकांशी एकोपा खूप असायचा. रमजान ईद ला प्रत्येकाच्या घरी न चुकता खीर आणि गुलगुले असायचे तसेच दिवाळीला प्रत्येकाच्या घरात फराळ पोहोचला जाई. कुणाच्या घरी कुणाला काही झाले तर पूर्ण गल्लीतली लोक तितक्याच प्रेमाने त्यांची काळजी घ्यायचे. त्या काळात मल्टिप्लेक्स असे काही नसायचे, आम्ही सगळे पैसे गोळा करून विडिओ कॅसेट आणायचो, सनम बेवफा, नीलकमल, पिंजरा असे कितीतरी पिक्चर आम्ही विडिओ कॅसेट आणून बघितले त्याची सर खरेच अजूनही कुठल्या मल्टिप्लेक्सला नाही. आमच्या गल्ली मध्ये टीव्ही पण फार कमी लोकांकडे असायचा मग आम्ही सगळे लोक एक एक घर धरून ठेवायचो जिथे आम्हाला टीव्ही बघता येईल, त्या लोकांना आम्ही तिथे आलेले आवडायचे नाही पण म्हणतात ना निर्लज्जम सदा सुखी त्याप्रमाणे आम्ही एका घरातून हाकलले कि दुसऱ्या घरात जाऊन बसायचो. सोनपरी, शाकालका बूम बूम आणि शक्तिमान हे आमचे आवडते कार्यक्रम. शक्तिमान तर इतका आवडायचा कि उठून सुटून फक्त शक्ती शक्ती शक्तिमान हेच गाणे आमच्या तोंडात असायचे आणि मग एखादे वेळेस रात्री जर लाईट गेली कि मग आम्ही सगळी पोर अंधेरा कायम रहे ओरडून पूर्ण गल्लीमध्ये फिरायचो.
त्याकाळात आजच्या सारखे रेडिओ मिरची आणि इतर चॅनेल्स नव्हती, दररोज सकाळी रेडिओ मध्ये विविधभारती असायचे तेच आमचे गाणे ऐकायचे एकमेव साधन होते, दरवेळी त्यात वेगवेगळे गाणे आणि कार्यक्रम असायचे आणि दर महिन्याच्या एक तारखेला मात्र न चुकता 'दिन है सुहाना आज पहिली तारीख है, खुश है जमाना आज पहिली तारीख है, पहिली तारीख है' हे गाणे लागायचे खूप छान वाटायचे त्यावेळेस. खूप सोयीसुविधा नव्हत्या आमच्या गल्लीमध्ये तरीही प्रत्येक जण समाधानी होता, ना कुणी छोटा होता किंवा मोठा होता सगळे एकमेकांना सोबत घेऊन जात होते. जसजसे मोठे होत गेलो तशी गल्ली पण मोठी होत गेली पण माणसे एकमेकांपासून दूर झाली. जिथे पूर्ण गल्ली मध्ये एखादा टीव्ही असायचा तिथे आज सगळ्यांच्या घरी मोठे मोठे टीव्ही, फ्रिज आले. छोटी छोटी म्हणणारी आमची गल्ली पॉश झाली पण हा भांडणे मात्र तशीच आहेत बर का, हा आता शिव्या थोड्या वेगळ्या असतील किंवा भांडणाचे कारण पण वेगळे असतील बाकी सगळे जसे आहे तसेच आहे..