गल्फफूड २०१६-एक विलक्षण अनुभव
उपेंद्र बाजीकर ---udbajikar@gmail.com 00971557372080 ![]() आहार विषयक उद्योगाशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांच्या उद्योगाचे सर्व पैलू एकत्रित आणणारे दुबईतील गल्फ फूड २०१६ हे लक्षवेधी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहण्याचा योग यावर्षी आला. खाद्यपदार्थ उद्योग विषयक प्रदर्शनांच्या पंक्तीमध्ये नावाजले जाणारे हे प्रदर्शन पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता .भव्य प्रमाणावर होणारे प्रदर्शनाचे आयोजन थक्क करणारे तर होतेच, त्याशिवाय आहार उद्योग क्षेत्राच्या विस्तारलेल्या कक्षा उलगडून दाखाविणारेही होते. आपल्या दृष्टीने आणखी एक महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे सहकार आणि कृषी उद्योग मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी या प्रदर्शनाला भेट दिली . स्थानिक मंडळींच्या वतीने त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या समुहाचा मी सदस्य होतो. या भेटी दरम्यान त्यांनी इथल्या महाराष्ट्रीयन कृषी उत्पादन व्यावसायिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या आणि आपल्या कल्पनाही मांडल्या . त्यांचे या विषयावरील सखोल चिंतन यावेळी दिसून आले. माझ्या दुबई वास्तव्य काळातील हा एक आगळा शिक्षण अनुभवच म्हणावा लागेल. जगभरातील ११७ देशांच्या खाद्य संबंधित व्यवसायाचे सर्व पैलू या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. त्यामधून जणू जागतिक स्तरावरील खाद्य संस्कृतीचा एक सोहळाच येथे भरला होता. या प्रदर्शनात भाग घेतलेल्या कंपन्यांची संख्या पाच हजार इतकी होती तर प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्या सुमारे एक लाख इतकी होती . दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेन्टरच्या विस्तीर्ण दालनामध्ये भरलेल्या या प्रदर्शनाने जगभरातील खाद्य उद्योग अवतरला होता. आपल्या आहारात समाविष्ट होणाऱ्या रोजच्या घटकांचे आणि त्या संबधित व्यवसाय चक्राचे विविध घटक येथे सामोरे आले. धान्ये,डाळी ,भाज्या,तेले,बेकरी उत्पादने,शीतपेये,चहा,कॉफी ,सुकामेवा,मांस मटण ,मासे अशा पदार्थांचे उद्योग क्षेत्र येथे खुले होते. भारतातील कृषी उत्पादन हे आंतर राष्ट्रीय स्तरावर खूप मोठी बाजारपेठ मिळवून देऊ शकतं याविषयी आपण आता सजग होऊ लागलो आहोत. खुद्द आपल्या देशाची मोठी लोकसंख्या विचारात घेता तेथे देखील आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळू शकतो. मात्र त्यासाठी आहार प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनविण्याचे उद्योग विकसित करण्याची प्रभावी यंत्रणा आवश्यक आहे . आपल्याकडे कृषी उद्योग हा निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असल्यामुळे काही वेळा प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते. तर काही वेळा झालेले मोठे उत्पादन प्रक्रियेअभावी सडून जाते. अशावेळी योग्य प्रक्रिया करून आहार संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करता येते याची काही उदाहरणे या प्रदर्शनाने दाखवून दिली . अवकाळी पाउस किंवा दुष्काळी परिस्थिती यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आहार प्रक्रिया उद्योग विकसित करण्याची गरज अवघ्या जगाने ओळखली आहे.ती आपणही ओळखली आहे परंतु आपण अधिक कृतीशील बनणे आणि निर्यातीच्या दृष्टीने गती वाढविणे गरजेचे बनले आहे. भारतीय उपखंडातील हवामानाच्या वैविध्यपूर्णतेमुळे येथील कृषी उत्पादनातही विपुलता आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण होणारी अनेक उत्पादने आज जगाच्या पाठीवर सर्वत्र नावाजली जातात . जागतिक बाजारपेठेत काळी मिरी ,काजू, नारळ, आले, चहा,हळद अशा उत्पादनाचे अग्रस्थान भारताला आहे. दुग्ध उत्पादन क्षेत्रातही भारताची अशीच ख्याती आहे. सन २०१६ या वर्षाच्या अखेरीस देशाची दुग्ध उत्पादन क्षमता १३८ दशलक्ष टन इतकी असेल. देशामधील म्हशींची संख्या ८९ दशलक्ष इतकी आहे, जी जगातेल एकूण म्हशींच्या संख्येपैकी ५८ टक्के इतकी आहे. भाजीपाला आणि फळ उत्पादनातही अशीच प्रगती आहे. ८९ दशलक्ष टन इतके फळे आणि १६२. ९ दशलक्ष टन इतके उत्पादन घेऊन देश जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. आंबा उत्पादनात १८. दशलक्ष टन इतके तर केळी उत्पादनात २९. ७ दशलक्ष टन उत्पन्न घेणारा भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे . चहा , तांदूळ आणि साखर उत्पादनामध्ये आपल्या देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. आगामी दहा वर्षात आपल्या देशाचे हे उत्पादन दुपटीने वाढेल असे कृषी तज्ञ सांगतात. सन २०१२ मध्ये आपले कृषी उत्पन्न १५७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके होते. सन २०१६ च्या आर्थिक वर्ष अखेरीस हे उत्पन्न २५८ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके वाढेल असे अर्थतज्ञ सांगतात . कृषी प्रक्रिया उद्योग हा देशाच्या एकूण खाद्य उद्योगापैकी ३२ टक्के इतका आहे . देशातील एकूण उत्पादन,विनियोग आणि निर्यात यांचा विचार करता हा उद्योग पाचव्या क्रमांकावर आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात देशाच्या कृषी उत्पादन निर्यातीचे मूल्य ३८ अब्ज डॉलर्स इतके होते. यातील १.९४ अब्ज डॉलर्स निर्यात ही संयुक्त अरब अमिरातीसाठी झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीसाठी होणाऱ्या भारतीय उत्पादनामध्ये प्रामुख्याने बासमती व इतर प्रकारचे तांदूळ, काजू, भाजीपाला,फळ-फळावळे ,मांस -मटण , कांदे, साखर, गहू आणि इतर अनेक घटकांचा समावेश आहे. कृषी विषयक प्रक्रिया उद्योगाला अधिक चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने या उद्योगामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला अनुमती दिली आहे. त्यामुळे आधुनिक यंत्रोपकरणे , सुसज्जित प्रयोगशाळा ,कौशल्य विकसन आदींसाठी मोठी मदत लाभणार आहे. तसेच हे उद्योग क्षेत्र विकसित होणे सुलभ ठरणार आहे. भारताच्या औद्योगिक धोरण आणि विकसन खात्याने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २००० ते सप्टेंबर २०१५ या काळात भारतीय कृषी प्रक्रिया उद्योगात झालेली विदेशी गुंतवणूक ६. ५५ अब्ज डॉलर्स इतकी आहे . भारतीय औद्योगिक महासंघाच्या अंदाजानुसार आगामी दहा वर्षात हे प्रमाण ३३ अब्ज डॉलर्स इतके वाढू शकते. आगामी ४ वर्षात देशात एकूण ४२ ठिकाणी भव्य असे मेगा फूड पार्क उभे करण्याची सरकारची योजना आहे. त्यामधून देशाला अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये उज्वल भवितव्य आहे असे चिन्ह स्प्ष्ट होत आहे. |
Nice article. Very informative too.
regards Praveen Dhavale |
Free forum by Nabble | Edit this page |