Reply – निराधर
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
निराधर
— by घनश्याम कुदेवाल  अकोला घनश्याम कुदेवाल अकोला
सुर्यदेवतेची किरण आसमंत भेदत पृथ्वीवर पसरली.अब्दुलने अंगावरची फाटकी गोधडी निर्दयतेने बाजूला फेकली व डोळे चोळत तो अम्मीकडे धावला. म्हातारी अंगाचं गाठोड करीत पहुडली होती. त्याने करांगळी म्हातारीच्या नाकाजवळ आडवी धरली श्वास चालू होता. त्याने समाधानाचा सुटकारा टाकला.त्याची बायको सलमा जनावरांचा गोठा साफ करीत होती.त्याची पोरं फाटक्या व मळकट अंथुरनावर अस्तव्यस्त अवस्थेत गाढ झोपली होती. हात पुसत सलमा घरात शिरली.तिने एकदा म्हातारीवर नजर टाकली व डोक्यास हात लावून उकडाव बसलेल्या नवऱ्याकडे पाहत नेहमीप्रमाणे तोंडाचा पट्टा सुरु केला.

“कल रातभर नयीच सोनेदी बुढ्ढीने. अब करो गन्धगी साफ. मेरा नासिबच खोटा है. या अल्ला एक तो बुढ्ढीको मुक्ती दिलादे नही तो मेरेकोच उठाले.’’

दबलेला राग बाहेर काढत ती म्हातारीन जागेवरच केलेली घाण साफ करू लागली. सलमाच्या संतापाचं कारणही होतं. दम्याच्या आजारान त्रस्त म्हातारी रात्रभर झोपत नव्हती व नवरा-बायकोसही जागवत होती.दिवसभर घराचं,शेळ्या-मेंढ्याचं,म्हातारीचं व मुलाचं करून ती  दमून जायची. रात्री झोप लागायला आली की  म्हातारीचा दमा उसळून यायचा व तिच्या झोपेचं खोबरं करायचा.

सलमा म्हातारीच्या मरण्यावर तोंडसुख घेत असली तरी तिचं जगणं जरुरी होतं. कारण जिकाही चार घास सर्वांच्या तोंडात जात होती ती म्हातारीला मिळणाऱ्या पेन्शनमुळे. घराचा आधार होती ती.तशी अब्दुलकडे चार एकर शेती होती पण नावालाच. जमीन खडकाळ व साधारण पोत असलेली होती. त्यात सतत होणारी नापिकीमुळे तो कर्ज बाजारी झाला होता. या वर्षीही निसर्गाच काही खर दिसत नव्हतं ,पेरण्या होऊन महिना उलटला तरी कुठेच पावसाचा मागमूस दिसत नव्हता. परिवाराचा खर्च भागवता भागवता त्याची दमझाक व्हायची. त्यात म्हातारीची तुटपुंजी पण नियमित मिळणारी पेन्शन फार आधार देत होती. पुढचा महिना रमजानचा होता त्या मुळे त्याच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सलमा आता निमुटपणे कामास लागली होती. पोरं एकमेकावर हातपाय टाकून निरागसपणे झोपली होती. त्याला त्याचे बालपण आठवले.

तो दहा वर्षाचा होता.त्याचे अब्बू रेल्वेत गैंगमन म्हणून कामास होते. एक दिवस घात झाला. थंडीच्या दिवसात रेल्वे रुळांच काम चालू असतांना एक इंजिन कामगारांना चिरडत निघून गेलं. धुक्यामुळ ड्राईव्हरला अंदाज आला नाही.त्या दुर्दैवी कामगारात त्याचे अब्बूही होते. अब्दुल पोरका झाला.रेल्वेनं अनुकंपा म्हणून त्याची अम्मी फातीमास दरमहा पेन्शन सुरु केली व सोबत चार एकराचा बंजार तुकडा तिच्या नावे केला.त्या भरोश्यावर त्याच्या अम्मीनं कुंटूबाचा गाडा ओढत आणला होता. पण  म्हातारपण व दबा धरून बसलेल्या दम्यानं डोक वर काढल्यामुळ तिच्यासह सर्व कुंटूब जिकरीस आलं होत.

लहान मुलीच्या रडण्याने त्याची तंद्री भंग पावली.तिचा हात दुसऱ्याच्या पाठीखाली दबला होता. त्याने उठून तिचा हात सोडवला व पोरांवर खेकसत त्यांना झोपेतून उठवले.आज फातीमाची पेन्शन मिळणार होती.त्यावरच महिन्याचा खर्च भागणार होता. तो तयार झाला व सलमास म्हणाला..

“सुनो.. मै तालुका अम्मीकी की पेन्शन लाने जा रहा हुं……कुछ मंगवाना हो तो …..”

पेन्शनचं नाव ऐकताच सलमाची कळी थोडी खुलली. म्हातारीच्या नावानं आजतरी बोटं मोडायला नको होती अस तिला वाटून गेलं. काहीही असलं तरी म्हातारीच्या पेन्शनवर घरखर्च चालला ह्याची जाणीव तिला कुठेतरी होती. तिनं निमुटपणे सामानाची यादी नवऱ्याकडे सोपवली. अब्दुलने पैसे काढण्याच्या फार्मवर झोपलेल्या म्हातारीच्या डाव्या अंगठ्याचा शाई लावून ठसा घेतला व बाहेर पडला.

तालुक्यास जाणारी काळी-पिवळी उभीच होती. त्यात  जनावराप्रमाणे  माणसं आधीच कोंबली होती. तो कसाबसा दाटीवाटीने त्यात बसला.गाडीची चाक हलली त्या सरशी त्याच्या पोटात भीतीचा गोळा आकार घेऊ लागला. बँकेतून पैसे पेन्शन काढन सोप काम नव्हत. म्हातारी आजारी असल्याचा अर्ज लिहून घेण, पुरावा म्हणून डॉक्टरचा दाखला जोडण, नेहमीचा कॅशिअर व साहेब असेल तरच हाती पैसे पडत नाहीतर उगाच हेलपाटा नशिबी यायचा. सुरवातीस साहेब लोक नाकाला रुमाल लावून फातीमाचा  स्वतः डोळ्यादेखत अंगठा घेत मगच अब्दुलच्या हाती पैसे ठेवत.कालांतराने त्या खुराड्यात येण त्यांच्या जीवावर येऊ लागलं तेव्हा हा मार्ग त्यांनी काढला. आज सर्व गोष्टी जुळून आल्यानं कॅशीअरनं करकरीत नोटा त्याच्या हातात सरकावल्या.त्याने नोटा खिशात कोंबल्या व बाहेर पडून जमाखर्चाचा हिशेब करण्यात डोक्याला ताण देऊ लागला.पुढचा महिना रमजानचा होता.खर्च वाढणार होता यातील काही पैसे मागे टाकण जरुरी होत पण सलमानं दिलेली यादी मेळ बसू देत नव्हती.

फातीमाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती.रमजान आठवड्यावर येऊन ठेपला  होता. घरात पैशाची चणचण भासू लागली होती. रमजानचा महिना तिच्या पेन्शनवर साजरा होणार होता. पण तिचा काही नेम दिसत नव्हता.अब्दुलच्या काळजीत भर पडली.म्हातारी जगायला हवी होती तरच तिची पेन्शन हाती लागणार होती. एक एक दिवस त्याला  जात होता तसा तो काळजीन खचत होता.

मध्यरात्र झाली. उद्या म्हातारीची पेन्शन मिळणार होती.पण अब्दुलच्या डोळ्यात झोप कोसो दुर होती.त्याचे मन सैरभर धावत होते.बाहेर मोकाट कुत्रे विचित्र आवाज काढून त्याच्या भितीत भर घालत होती.त्यांनी पोरांकड नजर टाकली. सुरवातीस सरळ झोपलेल्या पोरांनी एकमेंकावर हातपाय टाकण सुरु केलं होत. बायकोही दमुन भागून गाढ झोपली होती. त्याला काही जाणवलं…एक शिरशिरी त्याच्या तळपायातून निघुन त्याच्या मस्तकात भिनली. आपण बराच वेळेपासून अम्मीचा आवाज ऐकला नाही.तो तसाच ताडकन उठला व म्हतारीजवळ जाऊन तोंडावरची गोधडी काढली.तिचं तोंड सताड उघड होत.त्यान तिच्या तोंडावर पंजा धरला श्वास नव्हता.म्हातारी अल्लास प्यारी झाली होती.तो तिथेच डोकं धरून बसला.

विचित्र आवाज काढून रात्र भयाण करणारे श्वान थकून पेंगले होते. रातकिड्यांचा आवाज काय तो  स्मशान शांततेतचं भंग करीत होते. थोड्या वेळाने एक विलक्षण विचार अब्दुलच्या डोक्यात संचारला.उठुन त्याने सलमास हलवलं,पण नवऱ्यास अवेळी पोटाखालची भुक भागवायची या समजुतीने तिने त्याला  झिडकारले.त्याचं आधीच तापलेलं डोकं भडकलं त्यांनी एक सणसणीत हात तिच्या कानशिलात लगावला,तशी ती उठुन बसली व आश्चर्ययुक्त भितीने नवऱ्याकडे पाहू लागली. तिन काही विचारण्या आधी तो म्हणाला…

“ अम्मी नही रही ’’

“ या अल्ला ” ती किंचाळली.

छाती पिटत ती रडण्याचा पवित्रा घेणार तोच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवत दुसऱ्या हाताने चुप राहण्याचा इशारा केला. नवऱ्याच्या विचित्र वागण्याने ती गोंधळली. तो म्हणाला….

“ मेरी बात ध्यान देकर सुनो…. अम्मी नही रही यह बात मेरे तालुकेसे अम्मीकी पेन्शन लेकर  आनेतक किसीको पता नही चलना चहिये…. बच्चो को भी नही…नही तो खानेके लाले पडेंगे…बाद में सोचेंगे क्या करणा है…अम्मी के पास बैठी रहना…ख्याल रखना ..मेरी अम्मी है वो….”

त्याचा गळा दाटून आला.  त्याने महत्प्रयासाने स्वतःस सावरले. गोंधळलेली त्याची बायको भितीने कपात होती.तिची विचार करण्याची शक्ती लोप पावली.ती नवऱ्याचे आदेश पाळू लागली.

सकाळ झाली पण  घरात भितीचं व काळजीचं काळोख होता.तो तालुक्यास बँकेत जाण्याची तयारी करू लागला. म्हातारीच्या पार्थिव शरीरास त्यांने सरळ करून तिचे उघडलेले तोंड बंद केले. तिच्या मृत झालेल्या अंगठ्यास त्यांने  शाई लावून पैसे काढण्याच्या फार्म वर ठसा घेतला. हे पाप आहे..त्याच्या  मनात आलं..त्यांनी अल्लाची क्षमा मागितली. सलमास सावधानतेचा इशारा देत तो निघाला एक अनामिक ओझं काळजावर घेऊन.

मृत शरीराजवळ  एकटीन बसण्याची ही सलमाची पहिलीच वेळ होती.तिन पोरांकडे नजर टाकली. ती गाठ झोपली होती. तिने मोठ्या मुलीकडे पाहिलं तिची छाती आता दिसायला लागली होती. तिला वेगळ झोपवण जरुरी होत पण त्या खुऱ्याडयात जमत नव्हत.अनायसे म्हातारीन जागा खाली करून दिली होती.ती भूतकाळात शिरली…

‘अब्दुल की दुल्हन’ म्हणून ती या घरात आली. घर कसलं…खुराडच ते…त्यात शेळ्या-मेंढ्याचा मल-मूत्राचा घमघमाट….तिचा जीव नकोसा व्हायचा.

“अकेला लडका है राज करेंगी” हेच तिच्या डोक्यात घालून घरच्यांनी तिची या घरात बोळवण केली.

तिची सासु फातिमान मात्र तिच्यावर आई सारखी माया केली. तिचं नेहमी म्हणायची

“तुम्हारे सिवा मेरा हयचं कोण? मै जैसा बोउंगी वैसा फल पाऊन्गी”

सास–सुनेचे एकाच गोष्टी वरून खटके उडायचे.सलमास परिवार लहान ठेवायचा होता पण फातिमा ठामपणे विरोध करायची. ती म्हणायची…

“अरे ये तो अल्ला की देन है..हम कोण होते है भला इसे रोकनेवाले”

अम्मीच्या पाठीब्यान अब्दुलन पाच पोर तिच्या पदरात घातली.हे एक कारण सोडलं तर फातिमान खरोखरच तिला मुलीप्रमाण वागवलं.सलमाही सासुची काळजी घ्यायची. तिचा मान ठेवायची.पण म्हातारीच्या शेवटच्या दिवसात आपण न्याय करू शकलो नाही ही खंत तिला जाणवली. आता सर्व संपलं होत. तिचा गळा दाटून आला.तिने गुडघ्यात तोंड लपवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

अब्दुल काळी-पिवळी जीप मधून खाली उतरला तसा त्याच्या पोटात भितीचा गोळा वेगानं आकार घेऊ लागला. अर्ज रखडून घेऊन तो डॉक्टरकडे गेला. दवाखान्यात गर्दी नव्हती पण पेशंट दिसावे म्हणून डॉक्टरने त्याला वेठीस धरून बसवून ठेवले. अम्मीच्या  आठवणीन तो अस्वस्थ झाला. यावेळेस आपण तिच्या जवळ असायला हवं होत.अर्ध्या तासाने डॉक्टरने बोलवुन दाखला त्याच्या हाती दिला. त्यांनी पन्नासची नोट काढून डॉक्टरच्या समोर धरली. डॉक्टर त्रासिक चेहरा बनवत नोट हातात घेऊन म्हणाला…

“अब इससे काम नही चलेंगा मिया…अगली बार सौ लगेंगे”

“ज ..जी साब” तो चाचरत म्हणाला.

“साला…अगली बार आताच कौन है” तो पुटपुटला

तो बँकेत गेला.साहेब नविन होता पोटातील भितीचा गोळा वेगानं वाढत असल्याची जाणीव त्याला झाली.त्यांनी कागदपत्रे साहेबासमोर ठेवली.साहेबानी ती तपासुन अब्दुलकडे पाहत म्हणाला

“अब कैसी है तबियत?”

“ज …जी साब ठ …ठीक है” तो चाचरत म्हणाला.

“ठीक है कॅशीअर से पैसे ले लो” साहेब म्हणाला

साहेब त्याला भला माणूस वाटला… पण आपण खोट बोलल्याची लाज त्याला वाटली.त्याला ओरडून सांगावसं वाटलं..

“साब मेरी मा मर चुकी है …और मै… बेईमान… उसे छोडकर यहां आया हुं.. कफन खरीदने..उसीके पैसो से…”

भावनावर आवर घालत पैसे घेऊन तो निघाला अम्मीकडे …अब्दुलला पाहताच सलमाने कोंडलेला श्वास मोकळा सोडला व छाती पिटत रडायला लागली….अब्दुलही त्यात सामील झाला.

लोक जमली. म्हातारी काही घटके पूर्वीच अल्लास प्यारी झाल्याचे त्यांना कळले. म्हातारीच्या अंगठ्याची शाई आता  सुकली होती कधीच न उमटण्यासाठी अब्दुलला  निराधार करण्यासाठी.

 

घनश्याम बालचंद कुदेवाल

हिंगणा फाटा ,बाजोरिया-ले-आउट

अकोला – 9975438761