होळी

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

होळी

harshada
होळी

नुकतीच होळी झाली आणि सोबत थंडीही सरत चालली होती, पण अजुन मनावरचा होळीचा रंग उतरायला तयार नव्हता. सोसयटीची होळी नेह्मीच जोषत असायची अगदी होळीला सजवण्यापासुन तीच्याभोवती मनमोकळ्या बोंबा मारण्यापर्यतचे सगळे सोपस्कार मनसोक्त साजरे होत. सा‍र्याय आयाबाया रांगोळ्यांपासुन पुजेपर्यंत सारं सांभाळतं आणि आम्ही मुलंही यथशक्ती यथामती मदत करायचो. सारी पिल्लावळ जवळपास एकाच वयाची त्यामुळे धमाल यायची. एरवी अभ्यासाला दहालाच मिटणारे आमचे डोळे रात्री बाराला होळी लावून घरी झोपायला गेलो तरी आठवणींनी जागे असायचे आणि मग दुसया रात दिवशीच्या धुळवडीचे प्लॅन मनात आखतं आखतं केव्हातरी  झोप लागयची.
        गेले पाच वर्ष या सार्याा प्रकाराला मी मुकलो होतो. बारावीनंतर मेडीकलसाठी पुण्याला गेलो आणि सारंच मागे पडलं. बाबांनीही पुण्याला बदली करुन घेतली त्यामुळे परत गावाला यायचा संबंधच आला नाही. अधुनमधुन भेटी व्हायच्या कोणीतरी ओळखीचे काका, मामा, आत्या भेटायच्या सार्यांहची चौकशी करायच्या. कुणीतरी गॅंगमधलंही भेटायचं मग नवीन मोबाइल नंबरची देवाणघेवाण व्हायची पण एखादं दुसर्या  दिवाळी नुतन वर्षाच्या शुभेच्छा व्यतीरिक्त फारसं काही घडायचं नाही. त्यातल्या त्यात आईची दोन-तीन महीन्यांनी फेरी असायची तेव्हा सार्यांीची खुशाली कळायची.
        आज पाच वर्षांनी मी होळीसमोर उभा होतो अगदी त्रयस्थासारखा. अजुनही तीच पळापळ होती पण चेहरे नवे होते, काही ओळखीचे असुनपण अनोळखी! प्रत्येकजण आपल्याच धुंदीत आपल्याच कामात. मीही एका आडोश्याला शांतपणे उभा होतो. होळीजवळ विषेश गर्दी नव्हती. टेपरेकॉर्डर सध्या गाजणारी गाणी रेकत होता. होता.थेट माळाच्या बांधापर्यंत रोषणाई केली होती, काही चिल्लीपील्ली उगीच इकडून तिकडून धावत होती. मी सारं पहात पूर्वीचे दिवस आठवतं होतो. अचानक खांद्यावर कुणाची तरी थाप पडली मी एकदम दचकलो. त्या किट्ट अंधारातून एक हसरा चेहरा स्पष्ट व्हायला लागला पण मला ओळखायला मात्र एक क्षण गेला. ‘विशाल!’ आमच्या गॅंगमधला एक मित्र अतिशय अवली नी अखंड बडबड्या. आमच्या घराच्या मागच्या गल्लीत रहायचा, आमची अगदी गट्टी नसली तरी कधी वाद पण झाले नाही. “काय राव ! ओळखलं की नाही?” या त्याच्या प्रश्नाने मी एकदम फ्लॅशबॅकमधून बाहेर आलो.” विश्या! साल्या केस सरले तुझे एवढ्यात?” तसा तो मनसोक्त हसला अगदी पूर्वीसारखा “ अरे आता एका पोराचा बाप झालो मी. छप्पराचं म्हणशील तर बायको आणि सुपुत्र याला जवाबदार. तुझं काय चाललयं? तुझी प्रॅक्टीस कशी चालू आहे? आणि इकडे केव्हा आलास?” “ अरे कालचं आलो, मोठया काकांची तब्येत बरी नसते म्हणून त्यांना चेकअपसाठी पुण्याला न्यायला आलोय आणि माझं म्हणशील एकदम छान चालू आहे. अजून पुर्ण डॉक्टर झालो नसलो तरी आमचा फॅमिली डॉक्टर झालोय.” “ ग्रेट! अरे आपली रुचापण पुण्यातचं आहे सध्या. जॉब करतेय तिथे हडपसरला असते. मोठया काकूंनी तिला तुमचा पत्ता दिला होता पण  ती माहीत आहे ना घुमी एक नंबरची.Technosys मध्ये असते. अरे या engineers च आयुष्य बरबाद, जेमतेम घरी येते शनिवारी येते आणि रविवारी लगेच पळते. बरं उदया घरी ये मी वाट पाहीन.” मी मानेनच होकार दिला,तो हसत निघून गेला. मीही घरी परतायचं ठरवलं, मनावर एक विचित्र ताण आल्यासारखं वाटलं कारण कळत नव्हतं पण अस्वस्थ वाटत होतं.
        “ अरे सिद्धू एवढयात आलास पण? होळीजवळ बायका जमल्यात काय रे?” काकूंनी घरात शिरता शिरताच प्रश्न केला.” नाही काकू, लहान मुलांव्यतिरिक्त कोणी नाही. मीही कंटाळून परत आलो.” इतक्यात आई बाहेर आली,” अरे सिद्धार्थ, वृषाचा फोन आला होता. तीने कमीत कमी डझनभर वेळा कॉल केले असतील. तू मोबाईल कसा विसरून गेलास? आधी तिला कॉल कर बाबा.” मी झटकन आत गेलो मोबाईलवर वृषाचे खरोखर 10 एक मिस कॉल होते. वृषाली जाम वैतागली असणार. मी झटकन तीला कॉल केला, रिंग होण्याआधीच मॅडमनी उचलला म्हणजे मनापासून शिव्या ऐकाव्या लागणार. “काय रे? कितीदा फोन करायचे? कमीत कमी जिथे जातो तिथे घेवुन जाता यावा म्हणून लोक मोबाईल घेतात. मी इथे कीती टेंशन मध्ये होते माहीत आहे? काकूंचा फोन लागत नाही, शेवटी काकांना लावला तर तोहि out of coverage! नशीब माझं की काकूंनी तू कुठेतरी फेकलेल्या फोनची रींग ऐकली आणि माझ्याशी बोलल्या.” “अगं हो, हो! सॉरी बाबा. मी होळीजवळ गेलो होतो, लगेच येणार म्ह्णून फोन नेला नाही आणि अचानक एक जुना मित्र भेटला त्याच्याशी बोलत राहीलो आणि वेळ झाला. आता ओरडतचं बसणार की का फोन केला ते पण सांगणार आहेस?”
“हे तुझं explanation नेह्मी तयार असतं ना? ठिक आहे आम्हाला आपली आठवण आली म्हणून फोन केल. तु आज बाईकवर एकटाच गेलास म्ह्णून काळ्जी वाटतं होती. घरी पोह्चल्यावर फोन लावेन म्ह्णालास आणि नेह्मीप्रमाणे विसरलास. I miss you lot. परत केव्हा येणार आहेस? इथे खुप बोअर होतयं यार. लवकर ये ना”
“ हो गं सोन्या, उद्या इथुन निघु. कदचित दुपारनंतर निघणं शक्य होईल. काकांना नी मोठ्या काकूंना घेवून येतोय. मी बाईक वर येईन बाकी सगळे गाडीने येतील, ते निघाले की मीही निघेन. निघताना आठवणीने फोन करेन. Now Good night sweet dreams” तिकडून वृषालीने एक गोड उसासा टाकला आणि  good night म्ह्णून फोन बंद केला.
        वृषाली माझ्यासोबत मेडीकल कॉलेजला होती. आम्ही दोघं एकाच गृपमध्ये वावरयचो. अतिशय आगावू पोरांच्या गँगमध्ये वृषा आणि समिधा दोघीच मुली.वृषा अगदी बिनधास्त नी मोकळी , तिच्या वागण्याला शोभेस तीच रूप गोरी नितळ त्वचा, करारी नजर, नी सॉलिड ruff tuff attitude. आमच्या दोघांची मैत्री प्रेमात कधी बदलली हे आम्हालाही कळ्लं नाही. जेव्हा लास्ट इयरला तिने मला प्रपोज केल तेव्हा मी चक्क बावळटासारखा बावचळ्लो होतो. त्यावेळी काय उत्तर दिल मलाच आठवत नाही पण आमची मैत्री संपली आणि गृपपासून वेगळं रहाणं, एकांतात गप्पा मारणं ही प्रेमात पडल्याची लक्षणं सुरु झाली. अर्थात कधी ना कधी या गोष्टी घरी लक्षात येणार होत्याच आणि झालही तसचं. सर्वप्रथम ही गोष्ट आमच्या मॉंसाहेबांनी ताडली. तशी वृषा आमच्या गॅंगसोबत आधीही घरी यायची पण आता तीचं अतिसभ्य वागणं, आईला जास्तीत जास्त Impress करायचा प्रयत्न करणं सारं आईला जाणवायला लागलं. आईचे खोचक प्रश्न मलाही समजायचे पण घरी सारं सांगायचं धाडस नव्हतं. हळूहळू आईनेही हार मानली आणि विरोध वा उपरोध न दाखवता ती सारं सामंजस्यानं घ्यायला लागली. कदाचित तीला विश्वास असेल आपला पोरगा आज ना उद्या सांगेल. मी आणि वृषा गावभर हिंडत नसल्याने या प्रकाराची आमच्या ग्रुपशिवाय कुणालाच कल्पना नव्हती. मी internship करु लागल्यावर बाबांनी आणि काकांनी एकदा मला वेगळं घेतलं आणि वृषाली बद्द्ल सरळ सरळ विचारलं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं मला ती आवडते पण मी लग्नाचा विचार अजुन केला नाही. तसं काही ठरलचं तरं तुम्हालाच सागणारं. ते प्रकरणं तात्पुरतं पडद्याआड गेलं. सारे गृहीत धरुन चालू लागले की आम्हां दोघांच एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही settle झालो की लग्न करणार. पण खरं सागायचं तर मी स्वत: याबाबतीत थोडा confuse होतो.
        आज धुळवडीचा दिवस होता, सकाळी बाहेरच्या गोंगाटाने मला एकदम जाग आली. खिडकीतून बाहेर डोकावलं तर पोरापोरींची गॅंग रंगात न्हावून निघाली होती. सोसायटीतल्या जवळ जवळ प्रत्येकालाच रंगात भिजवत चालली होती. कुणाचेच चेहरे ओळखु येत नव्हते. मला खिडकीत उभं पाहुन गर्दीतल्या कुणीतरी हात उंच करुन हॅलो केलं. मी अर्थात त्याला ओळखलं नाही पण कोणीतरी ओळखीच असेल म्हणून मीही हॅलो केलं. त्याने इशा‍‍‍र्या नेच मला बाहेर बोलावलं. मी अगदी नम्रपणे हात जोडून आज नको सांगितलं. ती गॅंग पुढे सरकली तसा मी खिडकी लावून वळलो नी समोर मघाचा रंगबेरंगी माणुस ! मी दोन मिनिट दचकलो. त्याचे दोन्ही हात रंगाने भरले होते आणि काही कळायच्या आत मी गुलाबी, निळा, हिरवा असा रंगबेरंगी झालो. त्याने ‘सिद्धार्थ’ म्हणुन कडकडून मिठीच मारली. मी अजुनही शॉकमध्येच होतो. पाठीवर जोरदार धपाटा घालुन तो बोलता झाल,” साल्या काल आलास तर एक फोन नाही करता येत?” “निख्या!” म्ह्णुन मी पण त्याला कडकडून भेटलो. अगदी भरतभेटीचा प्रसंग झाला. निखिल सोमण माझा बालमित्र अगदी जिगरी यार, आता जिगरी बोलताना मलाच लाज वाटतं होती कारण पुण्याला गेल्यापासुन त्याने केलेल्या अनेक कॉल ना उत्तर देण्याव्यतिरिक्त मी काहीच केलं नव्हतं मी. पण तो आहे तसाच आहे अजुन तीच अंगकाठी, तेच मोकळं बोलणं नी तोच पाठीवरचा दणका. आज खुप मस्त वाटतं होतं अगदी सहज चालता चालता बालपणं भेटावं तस झालं. तश्याच रंगबेरंगी अवस्थेत आम्ही भरपूर गप्पा मारल्या. सगळ्या जुन्या आठवणी उफाळून आल्या. अचानक तो म्हणाला ‘ यार सिदड्या, ती धुळवड आठवते का रे जाम राडे झाले होते रुचावरुन?” रुचा ऐकल्यावर माझ्या छातीत एकदम धस्स झालं. कालच्या अस्वस्थतेच कारण गवसल होतं. मी विषय बदलला पण मनातून तो प्रसंग पुसला गेला नव्हता, आता फक्त जखमेवरची खपली निघाली होती. चार पाच चहा ढोसल्यावर अखेर माझ्या आंघोळीला परवानगी दिली नी त्याचा नवा नंबर माझ्या मोबाईलमध्ये स्टोअर करायला घेतला.”फोन कर रे आळश्या! तू नाही केलास तर मी करेनच” हेही वर ठेवून साहेबांनी निरोप घेतला पण जाताना एक कडकडून मिठी नी पाठीवर धपाटा घालायला विसरला नाही. दुपारच्या जेवणानंतर सगळे निघालो. जेष्ठ मंडळींना गाडीत बसवलं त्यांच्या ढिगभर सुचना हेलमेटवर झेलत मी पण गाडीला किक मारली. बाईक बाहेर निघालीच होती इतक्यात समोरुन विशाल आला.” काय रे! निघालास ? अरे मी वाट पहात होतो.अरे रुचा पण भेटली असती आणि आज स्पेशली पोळ्यांचा बेत होता.” “अरे सॉरी आज नको पण जरा घाई आहे. काकांची तब्येत तर माहीत आहे तुला त्यांना चेक-अपसाठी न्यायचयं त्याआधी आज हॉस्पिटलला जावून सगळं सेट करायचयं. पण पुढच्या खेपेस नक्की येईन.” “ I can understand! Its ok.पण पुढच्या वेळेला उचलून नेईन.” आम्ही हसत हात मिळवले नी मी निरोप घेतला. पण मघाचा भुंगा परत पोखरु लागला.
        रुचा ! मागच्या गल्लीतल्या बंगलावजा घरात राहणारी एक मुलगी. शांत खर तर घुमी, अगदी नाकासमोर चालणारी. वळ्सा वाचवायला म्ह्णुन रुचा आणि तीची मैत्रीण निकिता अगदी लहानपणापासुन आमच्या गेटमधुन पलिकडे जायच्या. जाताना ती कंपाउंडला उगवलेल्या कागडा नी अबोलीच्या फुलांवर हळूवार हात फिरवत जायची. आई, काकू तीला कितीदा म्हणायच्या ‘ अगं रुचा, घे ना फुलं आवडतातं ना तुला’ पण ती खाली झुकवलेली मान आणखी खाली घालुन’ नको काकू झाडावरचं छान दिसतात’ असं सांगून निघुन जायची. तीची शाळा क्लास मधुन यायची नी माझी जायची वेळ एकच होती पण ना तिने ना मी कधी मान वर करुन पाहील. शाळेतून परत येताना तीच्या निकिता नावच्या सख्या मैत्रीणीला दहा दहा वेळा वळून मात्र पहायचो. रुचाची आतुरतेने वाट पहायचं ते एकमेव कारणं होतं.
        दरवर्षी होळीला रात्री करमणूकीचे छोटे छोटे कार्यक्रम असतं. आयाबायांसाठी रांगोळी, पाककला स्पर्धा, चिल्ल्यापिल्ल्यांसाठी नाच आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा. होळी लावायच्या आधी बक्षिस वाटप असे. त्या वर्षी मी आणि माझी ग़ॅंग अगदी पहील्या रांगेत होतो. कुणी भुत बनलं होतं, तर कुणी दाढी मिशी लावुन साईबाबा बनलं होतं. आम्ही त्या मेकअप मागची माणसं ओळखण्याचं नी चिडवण्याचं काम करत होतो. अचानक डोक्याला फेटा, कमरेला तलवार, पाठीला झोळी, कपाळावर मोठी चंद्र्कोर आणि डोळ्यात विलक्षण करारीपणा घेवुन एक मुलगी आली. कमरेची तलवार उपसून “ मै अपनी झांसी नही दुंगी !” हे अश्या काही आवेशाने म्ह्णाली की सरकन काटा आला. ही राणी लक्ष्मीबाई रुचा आहे हे कळल्यावर आमची तोंड सताड उघडी पडली. ही ही रुचा! मान खाली घालुन माझ्या दारावरुन फुलांवरुन ह्ळुवार हात फिरवत जाणारी घुमी रुचा कुठे नी तापवून सलाखुन निघालेल्या सोन्यासारखी लखलखणारी ही राणी लक्ष्मीबाई कुठे ! काही मेळचं नव्हता. त्या वर्षीची Best fancy dress, Best Rangoli, Best Student ची सारी बक्षिस आपल्या खिश्यात घालुन गेली ती बया!
        दुसयास आ  दिवशी धुळवड होती, आज मी ठरवुनचं टाकल होत आज रुचाला बोलती करायची निकितशी पण बोलता येणार होत. वाटेकडे डोळे लावून बसलो होतो सोबत निखिलपण होता.तो तर माझ्या सगळ्या पापांचा भागीदार होता. दोघीजणी गेट उघडून आत आल्या. निकिता आधीच गुलाबी त्यात गुलालाने रंगली होती कसली भारी दिसत होती. रुचा झाशीच्या राणीतून परत घुमी रुचा झाली होती. मी मागच्या दारातून समोर आलो, आई-काकू कुणी नाही याची खात्री केली. रुचासमोर उभा राहीलो ,”हाय रुचा,Happy Holi”. नुस्त्या माझ्या आवाजाने ती मुळापासुन दचकली आणि तीच्या रीअॅ क्शन ने माझी घाबरगुंडी उडाली. पण मी लगेच सावरलं निकिता स्वत:हुन पुढे आली माझ्या गालाला रंग लावून म्ह्णाली Happy Holi मला परत धीर आला खिश्यात लपवलेली रंगाची पुडी काढुन तीला रंग लावला. Solid हात कापत होता माझा. रुचा शांत उभी होती जणु ती नाहीच तिथे! मी माझा स्वप्नरंजनातुन बाहेर आलो, रुचाजवळ जावून तिच्याही गालाला रंग लावला. का कुणास ठाउक पण एक शहारा आला. काहीतरी वेगळं, काहीतरी विचित्र ! ती नाजुक हसली नी पहिल्यांदाच तीच्या गालावर हसताना खळी पडते ते कळलं. रुचानेही Happy Holi म्हटलं पण रंग नाही लावला. तीचा आवाज एवढा नाजुक नी गोड आहे याची कल्पनाच नव्ह्ती. त्या दोघी सहज निघुन गेल्या आणि मी भारावल्यासारखा तिथेच उभा होतो अगदी निखिलने धपाटा घालून माझी ध्यानसमाधी मोडेपर्यंत.
“सही यार! त्या निकिताने रंग लावला तुला! शिट यार मला पण त्याच वेळी पाणी ढोसायला जायची बुद्धी व्हावी! धुतं तीच्या मारी! काय बोलली रे ती?” “ Happy Holi” मी परत हरवत चाललो होतो पण आता त्या स्वप्नात निकिता नव्ह्ती रुचा होती. मी पार चक्राउन गेलो होतो. निखिल मला पटवून देत होता निकिता जी कुणालाच भाव देत नाही तिने मला रंग लावला. “साल्या तेरी तो गाडी निकल पडी”. पण मी मात्र रुचाने न लावलेल्या रंगात भिजलो होतो. तिचा तो आवाज ! काहीतरी वेगळं घडतं होतं.
Page 3
        आज काल मी रोज जाणून बुजून उशीरा निघायचो, केवळ तीची भेट व्हावी, तीला बघता यावं. ती तशीच फुलांवरुन हळुवार हात फिरवतं शांतपणे निघुन जायची माझी दखलही न घेता. निकिता मात्र रेंगाळायची, कधी माझ्याधी बोलायला तर कधी आईशी बोलायला. रुचा मागच्या गेटजवळ गेली की वळुन तीला विचारायची “निकि तुला वेळ लागणार असेल तर मी निघु?”. तिचं येवढं बोलणंही ह्वं हवं वाटायचं. कधी कधी आईशी पण गप्पा मारायची पण बाजुला असलेलो मी तीला दिसायचो नाही. मी माझी देवघरातली स्टडी रुम फ्रेश हवा मिळावी म्हणुन टेरेसवर हलवली खर तर त्या फ्रेश हवेपेक्षा मागच्या बंगल्याच्या खिडकीतुन दिसणारा चेहरा हवा होता. माझी बारावीची तयारी सुरु झाली होती. मला काळजी नव्हती, माझं भविष्य सेट होतं. कॉलेजच्या toppers मध्ये मी मोडायचो. मला डॉक्टर व्हायचं होतं. बाबांचा जिगरी दोस्त पुण्याच्या प्रसिद्ध मेडीकल कॉलेजच्या संचालकपदी होते त्यामुळे बारावी नंतर पुणे जणु फिक्स होत.
        आता रुचा आणि निकिता पण माझ्या कॉलेजला होत्या.मी कॉलेजच्या सगळ्यात आगावु नी all rounder पोरापोरींच्या ग्रुपमध्ये होतो,त्यामुळे प्रत्येकजण आमच्याकडे फार कौतुकाने बघायचा.निकिता तर उगीच नोटस् माग, प्रोब्लेम विचार, guidance देशील का वै . विचारुन हैराण करायची. पण माझं पुर्ण लक्ष रुचावर असायचं ती फारशी बदलली नव्हती पण आताशी गालावरची खळी वरचेवर खुलु लागली होती. सतत हातात कसलंना कसलं पुस्तक नी मॅडमचे लक्ष त्यात. मी निकिताचा छ्ळवाद सहन करेपर्यंत ती शांतपणे बाजुच्या बेंचवर काहीतरी वाचत नाही तर लिहीत बसलेली असायची. माझ्या हाय ला हाय नी हॅलो ला हॅलो या व्यतीरिक्त काही बोलणचं नाही. एकदा मी धीर करुन तीला विचारलं,” रुचा, integration चे प्रोब्लेम तुला hard जातात असं निकि म्हणाली होती, मी तीला explain करतोय तुलाही हवं तर ये” त्यावर ती फक्त हसली आणि शेजारी येवुन बसली. माझी कानशील उगीच तापल्यासारखी झाली, हात कापायला लागले आणि डोकं पार सुन्नं झालं, काही आठवेच ना! ह्र्द्याची धडधड तर इतकी वाढली की आता बाहेर येतयं की काय असं वाटलं.तीने वही ओढुन घेतली आणि प्रोब्लेम दोन मिनिटात सोडवून म्हणाली,” कालचं विशूदादाने समजावलं पण तुही छान explain करतोस.” मी पण च्यायला कुणाला शिकवत होतो दहावीला बोर्डात आलेल्या पोरीला! मी फक्त ओशाळ्वाणं ह्सलो.
        या वर्षीची होळी बरीच थंड होती, एकतर सोसायटीतल्या निम्म्या मुलांची बारावीची परिक्षा तोंडावर आलेली आणि या वर्षी थंडीने पण कहर गाठला होता. होळीचं उत्साही मंडळच अभ्यासात गर्क असल्यामुळे होळी पार थंडावली होती. पण मी मात्र पेटलो होतो. एक वर्ष झालं तरी माझी गाडी hi hello च्या पुढे सरकतच नव्हती आणि आता फार वेळही नव्हता.काही महीन्यातच माझ्या पुण्याच्या तिकीटावर स्टॅम्प बसणार, मग रुचा कशी भेटणार? मला तिच्याशी खुप बोलायचं होतं.तीला सांगायचं होतं तु ह्सतेस तेव्हा खुप छान दिसतेस. तीच्या अबोल्याच कारणं विचारायचं होतं. तिच्याशी खुप खुप गप्पा मारायच्या होत्या. विशू माझ्या गॅंगमधला खास माणुस होता पण त्याचाही उपयोग मला रुचाशी बोलण्यासाठी होणार नव्ह्ता. ही दोन सख्खी भांवड अशी दोन टोकाची कशी?विशाल केवढा मोकळा नी बोलका आणि रुचा तेवढीच नाजुक नी अबोल! होळीच्या साक्षीनं मी ठरवलं रुचाशी बोलायचं कसही. मी निखिलला गाठलं. त्याला खेचत बाजुला नेलं. “ निख्या, आता फक्त दोन महीने रहीलेत मग मी पुण्याला, मला कसही करुन तीच्याशी एकटीशी बोलायचयं” “अरे मग प्रॉब्लेम काय आहे? ती तर नुस्ती तुझ्या पुढे मागे असते! तुझ्याशी बोलायचय असं सांग फक्त धावत येईल लगेच.” मी क्षणभर दचकलो मग ट्युब पेटली हा सायबा निकिताबद्द्ल बोलतोय. मी त्याचा दंड पकडला ,” निख्या, नीट ऐक मला निकिताशी नाही रुचाशी बोलायचयं” या वाक्यावर त्याला जोरदार ढसका लागला. “ निख्या खरचं मला रुचाशी बोलायचयं खुप काही. तीला सांगायचंय तीच्या हसण्यात जादु आहे. तीचा आवाज खुप गोड आहे.” मला मध्येच थांबवत निखिल म्हणाला,” सिद्द्या संमंधा जागा हो. तुझा track चुकतोय. तुला निकिता आवडते रुचा नाही. आयला तुम्ही दोघं एक अक्षरही बोलला नाहीत कधी मग प्रेम आणि direct propose!” त्याच्या शेवटच्या शब्दांवर मीही ठेचकाळलो प्रेम आणि प्रपोज ! अरे प्रेम काय? मला फक्त तीच्याशी बोलावसं वाटणं म्ह्णजे काय प्रेम नाही आणि प्रपोज तर नक्कीच नाही हा निख्या पण ना! “ निख्या, उगीच वाटेलं ते बोलु नकोस प्रेम नी प्रपोज काय?मी फक्त तीच्याशी बोलायचं म्ह्णालो. मला मदत करणार आहेस की नाही ते सांग?” मी रागाने म्ह्णालो.
निखिल बराच वेळ माझा अंत पहात शांतपणे उभा होता, अखेर वत्सा तुज प्रत कल्याण असो अश्या आर्वीभावात त्याने मदतीच आश्वासन दिलं. निखिलवर माझा पुर्ण विश्वास होता त्याला या विषयात खुप गती होती त्यामुळे मी निर्धास्त होतो.होळी पेटताना ती समोर उभी होती. निख्याने कमीतकमी 100 वेळा मला ढोसलं असेल आणि कसली कसली गाणी म्हटली असतील. एक क्षण वाटलं याला उचलून होळीत टाकावा.
        रात्रभर डोळा लागतं नव्हता. उद्या काय बोलायचं, कसं बोलायचं ? अखेर तीन चार तास झगडल्यानंतर कधीतरी झोप लागली. सकाळी गोड स्वप्नांऐवजी पाठीवरच्या जोरदार धपाट्याने जाग आली.निखिल आणि कोण ! अर्ध्या विजारीत विठोबासारखा कमरेवर हात ठेवुन उभा होता या पुंडलिकाच्या उठण्याची वाट पहात.” निर्लज माणसा, इथे मी सकाळी सहाला उठुन तुझ्या मिशनची तयारी करतोय नी तू आठ वाजले तरी झोपा काढतोस?”मी त्याचा उगारलेला हात पाठीवर पडण्याआधी उठुन बसलो नी दोन्ही हात जोडून प्रामाणिक नमस्कार केला. माझ्या नमस्कारामुळे की उठुन बसण्यामुळे त्याने आपले हात हवेत झटकून खिश्यात टाकले आणि थेट माझ्या कानाजवळ येवुन पुटपुटला,” सिद्धया, आज ग्रह तुझ्या पाठीशी आहेत रुचापण धुळवड खेळयला बाहेर आलेय. चल लवकर.” माझ्या अंगावर शहारा आला. मी झटझट उरकून बाहेर पडलो. बाहेरच्या त्या रंगबेरंगी गर्दीत रुचाला ओळ्खणं फार कठिण नव्ह्तं, तीला पाहता क्षणी माझी कानशील गरम झाली. मी जवळजवळ थरथरत्या हाताने तीला रंग लावला. ती गोड हसली आणि मला रंग लावला त्या क्षणी जर मला कोणी विचारलं असतं ‘ जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ तर मी माझी छाती ठोकुन सांगितलं असतं ‘मीच’. निख्याने जोरदार शिटी हाणली आणि मला शुद्धीवर आणलं.’ रुचा, तु खुप छान दिसतेस आज.’ एवढंच बोलायच होत पण शब्द घश्यातच अडकले नी ‘रुचा,छान रंग Happy Holi ! ‘असं काही तरी बावळटासारख बरळलो. ती पुन्हा हसली आणि “Happy Holi सिद्धार्थ” बोलून निघुन गेली. एवढं अवघड का असतं कुणाला सांगणं मला तू आवडतेस? किती साधे शब्द. मनातल सांगावसं वाटणं हे चुकीच का? मला ती फक्त आवडते हे सांगायला एवढा वेळ नी एवढं टेंशन!

Page 4
अगदी दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत आम्ही होळी खेळत होतो. मी जेव्हा जेव्हा तीच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो तेव्हा कोणीतरी तडमडायचं. मी वेळेसोबत हताश होऊ लागलो. आईचा दोनदा निरोप येवून गेला होता शेवटी निघणं भाग होतं, मी निराश मनाने परतलो.दुपारी  अचानक दारावरची बेल वाजली, आई- काकू दोघीही झोपल्या होत्या. बाबा किंवा काका एवढ्या लवकर येण शक्य नव्हतं. नक्की निखिल असणार. मला रुचाशी बोलायला जमत नाही म्हटल्यावर ‘हात तुझ्या मारी’ असे भाव चेहया नि वर आणुन मला डोळयांनीच दटावलं होतं. आता सगळं लेक्चर ऐकायला लागणार. मी वैतागतच दार उघडलं, हातात नावाला घेतलेल पुस्तक गळुन पडलं. समोर रुचा उभी होती.नाजुकसं हसुन म्हणाली,”एक प्रोब्लेम होता वेळ आहे का?” वेळ रुचासाठी ! भरपुर आहे.मी फक्त मान डोलावली. बेलच्या आवाजाने काकू उठुन आली. “अगं बाई रुचा का? मी म्हटलं कोण आलं दुपारी? “ “ काही नाही काकू दोन दिवसांनी exam आहे ना. एक प्रॉब्लेम अडला म्हणून सिद्धार्थची मदत हवी होती.” “ असं होय सिद्दु सांग रे तीला” असं बोलुन काकू अंर्तधान पावली.’सिद्धार्थ !’ कीती गोड वाटल हिच्या तोंडून ऐकताना, मी उगाचच लाजलो. ती हॉलमध्ये बसली मी आलोच सांगुन आत पळालो देवाला साष्टांग नमस्कार घातला नी साकड घातलं सांभाळ रे बाबा. परत आलो तर ती पुस्तक मांडून बसली होती म्हणजे ती खरोखर प्रोब्लेमच समजावुन घ्यायला आली होती. मी माझी निराशा लपवत मी तीच्या बाजुला सुरक्षित अंतर ठेवून बसलो.हात-पाय थंड पडले होते, छातीचा आता लोहाराचा भाता झाला होता. थोडसं खाकरुन मी तिला समजावून देवु लागलो. हळूहळू मोकळ वाटायला लागलं. काहीवेळा तर ती चक्क माझ्या फुटकळ विनोदांवर हसलीही तीच्या हसण्याने माझा धीरही परत येउ लागला. आताशा खुप छान वाटू लागलं college च्या गमती जमती, सरांची टिंगल आणि अस बरचं काही आपोआप सुचायला लागलं. कश्यावरुन तरी ती खळखळून हसली, मी एकटक तीच्याकडे पहात राहिलो अगदी तीला जाणवेपर्यंत.ती एकदम लाजली आणि खाली पाहु लागली मी हळूच म्हटलं,” तू हसताना खुप छान दिसतेस रुचा.” तीने झटकन माझ्याकडे पाहीलं. तीच्या नजरेत खुप काही होतं अविश्वास, भीती, राग आणि बरचं काही. मला तीची प्रतिक्रिया कळतचं नव्ह्ती. तीने शांतपणे पुस्तकं गोळा केली. “Thank You Siddharth!”, अतिशय थंड आवाजात म्ह्णुन दार उघडून निघुन गेली. त्या Thank You Siddharth मध्ये Thank You सोडून बाकी सारं होतं. एक झणझणीत कानफटात मारावी तशी Thank You मारुन ती गेली. त्या दिवसापासुन तीचं आमच्या दारावरुन जाणं बंद झालं. कॉलेजमध्ये निकितासोबत ती नसायची. मी एकदा न रहावून निकिताला विचारलं त्यावर तीने फक्त खांदे उडवून माहीत नाही, ती हल्ली माझ्यासोबत नसते एवढंच सांगितलं. मी इच्छा असुन पण रुचाला सरळ विचारण्याची हिम्मत करु शकलो नाही. तीच्या नजरेसमोर उभी रहायची हिम्मत नव्हती ती नजरेनेच उभी जाळेल असं वाटायचं.
        निखिलला सगळं रामायण सांगितल्यावर ‘धुत्तं तुझ्या जिंदगानीवर साल्या’ असचं ऐकायला मिळेल याचीच अपेक्षा होती त्याने काही अगदीच निराश नाही केलं. जेवढं म्हणून घालून पाडून बोलता येईल तेवढं त्याने मनसोक्त बोलून घेतलं. माझी हुशारी कशी फक्त पुस्तकी आहे,रुचा कशी माझ्या टाइपची नाही, मी निकितालाच कसं पटवायला हव होतं वगैरे वगैरे सार बोलुन घेतलं. माझ्याजवळ ऐकण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नव्हता. मी हळूहळू सारं विसरण्याचा प्रयत्न करु लागलो. अभ्यासात सार मन रमवायला लागलो. माझं ध्येय तसही स्पष्ट असल्यामुळे मी लवकर सार्याज गोष्टी दूर लोटल्या.कधीतरी तीला पाहील कि वाटायचं तीच्याशी बोलाव त्यादिवशीच्या तीच्या वागण्याचं कारणं विचारावं.
        “घरी पोहचल्यापासुन पहातेय अगदी हरवल्यासारखा दिसतोस. सगळ ठिक आहे ना रे? वृषालीशी काही भांडण वै झालं नाही ना? सांग रे बाबा कसलं टेंशन आहे?” आई क कधी बाजुला येउन बसली कळलचं नाही. \
“माझ्या प्रतेक टेंशनला वृषाच कारणीभुत असते असं ठरवून टाकलसं का तू? “ मी एकदम तीच्यावर ओरडलो. ती दचकून मागे सरकली, मला एकदम ओशाळल्या सारख झालं. मी तीच्या मांडीवर डोक ठेवलं तीने आपोआप सवईने थोपटायला सुरुवात केली. तीचे पाणावलेले डोळे बघुन मला खुप लाज वाटली, तीचा हात पकडून तीला म्हणालो,” अगं उद्या काकांचा चेकअपम आहे त्याचा विचार करत होतो. बर्यापच वर्षांनी घरी गेलो बरीच जुनी माणसं भेटली, बर्याचच जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून शांत होतो बाकी काही नाही. तू नको काळ्जी करुस ग येवढी.” आई हलकेच हसली नी परत थोपटू लागली. त्या लईत काहीतरी जादू होती मला लगेच झोप लागली. पण स्वप्नात बरचं काही येत होतं रंगबेरंगी, होळीच्या ज्वाळा, कंपाउडची फुलं त्यावरुन तरंगत जाणारी रुचा, वृषा आणि बरचं काही.....
Page 5
आजची सकाळ टेंशनवालीच ठरली. काकांना Cancer detect झाला.Initial Stage वर होता तरी पण treatment साठी पुण्यातचं ठेवायचा मी आग्रह केला.घरातले सगळेच हादरले होते, काकूने तर रडून रडून डोळे सुजवले होते. काकांना नी बाबांना मानसिक आधार द्यायचा , आईला नी काकूला समजवायचं काम करत होतो. अचानक खुप मोठ झाल्यासारख वाटायला लागलं. काका वरवर कितीही हिम्मत दाखवत असले तरी आतून पार तुटले होते. सगळं काही ठिक होवू शकतं हे माहीत असुनही परत परत कंठ दाटुन येत होता. काका- काकुंचा एकुलता एक सुपुत्र म्हणजे माझा सख्खा चुलत भाउ गेले आठ वर्ष लंडनमध्ये होता पण त्याने एकदाही मागे वळून त्या दोघांची चौकशी केली नाही. आजही त्याला केवळ औपचारीकता म्हणुन फोन करुन मी सगळ सांगितलं. त्यावर त्याच उत्तर तयार होत,”पप्पांना मुंबईला ने, बेस्ट हॉस्पिटलला treatment करु, तु पैशाची काळ्जी करु नकोस मला लगेच येणं शक्य नाही पण मी येईन लवकरच.” मला त्याला ओरडून सांगावस वाटलं त्यांना तुझा पैसा नकोय तू हवा आहेस पण नाही बोलू शकलो. त्या दोघांना खोटचं सांगितल दादा येणार आहे लवकरच. त्यावर काका थंडपणे म्हणाले,’ तु आहेस की!’ त्यांची ती विश्वासाची थाप खुप आधार देवुन गेली.हो काका मी आहे.
लहानपणापासुनच काका- काकूंनी माझे खुप लाड केले. दादा शिकायला बाहेर नी मी घरात सगळ्यात लहान त्यामुळे सगळयांचाच लाडोबा. आई- बाबांएवढाच मी काकांच्या जवळ होतो. त्यांच्या आजारपणाने मीही हादरलो होतो. डॉक्टर म्हणून मला या आजाराची वाईट बाजुही माहीत होती पण काकांचा माझ्यावरचा आणि माझ्या निर्णयावरचा विश्वास मला उभारी दयायचा. त्या दिवसापासून मी माझी internship सांभाळत सगळ्या डॉक्टरर्सकडे धावत होतो, काकांना सगळ्यात चांगली treatment मिळेल याची काळजी घेत होतो. आताशी सार घर सावरलं होतं, सारे कंबर कसून आल्या परिस्थितीला तोंड देत होते.chemotherapy सुरु झाली, काकांची अवस्था फार वाईट होती. त्यांना प्रचंड त्रास होत होता पण केवळ घरातले खचतील या भीतीने ते सार सहन करत होते.रोज रात्री मी आणि बाबा त्यांच्याजवळ बसायचो आणि खुप गप्पा मारयचो अगदी त्यांना झोप लागे पर्यंत.लांबलांबच्या नातेवाईकांची तर रांगच लागली होती. त्यांच चुकचुकणं ऐकल की ओरडावस वाटे ‘ते ठिक आहेत, उगीच खोटी सहानभुती दाखवु नका.’ एवढ्या दिवसात दादाचा फक्त एकदाच फोन आला. काय काय treatment कुठे कुठे देवु शकतो यावर एक बौद्धीक घेवुन, आपल्याला लगेच येणं शक्य नाहि पण बाबाच्या account ला पैसे जमा केलेत सांगुन फोन बंद केला.
एवढे दिवस मला काकांव्यतीरिक्त कुठलीच गोष्ट मला महत्वाची वाटत नव्हती. वृषाचा रोज फोन यायचा, काकांची चौकशी करायला आणि कधी कधी कुरबुरायची मी तीला वेळ देत नाही म्हणून. गेले महीनाभर असचं चालू होत.
काल वृषाचा वाढदिवस होता नी कालच काकांची chemotherapy होती, त्या गडबडीत मी साफ विसरुन गेलो.आज सकाळ सकाळ वृषाचा फोन आला, ती जाम वैतागलेली होती. “ सिद्ध,काल माझा Birthday होता, सगळ्यांनी wish केलं.मी रात्रीपासुन वेडयासारखी तुझ्या कॉलची वाट पहात होते, पण तुझा call आला नाही...you don’t care for me anymore.”
“ I am sorry baby, काल काकांच session होतं. मी आणि बाबा पुर्ण वेळ तिथेच होतो, त्या गडबडीत विसरुन गेलो. I am really sorry yaar, extremely sorry ..” मी सावरण्याचा प्रयत्न केला. पण ती खुप भडकलेली होती,” काका, काका, काका! सिद्ध, आजकाल त्यांच्या पुढे तुला काही दिसतचं नाही. गेल्या महीन्यात तुझ्या 15 दिवसांच्या वर सुट्या झाल्यात. तु अजुन intern आहेस सिद्ध! तुझ अख्खं career depend आहे यावर आणि तुला फक्त काका दिसतात! गेले महीनाभर आपण धडपणे बोललो पण नाही बाहेर जाणं तर लांबच राहील. तुझं सारं विश्व त्या काका- काकींच्या भोवतीच संपलय आणि त्यांचा सख्खा मुलगा तिथे लंडन मध्ये मस्त मजेत बसलाय तुझ्या डोक्यावर ओझ देउन.”
“वृषा!” माझाही आवाज चढला होता.
” एकतर माझे काका-काकु माझ्यासाठी ओझं नाहीत ती माझी जवाबदारी आहे आणि दुसरं तु उगीच माझ्या करियरची काळजी करु नकोस मी पाहिन काय करायचं ते. या पुढे मला कॉल करु नकोस. Thank you”, मी रागाने फोन ठेवला पण मला अगदी अंगातल त्राण गेल्यासारखं झालं. अश्या अडचणीच्या काळात मला मानसिक आधाराची गरज होती आणि वृषाच्या आजच्या बोलण्यानं मी फार दुखावलो होतो. त्यानंतर तीचे अनेक सॉरी मेसेज आले. मी 30 एक मेसेज नंतर ‘Its Ok, I am sorry too’ असा रिप्याय केला. ‘I love you Sid ‘  असा मेसेज लगेच आला एरवी मीही त्याला ‘love you too’ असा रिप्याय दिला असता पण आज फोन बंद करुन काकांजवळ जाउन बसलो.
संकट आली कि कशी चहुबाजुनी येतात. वृषालीशी बोलणं पार खुंटल होतं, काकांचे उपचार चालु होते आणि त्यातच अचानक आईला Thyphiod झाला. इतकया दिवस तीने ताप अंगावर काढला होता शेवटी चक्कर आली तेव्हा जबरदस्ती तिला अॅशड्मिट केलं. आमची खरी धावपळ सुरु झाली. मला सुट्टी घेणं कठिण झालं होतं, बाबा 15 दिवसांच्या टुरवर होते. आई माझ्याच हॉस्पिटल मध्ये होती त्यामुळे दिवसभराचा प्रश्न नव्हता पण घराची आणि काकांची सारी जवाबदारी काकुंवर येउन पडली.
        काकांची आज Chemo होती, काकु काकांसोबत गेली. मला आईजवळ थांबण भाग होत. तीच ब्लड प्रेशर वाढलं म्ह्णुन तीला ICU मध्ये हलवलं. आईला नुकतीच शांत झोप लागली होती, ताप आटोक्यात होता. मी माझी डयुटी तिथेच मागुन घेतली होती. राऊंड मारुन आल्यावर तीच्या बाजुला येऊन बसलो. सगळ्या दगदगीने पार थकलो होतो. अचानक खांद्यावर कुणाचीतरी थाप पडली, मी चमकुन वर पाहीलं.
‘विशाल!’ ,माझ्या चेहया.  पवर नकळतं हसु आलं. त्याने ह्ळु आवाजात विचारलं,” काकु कश्या आहेत?”
“आता ठीक आहे आत्ताच झोप लागलेय.” त्याने एक टिफिन हातात दिला,” हा तुझ्यासाठी, काकुंसाठी पथ्याच पण आहेत त्यात उठल्या की गरम करुन दे. आनंदकाकांना घरी भेटायला आलो तर काकुंबद्दल कळलं. रुचा काका काकुंसोबत गेलेय, येईल संध्याकाळी इकडे आणि हो तु आनंदकाकांची काळजी करु नकोस मी त्यांना घरी सोडेन. तु येईपर्यंत मी थांबेन.” मी डोळे विस्फारुन सारं ऐकत होतो. तो बराचवेळ थांबला मला बळेबळे जेवायला लावलं. त्याच तस येणं मला खुप धीर देवून गेलं. मी त्याला Thank You म्ह्णायला तोंड उघडलं पण गळ्यात आंढवा दाटला. मी फक्त त्याला मिठी मारली.
        संध्याकाळी मी स्टाफरुममध्ये काही रीपोर्टच काम उरकत होतो तितक्यात शंकरकाका सांगायला आले,” डॉक्टर तुमच्या आईंनी बोलावलय.” मी हातातली काम माझ्या सोबतच्या डॉक्टरला देवुन ICU त गेलो. आईच्या शेजारी टेबलवर एक तरुणी पाठमोरी बसली होती. माझी छाती धडधडायला लागली मला माहीत होत ती रुचा आहे. किती वर्षाने मी तीला पाहणार होतो. पण आजही तीच्याकडे पहायची हिम्मत होती माझ्यात?
Page 6
        मला पहाताच आई म्हणाली,” अगं हा बघ सिद्दु पण आला. बघ रे रुचा आलेय.” ती हसत उभी राहीली आणि शेकहॅँडसाठी हात पुढे केला. मी पार अवघडून गेलो होतो, मीही हात पुढे करुन शेकहॅँड केला. ती पुन्हा मोकळं हसली.किती बदलली होती ती या काही वर्षात तीचे केस थेट कमरेखाली गेले होते, गालावरची खळी आणखी खोल झाली होती. डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास, एकदम झाशीची राणी आठवली.
“कसा आहेस सिद्धार्थ?” तीने हलकेच विचारलं.
“मी, मी मजेत. तू कशी आहेस? आणि टिफिनसाठी Thank you” ती फक्त हसली. माझी कानशील पुन्हा गरम झाली. मी त्या दोघींच्या बाजुला उभा होतो, पण पुर्वीसारखी माझी दखलही न घेता दोघिंच्या गप्पा सुरु होत्या. मीही उगीच इतर पेशंट पहात बिझी असल्याच भासवतं होतो पण नजर परत परत तीच्याकडे वळत होती. किती सहज होती ती जणू मधल्या काळात काही झालचं नाही. आईच्या औषधांची वेळ झाली तसा मी त्या दोघींजवळ गेलो.
“सिद्धार्थ, तुझे डयुटी अवर्स संपले असतील ना तु घरी जा. मी थांबते काकुंजवळ”
स्वत:च्या खांद्यावरची पिशवी दाखवत म्हणाली,” मी रात्रीही थांबते इथे तू घरी जाऊन आराम कर. किती थकलेला दिसतोस. Don’t worry, मी आहे इथे.”
“ अगं खरचं त्याची गरज नाही. मलाही इथे आठपर्यंतच थांबता येत आणि ICU मध्ये तसही कोणाला रहायची गरज नसते. “
“ हो रे बाळा, रुचा अगं तु बोल्लीस तेच खुप आहे. किती करशील तुही! सिद्ध, तु रुचाला घरी घेवुन जा विशालपण आहे ना. आता बरी आहे मी गं”
मी आणि रुचाने फक्त मान डोलावली. मी माझी काम उरकुन येईपर्यंत रुचा आईजवळ बसली होती. औषधांमुळे आईला शांत झोप लागली होती. मी रुचाच्या बाजुला जावुन उभा राहीलो तीने वर पाहीलं. “निघायचं? आई झोपलेय मी डॉ. निलेशला सांगितलयं, तीला उठवत नाही.”
रुचाने हसुन मान डोलावली.
        आज माझ्या शेजारी गाडित रुचा होती. त्याही अवस्थेत मी मनातल्या मनात देवाला पुण्याच्या ट्रफिकबद्दल धन्यवाद दिले. आज माझ्या मनावर कसलाही ताण नव्हता, खुप हलकं वाटतं होतं. सगळं कसं स्वच्छ आणि मोकळं जणु आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो. खुप मनापासुन आम्ही गप्पा मारत होतो. मी जाणूनबुजून जुन्या आठवणी टाळतं होतो. आज अगदी छान वाटतं होतं. अचानक आठवून ती म्हणाली,” सिद्धार्थ, एक confession करायचं होतं. May I?” मी चमकून तीच्याकडे पाहीलं. ती गालात खटयाळ हसत माझ्याकडेच पहात होती. ‘Confession!’  बापरे या शब्दालाच मी फार घाबरतो. माझी धडधड मलाच ऐकु येण्याइतकी वाढली. त्या एका क्षणात माझ्या डोक्यात काय काय विचार येवुन गेले.
“सिद्धार्थ, तुला माहितच आहे विशुदादा खुप बोलका, हुशार त्यात तो वंशाचा दिवा त्यामुळे आई आजीचा तो प्रचंड लाडका. मी आमच्या घरातली सगळ्यात दुर्लक्षित व्यक्ती. पण मला त्याची सवय झाली होती. मी माझ्या विश्वात खुष होते. निकि माझी जिवश्यकंठश्य मैत्रीण होती. मला नेहमी वाटायचं तीला जगातल्या सगळ्यात बेस्ट गोष्टी मिळाल्या पाहीजेत. तू जेव्हा निकिला वळून वळून पहायचास तेव्हा मलाच गुदगुल्या व्हायच्या. तुझं आणि निकिच जमावं असं खुप वाटायचं. धुळवडीला जेव्हा तु तिच्याशी बोल्लास तेव्हा मीच किती खुष झाले होते.निकिलाही तू खुप आवडायचास, ती तुझ्याबद्दल बोलायला लागली की थांबायचीच नाही. मला फार मस्त वाटायचं. पण त्या धुळवडीनंतर अचानक सारं बदलु लागलं. तू आता रेंगाळत होतास पण माझ्यासाठी, मला ते जाणवायच. मला या सगळ्याची सवय नव्हती रे. शेवटी मी ठरवल या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा.त्या दिवशी तुझ्या घरी यायची हिम्मत केली, तुला सांगायच होतं निकीला तु किती आवडतोस ते.पण... “ ती क्षणभर थांबली. माझे हात-पाय गार पडायला लागले, घश्याला कोरड पडली होती. रुचाने मनातलं बोलाव असं खुप वाटायचं पण हे म्हणजे माती खोदुन मढं काढणारं होतं. मी माझी बाजु मांडण्याचा दुबळा प्रयत्न केला पण घश्यातून आवाजच फुटतं नव्हता.
रुचा पुढे बोलत राहीली,” त्या दिवशी तु मला म्हणालास, तु हसताना खुप छान दिसतेस. माझा खुप गोंधळ उडाला. हे कसं शक्य आहे? तुला तर निकि आवडते मग तु मला compliments का देतोस?माझी वाट बघत का थांबतोस? गर्दीत मला का शोधतोस? जसाजसा विचार करत गेले तसा मला तुझा राग यायला लागला. ह्या attention ची मला गरज नव्हती आणि अपेक्षा तर कधीच नव्हती. मी तिथुन सरळ निघुन आले.” तीने एक दिर्घ स्वास घेतला माझ्याकडे क्षणभर हसुन म्हणाली,”सिद्धार्थ, त्या दिवसानंतर आपण एकमेकांना टाळतं राहीलो. मी खुप विचार केला आणि मलाच हळुहळु उलगडायला लागलं. मी कुणीच नव्हते, तुझ्या आयुष्यात माझी दखलही नव्हती. मीही तुझी दखल न घेता तुझ्या दारावरुन जायचे, अगदी सहज आणि हेच तुला खटकायला लागलं. लहान मुलांना जसं हाताशी न लागणारं खेळणंच हवं असतं ना तसचं. तुझी माझ्याबद्दलची उत्सुकता कुतुहुल , ओढ अशी वाढतं गेली.तुला मी आवडतं नव्हते होत ते फक्त कुतुहुल. तुझ्या मोकळ्या स्वभावामुळे तू बोलूनही गेलास मनातलं अगदी सहज.पण मी तयार नव्हते. I am so sorry! पण आता सगळं मागे पडलयं. आपण आता शाळा-कॉलेजला जाणारे कच्चे-बच्चे राहीलो नाही बरोबर ना. Friends?” तीने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहील. मी हसुन मान डोलावली.
खरचं किती बदलेय रुचा! ही तीच रुचा का असा प्रश्न पडला. पण तीचं म्हणणही पटतं होतं, खरचं होत की सारं. मला फक्त तीच्याशी निखळ मैत्री करायची होती. त्या वाट पहाण्याचा, चोरुन तिच्याकडे बघण्याचा, ती नुस्ती दिसली तरी वाढणा‍र्याी धडधडीचा अर्थ किती सोपा होता. किती सहज होता नी मी उगीच काहीतरी विचार करत बसलो. हे सारं असच होतं मग मी का नाही अडवू शकलो त्या दिवशी तीला? का नाही विसरु शकलो तो प्रत्येक क्षण? आणि आज एवढया दिवसांनी तीला पाहून का अस्वस्थ झाला? का पुन्हा ती हुरहुर लागली? का सारं पटुनही अजुनही हळवं व्हायला होतयं.
मी मान हलवून सारे विचार झटकले. मी वृषावर प्रेम करतोय.’I am committed!’ मी स्वत:लाच समजावलं. मी दिर्घ श्वास घेतला, स्टिअरींगवरचा हात घट्ट केला आणि सारं बळ साचवून म्हणालो किती मनापासुन ते माहीत नाही,” रुचा, तु बरोबर बोलतेस हा सारा आपला भुतकाळ होता तेव्हा खरचं या गोष्टिंना काही अर्थ नव्हता नी आताही नाही. खरचं मला तुझ्या तश्या निघुन जाण्याने खुप त्रास झाला. पण माझ्या मनात चुकिच काहीच नव्हतं, ती एक spontaneous compliment होती बाकी काही नाही. मला खरचं माफ कर जर तू दुखावली गेली असशील. पण त्या दिवसानंतर मी तो प्रसंग पार पुसुन टाकला.” त्यावर ती खळखळून हसली,माझे ठोके चुकवत म्हणाली,” अरे, come on आपण काही एकमेकांवर प्रेम करत नव्हतो. तु तर मला अस explanation देतोस जणु आपला break up का झाला याची कारण मिमांसाच करतोस.” ती पुन्हा खळखळून हसली, माझे ठोके पुन्हा चुकले.
घरी  पोचेपर्यंत खुप उशीर झाला होता. सारीजण आमचीच वाट पहात होते. विशाल काकांशी गप्पा मारत होता. काका आज खुप रिलॅक्स वाटत होते. आम्हाला पहाताच ते मनमोकळ हसले, काकुही पदराला हात पुसत बाहेर आली,” आलात बाळानों तुमचीच वाट पहात होतो. बरं झालं बाई हा विशु होता त्याने आणलं आम्हाला सुखरुप नाहीतर त्या रिक्शाने यायचं म्हणजे व्याप डोक्याला. सुलु कशी आहे रे? ताप नाही ना चढला परत ?”मी मानेनच नाही म्हणालो, तशी ती प्रसन्न हसली.


Page 7
आज आईला डिसचार्ज मिळणार होता. मी सकाळी लवकरच हॉस्पिटलला पोहोचलो. माझ्याआधी वृषाली तिथे पोहोचली होती. मला पहाताच ती हसत पुढे आली, मला एक हलकीशी मिठि मारली. आईसमोर असल्याने मी एकदम अवघडून गेलो. पण आई सुदैवाने तिचं सामान भरण्यात गुंग असल्याने तिच्या लक्षात आलं नाही किंवा तिने जाणुनबुजुन दुर्लक्ष केलं. मला वृषाला तिथे पाहुन फार बरं वाटलं स्पेशली आमच्या अबोल्यानंतर. आईची एक टेस्ट करायची होती पण बाकी सारं नॉर्मल असल्याने रीपोर्ट मिळेपर्यंत थांबायची गरज नव्हती.आईचा उत्साह तर अवर्णनीय होता. घरी काकुपण रस्त्याला डोळे लावुन बसली होती. आम्ही घरी पोहोचल्यावर तीने आईला अशी काय मिठी मारली की दोघी रडायच्या तेवढया बाकी होत्या. मला नी काकांना हसु आवरेना. वृषाने त्या दोघींना आतल्या खोलीत नेलं. तितकयात पाठीवर जोरदार दणका पडला. लहानपणी आई-बाबांकडुन अगदी काका- काकूंकडून पण धम्मक लाडु खाल्ले होते पण मोठं झाल्यावरही कुठेही, कधीही पाठ तिंबायचं लायसन्स असलेला एकच इसम माझ्या आयुष्यात होता.”निख्या! what a surprise !” मी पाठ चोळत ओरडलो.
“तुझं surprise गेलं खड्ड्यात. साल्या घरात एवढं टेंशन आणि तुला साधा एक फोन नाही करता येत. मी काय मेलो होतो? विशालने सांगितल नसत तर मला कळलचं नसतं.” मी दुसरा बुक्का पाठीत बसण्याआधीच कान पकडले. तो हसला. “ आज पुण्याच्या कोर्टात एक हियरींग होतं म्हटलं आनंदकाकांना भेटून जावं. तुला फोन लावला तर तुझा फोन लागत नाही. इकडे येताना रुचा भेटली तिला पण उचलून घेउन आलो.” रुचाच नाव घेताना त्याने उगाच डोळा मारला, मी फक्त हसलो. आम्ही दोघही आत गेलो. रुचा आणि वृषा दोघी बाजुबाजुला उभ्या होत्या.माझी छाती उगीच धडधडायला लागली. मला पाहून रुचा हलकेच हसली. वृषाने लगबगीने पुढे येवुन आईला औषधांची आठवण केली आणि स्वत: औषधं काढायला लागली पण तीच पुर्ण लक्ष रुचा नी आईवर होतं. रुचा म्हणाली,” काकु, सकाळी नाश्ता केल्यानंतर काही खाल्लं नसेल ना? आता आधी खिचडी खाउन घ्या मग गोळ्या घ्या.” या वाक्यावर वृषाचं तोंड पडलं.
“नको ग बाई ती खिचडी, हॉस्पिटलमध्ये पाच दिवस तेच खातेय.आता नुस्त्या नावाने पण नको वाटतं.” आई तोंड फिरवत म्हणाली.
“अगं सुले, खाऊन बघ रुचाने बनवलेय. नुस्त्या वासानेच भुक लागेल बघ. थांब मी आणते.” काकु आत जायला वळली तशी वृषा झटक्यात पुढे आली,” काकु, तुम्ही कश्याला थांबा मी आणते.” तीची धडपड वाखाणण्याजोगी होती. मी वृषाचं वागणं एंजॉय करत होतो.
निखिल कानाजवळ येऊन पुटपुटला,” सिद्ध्या, ही कोण रे? एकदम भारी आहे. Intro करुन दे की साल्या मैत्रीणीशी.” मी शांतपणे त्याच्याकडे वळत म्हणालो,” ही वृषाली” त्यावर त्याने जोरदार जीभ चावली आणि कान पकडून म्हणाला,” वहीनी काय ! सॉरी यार.”
वृषाली ताट घेऊन परत आली. मी तीची दोघांशी ओळ्ख करुन दिली.”ही वृषाली.वृषु हा निखिल माझा बालमित्र आणि ही रुचा माझी...” वृषाने एक भुवई उंच करुन माझ्याकडे पाहीलं, माझे शब्द घश्यातच अडकले.
वृषाच्या वडीलांच क्लिनीक होतं वृषा तीथे जायची, वेळ मिळेल तसं आम्ही एकमेकांना भेटायची, फोन करायचो. घरचं वातावरणंही आता स्थिरस्थावर झालं होतं. काका उपचारांना मस्त प्रतिसाद देत होते. माझी मोठी काळजी मिटली होती. काका- काकु पुन्हा गावी जायचं म्हणतं होते पण आम्ही सगळ्यांनी त्यांचा बेत हाणुन पाडला. तसही गावावरुन उपचारासाठी येणं दगदगीच होतं. मला सुट्टी असेल तेव्हा काकु आणि आईला एकदा गावी नेवुन तिथल्या घराचीही रखरखाव ठेवावी असं ठरलं. रुचाचे आईला कदाचित फोन यायचे पण त्यानंतर ती घरी कधीच आली नाही.
        सकाळी हॉस्पिटला जायला निघालो तितक्यात आईच्या फोनची रिंग वाजली, मी तिला दोन-तीन वेळा हाक मारली. शेवटी वैतागुन फोन उचलला.”हॅलो!” सगळा वैताग त्या हॅलोत प्रकट करत म्हणालो.
 “ अं काकु? काकु आहेत का? मी रुचा बोलतेय?” अगदी सौम्य आवाजात पलिकडून रुचाने विचारलं.मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
“सॉरी अगं ती कुठेतरी आत आहे. बोलावतो तीला. एक मिनिट.” मी बाणाच्या वेगाने किचनमध्ये घुसलो. आईच्या कानाला फोन टेकवत म्हणालो,” आई, रुचा!”.
मी बाहेर माझ्या चहा- नाश्त्याची वाट पहात बसलो. खरं तर मला उशीर होत होता, एरवी मी चहा- नाश्त्याला टांग मारुन गेलो असतो पण आज मला अचानक फार भुक लागली होती. आई पाचच मिनिटात चहा-नाश्ता घेवुन बाहेर आली. मी प्रश्नार्थक नजरेने तीच्याकडे पाहीलं.
“अरे सिद्धु, मी काय बोलत होते. तुझा विक ऑफ कधी आहे रविवारीच ना? मला आणि रजूताईंना घरी घेउन येशील काय? शनिवारची दांडी मारता आली तर बघ ना म्हणजे दोन दिवस मिळतील, जरा साफसुफ करायचं होतं.”
“आई, शनिवारी दांडी नाही मारता येणार पण मी मॉर्निंग घेतो म्हणजे मी दुपारी येईन परत मग निघु चालेल?”
आई एकदम खुष होत म्हणाली,” मस्त ! मी  रुचालापण सांगते थांब म्ह्णुन. नाहीतरी बिचारी बसनेच जाणार आहे. पण तुझा बेत नाही ना फसणार, नाहीतर मी तीला थांबवायचे आणि सगळीच पंचाईत व्हायची.” मी मानेनेच हो म्हटलं. चहा संपवुन हॉस्पिटलला पळालो, पुर्ण रस्ताभर विचार करत होतो,रुचाचं नाव निघालं की अजुन अस्वस्थ नी धडधडल्या सारखं का होतं? पण उत्तरं मिळालं नाही. मी खुष होतो बयाु   च दिवसांनी गावी जाणार होतो( रुचासोबत..)
रात्री काकांनीही सोबत येत असल्याच घोषित केलं. ते आले म्हणजे त्यांच्या पुढच्या चेक अप पर्यंत ते परत येणार नाहीत हे उघड होतं. रात्री मी शनिवारच्या प्रवासाचा विचार करत बसलो होतो तितक्यात फोनची रिंग वाजली.
“Hi Sweetu ! काय करतोस? रविवारचा प्लॅन ऐक. आपण सगळे आमच्या क्लिनिकजवळ भेटतोय सकाळी, मग तिथुन सरळ खंडाळा समिधाच्या फार्म हाउसवर. सगळे जाम धमाल करु. निशिकांतपण येतोय. काय रे बोल ना काही!”
“वृषु, I am really sorry yaar. आम्ही सगळे गावाला चाल्लोत. उद्याच निघु त्यामुळे मला शक्य नाही व्हायचं ग. सगळ्यांना माझ्याकडुन सॉरी सांग.”
“अरे काय रे! याला काय अर्थ आहे. मी सगळ्यांना प्रॉमिस केलयं get-together करुचं म्हणुन. तु तुझा प्लान पुढल्या वीक ऑफ ला कर ना, तसही तु गावी जाऊन काय करणार आहेस? सरळ taxi करुन दे ना त्यांना.”
“वृषु अगं बाबा बाहेर गेलेत त्यामुळे मला सगळ्यांना घेऊन जायला लागणार आहे. मी माझा प्लान नाही बदलु शकत. तसही तु get-togetherच प्रॉमिस केल आहेस आणि तुम्ही लोक भेटताय. So no issues.” मी आवाज शक्य तेवढा शांत ठेवत म्हटलं.
“अरे पण निशु परत जाईल US ला , त्याच्या साठी मी प्लॅन केलं.तुला आमची काहीच किंमत नाही का? फक्त एक दिवस मागतेय मी तेही तुझ्याने होत नाही.” ती वैतागत म्हणाली.
“I am sorry वृषु.” एवढं बोलुन मी फोन ठेवला.माझं डोकं भणभणायला लागलं.का हिचा हट्ट ? का हीला कळत नाही माझं कुटुंब माझ्यासाठि किती महत्वाचं आहे ते! इतकी वर्ष सोबत काढुन पण का हीला अजुन माझ्या प्रायोरिटिज कळतं नाहीत.
मी हेड्फोन कानाला लावले ‘मरासिम’ सुरु केल नी त्या शब्द सुरात हरवुन गेलो. अचानक सारं शांत वाटायला लागलं. डोकं नी मनं सुस्थितित आलं. काय चुकलं तीचं! तीने निशुसाठी get-together प्लान केलं. तो महीन्याभरात MD करायला गेला कि परत भेट होणार नव्हती आणि तसही एका ग्रुपचे आम्ही सगळे एकाच शहरात प्रॅक्टीस करुन पण एकमेकांना भेटु शकत नाही. वृषाली वर उगीच भडकलो, तीला नीट सांगता आलं असतं. मलाच अपराधी वाटायलां लागलं. घरातल्यांचा उत्साह बघता मला माझा प्लॅन कॅन्सल करणं शक्य नव्हतं. काकांना किती दिवसांनी एवढं खुष पाहीलं होतं. मी फोन काढला तीला सॉरी मेसेज टाकला नी पुन्हा गझलं मध्ये हरवुन गेलो.
        शनिवारी दुपारी घरी पोहोचलो तर बॅगस् आधीच ओसरीपर्यंत आल्या होत्या. आई-काकु मनाने अर्ध्या गावी पोहोचल्या होत्या. काकाही विलक्षण खुष दिसत होते.काय पण बघा ना ! काकांच पुर्ण आयुष्य पुण्यात गेलं.त्यांच शिक्षण, नोकरी सारं एथेच झालं पण रिटायर्ड झाल्यावर पहीले गावी पळाले. आजही घरी जायचं म्हटल्यावर काय खुष झाले.
        रुचा रस्त्यात भेटणारं होती. त्या चहुबाजुने फुटलेल्या गर्दीत पण रुचाला शोधणं कठिण नव्हतं. मागे बसलेल्या आई- काकुंनी तीला मध्ये बसवलं. तीघींच्या जोरदार गप्पा सुरु झाल्या. प्रचंड ट्रफिक मुळे आम्हाला लोणावळा गाठायलाच 4 वाजले. मागे आई-काकु गाढ झोपल्या होत्या. काकाही मधुनच डुलक्या देत होते. मी एक नजर रस्त्यावर नी एक आरश्यात दिसणा‍र्या  रुचावर ठेवुन गाडी चालवतं होतो. रुचा फोनवर बीझी होती. लोणवळ्याला मी गाडी थांबवली चहा आवश्यक होता, अजुन अर्धा पल्लाही गाठला नव्हता. मी रुचाच्या समोर बसलो, मनाला वारंवारं समजावत होतो तिच्याकडे पाहायच नाही. गरम गरम चहाचा कप हातात आला त्या वासानेच मला छान फ्रेश वाटलं मी हळुच चोरुन तीच्याकडे पाहीलं. ती माझ्याकडेच पहात होती! आमची नजरा नजर होताच ती गोड हसली आणि माझी परत विकेट पडली. मी त्या धुंदीत कढता चहाचा कप तोंडाला लावला आणि तोंड पोळुन घेतलं. “आई ग! “ ओरडुन मी कप खाली ठेवला.
“अरे बाबा हळू, काय घाई करतोस पोहचू वेळेत.” आई- काकु एकदमच म्हणाल्या. आता यांना काय सांगु! मी माझ्याच फजितीवर हसत उरलेला चहा संपवला. पुढच्या प्रवासात मात्र आम्ही सा‍र्यांतनीच छान गप्पा मारल्या. घरी पोहोचायला बराच उशीर झाला.मी आधी घरच्यांना सोडलं आणि रुचा नको म्हणत असतानाही मागच्या गल्लीतल्या तीच्या घरी सोडायला गाडी वळवली.
“तू उद्याच जाणार असशील ना? आम्हीही उद्याच दुपारी निघणार आहोत म्हणजे मी आणि आई. तुला प्रोब्लेम नसेल तर तुही चल आमच्या सोबत का उगीच बसने जातेस?” एवढं बोलल्यावर मी श्वास रोखुन आरश्यातुन मागे पाहीलं. क्षणभर विचार करुन ती हसुन म्हणाली,” चालेल की पण 10 च्या आत पोहोचु ना? “ मी खुशीत मान डोलावली. गाडीतून उतरुन ती समोर आली.
“Thank you सिद्धार्थ”
“Thank you काय come on! मी उद्या तुला कॉल करतो. गुड नाईट”
“अरे घरात ये ना” तीने आग्रह केला.
“ नको अगं तीकडे आई-काकू पेटल्या असतील साफसफाईला, त्यांना मदत करायला पाहीजे.”
ती त्यावर अविश्वासाने हसली,” तु घरात मदत करतोस?”
“अरेच्च्या ! म्हणजे काय? जेवणसुद्धा करतो.” मी आत्मविश्वासाने सांगितलं खरं जेवणाच्या नावाखाली मला फक्त आमटी-भात करता येते हे मात्र लपवलं. पण त्या मागचा आत्मविश्वास खोटा नव्हता मी खरचं आईला मनापासुन सारी मदत करायचो.
“मज्जा आहे तुझ्या बायकोची.” ती मला चिडवत म्हणाली आणि मी चक्क लाजलो.तीला डोळे वटारत बाय म्हटलं तशी ती खळखळुन हसली. माझे ठोके पुन्हा चुकले.
Page  8
घरी आई-काकुं आणि काकांनीही कहर केला होता. सगळी एवढया महीन्यांची साफसफाई करायला घेतली होती. सा‍र्याक घरभर नुसते कपडे, भांडी नी पेपर पुस्तक पसरली होती. मी त्या तीघांना त्यातुन बाहेर काढलं. बाहेरच जेवायला घेउन गेलो. दोघींची कुरकुर चालु होती, घरात झालं असतं झटकन एकीकडे उरकलही असतं वैगरे पण मी साफ कानाडोळा केला. घरी परत आल्यावर तिघांनाही सोफ्यावर बसवलं आणि धाडधाड सा‍र्या. पसा‍र्यांचा निकाल लावला. आई-काकु जाम वैतागल्या होत्या.अरे ही भांडी पुसली नाहीस, तशीच नको लावुस. हे कपडे इथे नको ठेऊस वैगरे चालु होत पण मी बधलो नाही. सगळी काम उरकतोय तोच निखिल आला. मी पाय मोकळे करायला बाहेर पडलो.
नाक्यावर जाउन येतो, तो पर्यंत कोणीही काहीही नवीन काम काढायची नाहीत अशी तंबी देऊनच बाहेर पडलो.
पावलं अचानक मागच्या गल्लीच्या दिशेने वळली.
“काय रे! नाक्यावर जायचयं ना? तिकडे कुठे चाललास?” निखिलने आश्चर्याने विचारलं. मी मनातल्या मनात ओशाळलो. चालता चालता अचानक निखिल माझ्याकडे रोखुन पहात म्हणाला,” सिद्धया, एक विचारु? तु खरचं त्या वृषालीशी लग्न करणार आहेस?” मला या प्रश्नाने हसु आलं.
”का रे? नको करु का?” मी हसु दाबत विचारलं.
निखिल अगदी धीरगंभीर आवाजात म्हणाला,” Honestly सिद्द, तु तिच्याशी लग्न करणार आहेस? एकीवर प्रेम करुन दुसरीशी लग्न करणार तु?”
मी मुर्खासारखं त्याच्याकडे पहात विचारलं,” निख्या, सकाळ सकाळ काय डोक्यावर पडला होतास? काय बरळतोस?”
“सिद्धु, आपल्याला स्वत:चा शेंबुड पण पुसता येत नव्हता तेव्हा पासुनची मैत्री. तुझ्या प्रत्येक पाप पुण्याचा मी साक्षीदार आहे. मी तुझ्यापेक्षा पण तुला जास्त ओळखतो. तु रुचावर प्रेम करतोस हे तुला कळतं नाही की मान्य करायचं नाही तसं असेल तर मी पुन्हा हा विषय काढणार नाही.” तो रागाने घरी जायला वळला.
“निखिल,प्लिज यार रागावु नकोस पण खरचं तस काही नाहिये. अरे तेव्हा आपण 16 वर्षाचे होतो. त्या असं एखादी बद्दल वाटणं साहजिकच होतं. तिच्याआधीही मला निकिता आवडत होती आणि तीच्या आधी न जाणो कितीजणी आणि रुचानंतरही माझ्या आयुष्यात वृषा आलीच ना. आणि प्रेमाच्या गोष्टी तुला सांगितलं की मला रुचाशी बोलायचयं तेव्हा कसा पिसाटला होतास! मला वेडयात काढलं होतसं. “
निखिलने पाठीत एक गुद्दा घातला,” सिद्ध्या, तुझ्या सगळ्या अकाउंटसचा हिशोब आहे माझ्याकडे. पण ही रुचा, तु कुठेतरी अडकलास तीच्यात. अगदी नामवंत नसलो तरी निष्णांत वकिल आहे मी. राजा, human psychology कळते मला. तीला पाहीलं की तुझं कसं होत ते पाहीलय मी. एवढया वर्षांनंतरही तिच्या नुसत्या जवळ असण्याने मोहरतोस तु. तु काहीही म्हण पण तुझे डोळे वेगळच सांगतात. आता तुला पटत नसेल तर राहु दे.”
मी फक्त त्याला कोपरापासुन नमस्कार केला पण त्याच्या प्रत्येक शब्दावर माझी धडधड उगीच वाढली. ‘बरं बाबा!’ असं बोलुन मी विषय मिटवला. पण डोक्याला भुंगा लागलाच.
        बाबा आज रात्री टुरवरुन परत येणार होते, त्यामुळे आम्ही दुपारी लवकरच परतीच्या प्रवासाला निघालो. आईने मागे बसायच ठरवलं. मी अगदीच त्यांचा ड्रायव्हर वाटु नये म्हणुन रुचा पुढे बसली. खरं तर तीच्यासोबत प्रवासाची ही तिसरी वेळ होती पण अजुनही माझ्या छातीचा लोहाराचा भाता झाला होता. त्यात भर म्हणुन त्या निखिलने डोक्यात भुंगा सोडला होता.बहुतेक वेळ मी पुर्ण लक्ष रस्त्यावरचं ठेवायचा अगदी आटोकाट प्रयत्न करत होतो. सुदैवाने आम्हाला फार ट्रफिक लागल नाही.रात्री वेळेत घरी पोहचलो. आईने रुचाला तीच्या हॉस्टेलला सोडुन यायचं फर्मान काढलं.
” अहो काकु, खरचं त्याची काही गरज नाही. फार उशीर नाही झालाय. तसही पुण्याच्या ट्रफिकमधुन चार चाकी पेक्षा तिन चाकीच लवकर पोहचेल.” रुचा हसत म्हणाली.
पण आई ऐकायला तयार नव्हती तीने पुन्हा माझ्याकडे पहात ऑर्डर काढली,” तो बाईकवर सोडेल तुला.” मला उगीच गुदगुल्या झाल्या. मी अगदी तत्परतेने बाईक बाहेर काढली, रुचा कदाचित अनिच्छेनेच मागे बसली अगदी ओढणीचाही स्पर्श होणार नाही एवढं सुरक्षित अंतर ठेवुन. गाडीवर बसल्या बसल्या तिने ओढणी स्कार्फसारखी तोंडाला गुंडाळली. ट्रफिकमधुन वाट काढत आम्ही तिच्या होस्टेलला पोहोचलो. गाडीवरुन उतरुन ती अगदी मनापासुन ,’ Thank you, See Ya’ म्हणाली.
मला तीला विचारावसं वाटलं पुन्हा केव्हा भेटु? पण मी शब्द गिळले. आता कुठे आमचं नातं जरा खुलायला लागलं होतं. ‘आमचं नातं !’ मी मनातचं आंढवा गिळला. ती हॉस्टेलच्या इमारतीत दिसेनाशी होई पर्यंत मी तिथेच उभा होतो.
त्याच धुंदीत मी घरी परत आलो, बाबा नुकतेच आले होते. त्यांनी जेवणानंतर मला जवळ बसवलं.
“सिद्द, खुप मोठा झालास रे. आजपर्यंत मी तुला बच्चा समजत होतो पण तु सिद्ध केलसं की प्रसंग आला तु सारं किती mutually सांभाळू शकतोस. I am so proud of you बेटा.” त्यांनी एक कडकडुन मिठि मारली. असे क्षण संपूच नये असं वाटतं. आपल्या वागण्याने आपली वडीलधारी माणसं खुष होतात यापेक्षा आणखि सुख ते काय असतं. मलाही आवेग आवरतं नव्हता, मीही त्यांना कडकडुन मिठि मारली. आई दारात उभी राहुन पहातं होती तिच्या डोळ्यात पाणी आलं, अर्थात ते क्षण आनंदाचे होते. बाबांनी मानेनेच तीला जवळ बोलावलं. आम्ही तिघं काही न बोलता खुप वेळ केवळ हातात हात घेऊन बसलो होतो पण मला खुप छान वाटतं होतं. आजचा दिवस खास होता.
Page9
हॉस्पिटलमध्ये आज बरीच गडबड होती.एका अॅखक्सिडंट केसमुळे पाच जण ICU मध्ये होते. आज श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. जेवणाची वेळ केव्हाच उलटुन गेली होती पण जेवायची इच्छाच नव्हती. एक राउंड मारून मी staff room मध्ये परतलो. अंगातलं त्राण पार गेलं होतं, अजुनही ती रक्तानी माखलेली माणसं त्यांचे रडणारे, बिलगणारे नातेवाईक सारं डोळ्यासमोर येतं होतं. त्याच्यामधले एक मध्यमवयीन गृहस्थ तर फार अत्यावस्थ होते. त्यांना पाहुन मला का कुणास ठाऊक पण काकांची आठवण झाली. कदाचित त्या अत्यावस्थ वडिलांना रक्त दयावं लागेल म्हणुन त्यांचा पळून जाणारा मुलगा पाहुन उगीच दादा आठवला. मी बॅगमधुन मोबाईल बाहेर काढला, काकांना कालपासुन फोन नव्हता लावला. मोबाईलवर वृषालीचे चांगले 5-6 मिस कॉल होते. मी तिला लगेच कॉल केला.पलिकडून हॅलो ऐवजी ‘तु मला आत्ताच्या आत्ता माझ्या क्लिनिकजवळ भेट’ वृषु प्रचंड रागाने म्हणाली.
“वृषु, काय झालं सांगशिल! मी असाच नाही येउ शकत. हायवे अॅ्क्सिडंटची केस आमच्या हॉस्पिटल मध्ये आहे, त्यातले 5 जण ICU मध्ये आहेत. मी संध्याकाळी भेटतो ठिक आहे?” काही न बोलताच तीने फोन ठेवला. त्यांनंतर लावलेले डझनरभर कॉल तिने घेतले नाही. संध्याकाळी मी थेट क्लिनिक गाठलं, मला पहाताच ती बाहेर आली.
“Hi वृषु !” मी शक्य तेवढया प्रेमाने बोललो.
“जाम चिडलीस का ग ? I am sorry yaar.” मी दोन्ही कान पकडत म्हणालो.
“नाही सिद्द, I am sorry! माझंच चुकलं की मी तुझ्यावर प्रेम केलं.तुझ्या आयुष्यात तर मला काही स्थानचं नाही. तुझे आई-बाबा, तुझे काका-काकी, तुझे so called प्रिय बालमित्र आणि बालमैत्रीणी या सगळ्यांनंतर मी आणि तीही जागा आहे की नाही माहीत नाही. सिद्धु, मला शंका आहे कि माझ्यावर प्रेम तरी करतोस का! “
“प्लिज वृषु ! अगं तु भडकणं साहजिकच आहे पण माझा खरचं नाईलाज होता. आज मला श्वास घ्यायला पण वेळ नव्हता. एक तर अॅ क्सिडंटची केस आणि त्यात एका RMO ने दांडी मारली, मला मोबाइलची पण दाद नव्हती. I am really Sorry .” मी तिला समजावत म्हणालो.
“ बरोबर आहे सिद्धार्थ, तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीला कारण तयार असतं. मी दुधखुळी नाही सारं कळतं मला. मागे गावाहून आल्यापासुन तु फार बदलला आहेस सिद्द. तुला ना माझी कदर आहे ना माझ्या प्रेमाची. मीच वेडी तुझी वाट पहात होते काल, वाटलं माझी रिक्वेस्ट ऐकुन तरी तु पाघळशील आणि get together ला येशील. सगळे आले होते, मला विचारत होते तुझा सिद्द कुठे आहे? काय सांगणार होते त्यांना हेच की माझा सिद्ध त्याच्या काका-काकु आणि आईला घेऊन गावी गेलाय! त्याला आता माझ्यापेक्षाही त्याचं गाव महत्वाचं झालयं! तु उठसुठ गावी का जातोस याचं कारणं मला माहीत नाही असं वाटतं तुला सिद्द?”
आता माझा संयम धासळतं चालला होता.वृषा रागाच्या भरात काहीही बोलत होती.
“वृषु please ! “ मी रागाने ओरडलो.
“का असं वागलास सिद्धार्थ? You have betrayed me & my feelings. I hate you सिद्द.”
तीला आता रडू यायला लागलं मग मात्र माझी पंचाईत झाली. एवढा वेळ आम्ही तीच्याच क्लिनिक बाहेर आहोत हे लक्षातचं आलं नव्हतं. मी पहीले तीला बाजुला नेलं आणि जवळ घेतलं, तशी ती मुसमुसायला लागली.
“ I am sorry वृषु !  really sorry. प्लिज अशी रागावु नकोस ना. समजुन घे ना मला. Please yaar!. I love you वृषु.” मी मनापासुन बोललो. या वाक्यावर ती झटक्यात दुर झाली. स्वत:चे डोळे कोरडे केले आणि एकटक माझ्याकडे पहात मला म्हणाली,” Do you really meant what you said just now? ”
“हो यार, I am really sorry.” मी म्हणालो तसं मला मध्येच रोखत ती म्हणाली,” नाही सिद्द, do you really love me? तु खरचं माझ्यावर प्रेम करतोस? “
“अर्थात वृषु, तु असं का बोलतेस?” यावर ती हताश हसली.
“सिद्धु, तु खरचं वेडा आहेस की फक्त नाटकं करतोस? तुला खरचं माहीत नाही तुला काय होतय !”
“तु काय बोलतेस वृषु ! मला खरचं कळतं नाही.”
तीने मला हलकेच मिठि मारली आणि मिठीतून बाहेर येत म्हणाली,” सिद्द,  you don’t love me, at least not anymore. आपण गेले 4 वर्ष सोबत आहोत पण फक्त सोबत. कधी कधी वाटतं जर मी फायनल इयरला तुला प्रपोज केलं नसतं तर आपण कधी एकत्र आलोच नसतो. मला तु आवडतोस सिद्द, तुझं लाघवी बोलणं, तुझी हुशारी, तुझं काळजी घेणं, सारं काही. मी आयुष्यात जे मागितलं ते मला मिळालयं, In fact मी ते मिळवलयं. ज्या क्षणी मला वाटलं तू मला हवा आहेस मी तुलाही मिळवलं पण मी एक गोष्ट विसरले, तु वस्तु नाहीस माणुस आहेस. प्रेम असं मागुन मिळतं नाही, ते असावं लागतं, आपोआप व्हावं लागतं. गेले 4 वर्ष मी ते प्रेम तुझ्यात शोधत होते, तुला माझ्यासोबत बांधुन ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.तु माझ्यासोबत होतास पण माझ्याजवळ नाही. मला सतत वाटायचं तु माझ्यावर प्रेम करत नाहीस. जेव्हा मी रुचाला पहिल्यांदा भेटले तेव्हा जाणवलं ती माझी कल्पना नव्हती ते खरं होतं. जे प्रेम मी माझ्यासाठी तुझ्या डोळयात शोधतं होते ते मला दिसलं पण तीच्यासाठी. तुम्ही एक अक्षरही न बोलता एकमेकांशी किती संवाद साधतं होतात. जी जादु माझ्या मिठीनेही साधली नाही ते तुझं धुंद होणं मी तीच्या केवळ एका साध्या smile ने होताना पाहीलं आणि मला खुप राग आला. तु माझा होतास नी मलाच हवा होतास, रुचासारखी साधी सरळ पोरगी एक अक्षरही न बोलता माझ्याकडुन तुला हिरावु शकणार नव्हती.मीही हट्टाला पेटले पण काल तुला नी तिला तिच्या हॉस्टेल बाहेर पाहीलं आणि माझा सारा अभिमान गळुन गेला. ती हॉस्टेलमध्ये परत गेली तरीही तु तिथेच उभा होतास जणु तिच्यासाठी आयुष्याच्या अंतापर्यंत थांबायला तयार असल्यासारखा. मी हरले सिद्द. Please ह्याला break up म्हणु नकोस कारण break up व्हायला आधी मनं जुळावी लागतात आणि प्रेम तर फक्त मी करत होते तु करत होतास केवळ कर्तव्य एका मित्राचं. त्यात प्रेम होतं, काळजी होती पण ते passion नव्हतं जे तुझ्या आणि रुचाच्या नात्यात आहे.आता आपण just friends पण नाही होवु शकतं कारण तु केलं नसलसं तरी मी तुझ्यावर प्रेम केलयं. After all its my first love and now go and confess your love you stupid before that dumb choose  someone else.” ती पुन्हा आपले अश्रु लांब लोटत हसली. आयुष्यात पहिल्यांदाच मला ती एवढी भेसुर वाटली. मला तर कोणीतरी कानफटात मारुन झोपेतुन उठवल्यासारखं झालं होतं. ती वळली आणि ‘bye take care ‘ बोलुन निघुन गेली. मी तिला पाठमोर पहातं उभा होतो अगदी हताशपणे ती काय बोलुन गेली!
Page 10
“आई मला यायला उशीर होईल.जरा काम आहे”
“काय रे सगळं ठिक आहे ना?” आईने काळजीने विचारलं.
“हुं,मी ठिक आहे थोडा बिझी आहे. निघालो की लावेन फोन.” मी अश्रु थोपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत म्हणालो.
हे काय चाललयं माझ्या आयुष्यात ! निखिल आणि वृषु सांगतात माझं रुचावर प्रेम आहे, रुचा म्हणते आमच्यात काहिच नाही आणि माझं मनं.... त्याला तर काहीच कळतं नाही.
काय करु? मी डोळे गच्च मिटले तरी अश्रु ओघळुन गालावर आलेच. वृषुला थांबवाव तीला सांगावं तुझा गैरसमज झालाय. तसं काही नाही मी आणि रुचा...

रात्रीचे 7 वाजले होते मी रुचाच्या होस्टेल समोरच्या रस्त्यावर उभा होतो. डोक्यात विचारांच थैमान चालु होतं.अनेक चित्रविचित्र आठवणी गर्दी करत होत्या. रुचा तीच्या मैत्रीणीसोबत बाहेर आली, मला पाहुन दचकली. मी हसण्याचा निष्फळ प्रयत्न केला. तीने मैत्रीणींना काहीतरी सांगितलं तश्या त्या निघुन गेल्या.ती शांतपणे हसत माझ्यापर्यंत आली. तिच्या चेहर्यारवर आश्चर्य होतं, तीला माझं येणं अर्थात अपेक्षित नव्हतं. तीला पाहुन माझा एवढया वेळ तग धरुन राहिलेला उरला-सुरला धीरही सुटला.
“हाय सिद्धार्थ, कसा आहेस?” या तीच्या साध्या प्रश्नाने पण मला भरुन आलं. माझी अवस्था कदाचित तीला कळली.ती स्वत:हुन म्हणाली,”चल चहा घेवु.” मी मुकाट तिच्यामागे गेलो.जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये आम्ही बसलो.
“काय झालं सिद्धार्थ? सगळं ठिक आहे न? काकुंची तब्येत ठिक आहे ना? आनंदकाका ?”
मला काय बोलायचं आहे कसं सांगु हिला! मला काहीच सुचेना. मी सुन्नपणे बसुन होतो. तिने हलकेच माझ्या हातावर हात ठेवला.
“सिद्धार्थ, काय झालयं? सारं ठिक आहे ना? सांग ना प्लिज.”
मी क्षणभर तीच्याकडे पाहिलं,”रुचा, I love you…” ती दचकली, तीने चमकुन माझ्याकडे पाहीलं पण तीने हात सोडला नाही.एवढया वर्षाचं साठलेलं सारं मी आज बोलायचं ठरवलं. मला अचानक फार छान वाटायला लागलं. दिवसभर अंधारल्या नंतर अचानक ढगातुन सुर्यकिरणं झाकावीत आणि सारं आसमंत प्रकाशाने उजळुन निघावं तसं काहीसं झालं. रुचा अजुनही अव्वाक होती.
“रुचा please  जावु नकोस आज मला सारं बोलायचयं, एवढया वर्ष मनात साचवलेलं. रुचा, तु मला एका धुळवडीला ‘happy holi’ बोलुन निघुन गेलीस पण मी पार वेडावलो गं. तुझा आवाज, तुझं smile माझी पार झोप उडवुन गेलं.मला कळतं नव्हतं मला काय होतयं. पण तुझं हसणं , तुझं बोलणं, तुझं नुसतं सोबत असणं सारं मला आवडतं. तुझ्या नुसत्या सोबत असण्याने मी मोहरुन जातो. आजही तुझ्या नुसत्या दिसण्याने मी वेडा होतो. रुचा तुझं नुसतं नाव ऐकलं तरी माझी छाती धडधडायला लागते.तु सोबत असलीस कि दुसरं काहीच दिसत नाही, तु सोबत नसलीस की मी तुझाच विचार करतो. हे प्रेम नाही तर काय आहे रुचा? I ...I ..I love you रुचा.”मी एका दमात सारं बोलुन मोकळा झालो.
डोळे घट्ट बंद केले जणु पुढे काय होणार हे काहीच नको होतं. ती कदाचित रागाने निघुन जाईल, परत माझ्याशी कधीच बोलणार नाही. कदाचित....
माझ्या हातावरच्या ओठांच्या ओल्या स्पर्शाने अंगावर सुंदर रोमांच उभे राहीले.मी हलकेच डोळे उघडले.रुचा प्रसन्न हसत होती, अगदी मोकळी. तिच्या त्या डोळ्यात प्रेम होतं,माझ्या प्रेमाचा स्विकार होता. माझ्या सा‍र्याअ प्रश्नांची उत्तरं होती.

आज माझ्या लग्नाचा 10वा वाढदिवस. मी एका नर्सरीसमोर गाडी थांबवली, गुलाबाचं आणि मोगर्यायचं छानशी रोपटी घेतली. माझ्या फुलवेडया बायकोला यापेक्षा जास्त छान गिफ्ट काय असणारं होतं. जाताना कोपर्या वरुन चार गजरे घ्यायला विसरलो नाही. आईला, काकुला, रुचाला आणि माझ्या लाडक्या छोट्या तन्वीला. तीही तीच्या आईसारखीच फुलवेडी आहे. 10 वर्षात रुचाने एकदाही ‘I Love You’ म्हटलं नाही पण तीच्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतीतुन, तीच्या काळजीतुन, तीच्या चेहर्यारवरच्या समाधानाच्या रेषेतुन ती न जाणो किती वेळा ‘I Love You’ म्हणाली असेल.
मी आजही निखिल आणि वृषाचा मनापासुन आभारी आहे. त्यांनी जर मला माझ्या प्रेमाची जाणिव करुन दिली नसती तर मी आजही वेडा सिद्दुच राहीलो असतो. लग्नाच्या एवढया वर्षानंतरही अजुनही रुचा हसली की मी मोहरतो. आमचं प्रेम अजुनही तसचं गहीरं आहे होळीच्या ओल्या रंगासारखं..

                               
हर्षदा
Harshada
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: होळी

Sunil Samant
 अतिशय उत्कृष्ट... अजून ल्लिहा.