Reply – आठवणीतील संध्याकाळ
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आठवणीतील संध्याकाळ
— by Kasturimitra Kasturimitra
काल संध्याकाळी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी  घराबाहेर पडलो . नियोजनच नसल्यामुळे कोणत्या ठिकाणी जायच याचं काही बंधन नव्हतं . मन जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत जायचं आणि कंटाळा आला कि मागे फिरायचं एवढ मात्र ठरवलं होतं. सवई प्रमाणे पावले आपोआपच रोजच्या वाटेने निघाली. माणसे, गाड्या यांचा सामना करत करत अखेर डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. डोंगरावर जाण्यासाठी असंख्य पायवाट माझी जणू वाट पाहत आहेत असा काही क्षण मला भास झाला. मग त्यातल्या त्यात आपल्याला सोईची अशी पायवाट बघून मी निघालो. पावसाळा असल्यामुळे पायवाटांवर आलेली मलाई थोडा त्रास देत होती. पण डोंगर सर करायचा हे मनाने ठरवल्यामुळे पावलेही कोणाला दाद द्यायला तयार नव्हती. अखेर साऱ्या परीक्षा  देऊन मी डोंगरमाथा गाठला.

हिरवागार शालू नेसलेला डोंगरमाथा पाहून थकवा क्षणात नाहीसा झाला. एका ठिकाणी स्तब्ध उभा राहून सारा परिसर डोळ्याच्या सामावण्याचा प्रयत्न कमी पडतो आहे हे जाणून मी बसण्यासाठी जागा शोधू लागलो. नजरेच्या टप्प्यात एक हिरवगार झाड आणि त्याच्या मुळाशी एक मोठा दगड दिसला. मी कोणताही विचार न करता त्या दिशेने निघालो. उन्हाळ्यात सुकून पडलेली काटेरी झुडपे मध्ये मध्ये त्रास देत होती. पण समोर माझ्यासाठी मांडून ठेवलेलं राजसिंहासन माझी आतुरतेने वाट पाहत आहे हे पाहून नकळत त्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं जात होतं.

झाडाजवळ जाऊन  पोहचताच मी माझ्या सिंहासनाची चहू बाजूने पाहणी करून त्यावर आरूढ झालो. इतक्या वेळा नंतर बसायला मिळाल्यामुळे हे सुख उपभोगताना मला स्वर्ग सुख पण कमीच असावं अस वाटू लागलं. समोर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि त्याच्या माथ्यावर सजलेले काळेभोर मुकुट पाहून एखादा सेनापती आपल्या सैन्याचे प्रतिनिधित्व करत आहे का ? असा मला प्रश्न पडला. दुरून सिहगर्जना करत येणारी पावसाची सर जणू काही हजारो सैन्य घेऊन येणाऱ्या शत्रू सारखी चालून येत होती. वाऱ्या समवेत येणारे धुक्याचे लोण काहीकाळ आपण आकाशातच  बसलो आहोत असे भासवत होते. अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे मी भानावर आलो. अंधार पडण्याआधी डोंगर उतरणे गरजेचं असल्यामुळे मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

हि निसर्गाची किमया पाहून परतीच्या प्रवासात पावले आपोआपच जड होत होती . सुख मिळवण्यासाठी रोज चाललेला अट्टाहास हा किती व्यर्थ आहे हे आज कळून चुकलं . सुख विकत घेता येत नाही ते अनुभवाव लागतं हे मात्र खरं........
प्रणव प्रभू