aadivasi samaj aani mi.....ek anubhav

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

aadivasi samaj aani mi.....ek anubhav

Anamika
वयमने आयोजित केलेल्या शिबिरात जाण्याची उत्सुकता होती , म्हणून मुंबईहून विक्रमगडला जाण्यास निघाले, विक्रमगड पर्यंतचा प्रवास बऱ्यापैकी चांगला झाला. पण पुढे विहेल पाड्याला खासगी गाडीने जाण्याची सोय होती. छोट्या गाडीत ३० माणसे कोंबली जाणार होती. एक-सव्वा तास वाट पाहून माणसे भरल्यावर गाडी निघाली. मुंबईत ५ मिनिटे उशिरा सुटणाऱ्या ट्रेनचा जिथे आपल्याला वैताग येतो तिथे एक तास वाट पाहणाऱ्या आदिवासी लोकांच्या चेहऱ्यावर कंटाळा - राग - वैताग जाणवत नव्हता, कदाचित सवय , अनिवार्यता किंवा सहनशीलता यामुळेच ती लोक शांत असावीत .

विहेल पाड्यापासून अळीव पाड्या पर्यंतचे अर्ध्या तासाचे अंतर पायी चालायचे होते , सवय होती त्रास जाणवला नाही पण मनात विचार आला की विक्रमगड येथे असलेल्या बाजारपेठेत जावून येण्या पर्यंतचे अंतर कापण्यासाठी स्थानिक लोकांना किती वेळ द्यावा लागत असेल?

अखेरीस शिबीर सुरु असलेल्या हॉलमधे पोहचले. जेवण आटपून शिबिराच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. मनरेगा, रोजगार हमी योजना , माहिती अधिकार कायदा , पेसा , दिरंगाई प्रतिबंध कायदा अश्या विविध कायद्यांना प्रत्यक्षात केंव्हा आणि कसा वापरावा याबाबतचे ज्ञान मिळत होते,

नागरिकांचे कर्तव्य आणि हक्क कोणते? याचा नागरिक शास्त्र विषयात ढोबळमानाने केलेला अभ्यास केवळ पाठांतरावर किंवा परीक्षेत उत्तरे लिहिण्यापुरातच होता अस मला जाणवलं ' मी पदवीधर अडाणी आहे ' अस सारख वाटत होत. आपल्या विभागातील स्थानिक प्रशासन योग्यरीत्या काम करत आहे का? एवढही जाणून घेण्याचा जागरूक प्रयत्न कधी केला नाही. शासनाच्या विविध योजना कोणत्या? त्याचा लाभ कोणी आणि कसा घ्यावा याबाबतचे अज्ञान स्वतःचे स्वतःला जाणवत होते. माहितीच्या अधिकाराचा (वज्रास्त्राचा) वापर कधी केलाच नाही! कोठे, केंव्हा आणि कसा करावा याबाबतच माहिती नाही .
शिबिरात विविध अर्जाचे नमुने पहायची सोय होती, अर्ज कसा लिहावा याचे प्रशिक्षण होते. मनात प्रश्नांचे वादळ होते आणि वादळ शमवायला सोबत मिलिंद दादा होता. मनात आल सरकारी योजनांची आपल्याकडे पुरेशी माहिती नसते , त्यांचा आपण लाभ घेत नाही आणि मग प्रशासन सर्व सामान्यांसाठी काहीच करत नाही अशी बोंब ठोकतो.

संध्याकाळी हेतुपूर्वक नियोजित केलेले हॉल बाहेरील अंगणात मजेशीर खेळ खेळण्यात आले , प्रत्येक खेळात नवीन काहीतरी शिकण्यास मिळाले. रात्री जेवण झाल्यावर प्रश्नमंजुषा खेळ खेळलो, आदिवासी समाजातील लोकांची बुद्धिमत्ता आणि अद्यावत ज्ञान प्रशंसेस पात्र होत, तरीही या समाजाचा विकास का झाला नाही असा प्रश्न मनात डोकावला?

रात्री शेजारील कुटुंबासमवेत माझी झोपण्याची सोय झाली होती, त्या कुटुंबांनी 'अतिथी देवो भवं' याची मला प्रचीती दिली. सकाळी उठल्यावर आंघोळीची व्यवस्था पाहू लागले ,घरातल्या काकूंनी आंघोळीसाठी नदीवर जावे लागते असे सांगितले , पण काकूंनी सरपंचांच्या घरी माझ्या आंघोळीची सोय करून दिली.
वाटल की बाथरूम नसल्यामुळे आणि घरापर्यंत पाणी नसल्यामुळे वृद्ध मंडळी, स्त्रिया यांना नदीवर सर्व ऋतूत दररोज उघड्यावर आंघोळ करावी लागते, शेतात उघड्यावर शौचास जावे लागते किती त्रासदायक आहे हे...! आरोग्याबाबत किती गंभीर समस्या उदभवण्याची श्यक्यता आहे. (आज २१ व्या शतकात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला विक्रमगड तालुका त्यात आदिवासी समाज नांदतोय तिथे विद्युत, पाणी , शौचालय , स्थानिक ठिकाणी रोजगार , दळण-वळणाची सोय,संपर्क साधने इ. अनेक बाबतीत मागासलेपणा दिसून आला. )

सरपंचांनी स्व-खर्चाने घरात बनविलेल्या गरम गरम नाचणीच्या भाकऱ्या आणि वांग्याची चविष्ट भाजी आम्हा सगळ्यांसाठी प्रेमाने आणली होती. कृषी अधिकारी , वनपाल यांचे व्याख्यान झाले विविध योजना , सुविधा , सवलती सांगण्यात आल्या .योजना फार छान होत्या.सत्र संपल आणि जेवण आटपून मी मिलिंद दादाशी चर्चा करू लागले.

प्रशासनाने हात पुढे कराव आणि आदिवासी समाजाने हात पकडून पुढे येवून प्रगतीपथावर सोबत वाटचाल करावी अस सरळ-सोप्प वाटत असलं तरी तितकस सहज-सुलभ-जलद होणारे हे कार्य नाही कारण झोपलेल्या माणसाला उठवण फार सोप्प पण, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना कस उठवाव? म्हणजे गरजवंताच्या गरजा पूर्ण करता येतील पण गरजांची जाणीव निर्माण करणं हे तितकच महान कार्य आहे.
त्यामुळे, सोई उपलब्धता निर्माण करणे, योजना सांगणे , सवलती देणे , मदत करणे , दान (?) देणे याची आदिवासी समाजाला खरी गरज नसून आदिवासी समाजात गरजांची जाणीव निर्माण करणे, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणे, बुद्धीला चालना देणे , विचारांना पडताळता येणे , स्वच्छता आणि आरोग्याच्या चांगल्या सोई रुजवणे , स्वावलंबी बनविणे, व्यसनापासून दूर नेणे , कौशल्यांचा विकास साधणे, वनसंपदेवरीलचे हक्क मिळवून देणे अश्या बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे आणि
वयम चळवळ याबाबतचेच कार्य करते.

शेवटी सर्वांचा निरोप घेवून आदिवासी समाजातील लोकांच्या डोळ्यांतून आणि आपुलकीच्या भाषेतून जाणवलेले प्रेम हृदयात साठवून मी मुंबईच्या वाटेने परतीच्या प्रवासासाठी निघाले.