बॉलीवूड प्रेमाचा अरबी सागर

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बॉलीवूड प्रेमाचा अरबी सागर

Upendra Bajikar
बॉलीवूड प्रेमाचा अरबी सागर
                                       - उपेंद्र बाजीकर                     
भारतीयांच्या परदेश प्रवासाच्या स्वप्न पर्वातील सर्वात जवळचं आणि लोकप्रिय असं ठिकाण म्हणजे दुबई. इथल्या भारतीय समुदायाची मोठी संख्या आणि त्यांच्या भेटीसाठी येणारे नातलग- पर्यटक यामुळे येथील भारतीय वातावरण सर्वत्र ठळकपणे जाणवते. भारतीयांच्या सोयीसुविधा पाहणाऱ्या अरबस्थानातील या नंदनवनात आपली सिनेसृष्टी रमली नसेल तरच नवल म्हणावे लागेल. कधीकाळी फक्त मुंबईपुरताच मर्यादित असलेला बॉलीवूडचा केंद्रबिंदू आता दुबईत सरकला आहे की काय, असे वाटण्याइतपत सिनेसृष्टीने दुबईला जवळ केले आहे. सिनेमात दिसणाऱ्या मनमोहक लोकेशन्सपुरतेच नव्हे, तर आपल्या जीवनाची गुंतवणूक येथे करण्याची तयारीदेखील बॉलीवूडने केली आहे. सिने कलावंतांना भुरळ घालणारी दुबई आज आपली नवी ओळख सांगते. बॉलीवूडच्या दिग्गज मंडळींनी दुबईतील भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अरब समुदायावरही आपली पकड बसविली आहे.

दुबई-अबुधाबी या शहरांमध्ये निर्माण करण्यात आलेली नयनरम्य लोकेशन्स, टोलेजंग इमारती आणि सिने उद्योगासाठी आवश्यक असे परिपूर्ण तंत्रज्ञान आणि त्यामुळे बॉलीवूडला दुबईचे प्रचंड आकर्षण आहे. फक्त हिंदीच नव्हे, तर तामिळ, मल्याळम आणि आता मराठी सिनेमांच्या शूटिंगसाठी दुबईला पसंती मिळते आहे. पर्यटन उद्योगासाठी नावाजली जाणारी ही वाळवंटातील नंदनवने आता सिनेसृष्टीच्या प्राधान्य यादीवर आपले स्थान भक्कम करीत आहेत.

वास्तविक पाहता अरबी समुद्र आणि अरबस्थानातील रखरखीत वाळवंट इतकीच माफक नैसर्गिक संपती सोबत घेऊन संयुक्त अरब अमिरात हा देश आपली प्रगतीची वाट चालतो आहे. मात्र आपली उणीव हीच आपले बलस्थान बनविण्याची किमया येथे साध्य झाली आहे. निसर्गाने जे दिलेले नाही ते कृत्रिमरित्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्माण करण्याचा प्रयोग इथे सातत्याने घडतो आहे. त्यामुळे समुद्रामध्ये बेटांची निर्मिती करण्यापासून ते चक्क बंदिस्त जागेमध्ये बर्फाचे डोंगर निर्माण करण्याची जादू येथे साध्य झाल्याचे दिसते.

दुबईमध्ये थीम पार्क साकारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून हे बॉलीवूड पार्क साकारलं जाणार आहे. आपल्याकडे हैद्राबाद इथल्या रामोजी फिल्म सिटीचा हा भव्यदिव्य अवतार असेल याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. दुबई- अबुधाबी मार्गावर असणाऱ्या जेबल अली शहरात याची उभारणी सध्या सुरु आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या स्टार्स मंडळींनी या प्रकल्पासाठी आपली गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर मुंबईतील नामवंत स्टुडिओजनी देखील यासाठी सहभागाची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी तर हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेलच पण स्थानिक भारतीय मंडळींसाठी देखील एक अभिमानाच प्रेक्षणीय स्थळ ठरेल, असा दावा या पार्क निर्मात्यांचा आहे. वेगवेगळ्या राईड्स, मनोरंजक खेळ, उद्याने यांची व्यवस्था येथे असणार आहे. त्याचबरोबर अनेक लाईव्ह स्टेज शो, डान्स स्पर्धा, कलाकारांशी थेट संवादाचे समारंभ यांची रेलचल असणार आहे. या व्यतिरिक्त फूड पार्क, इतर व्यवसाय केंद्रेही येथे असणार आहेत.

बॉलीवूडसाठी आता आणखी एक नवे पर्व उत्पन्नाचे स्त्रोत बनले आहे, ते म्हणजे अत्यंत झगमगाटी वातावरणात साजरे होणारे अवार्ड्सचे सोहळे. सिनेसृष्टीत आपला ठसा असो व नसो अवार्ड समारंभासाठी हजर राहण्याची कामगिरी मात्र साध्य करणाऱ्या कलावंतांची नवी फौज आता तयार झाली आहे. मोठ्या पडद्यावर एखाद दुसरा चित्रपट झळकून डब्यात पडला तरी या कलावंताना टी. व्ही. वाहिन्या आणि अवार्ड सोहळे आधार देतात. अनेक बड्या कंपन्यांची स्पॉन्सरशीप  घेऊन साजरे होणारे हे खर्चिक महोत्सव साजरे करण्यासाठी अनेक ठिकाणांनी दुबई समृद्ध आहे. नव्यानेच सुरु झालेल्या अरब- इंडो बॉलीवूड अवार्डसचा सोहळा दुबईत पार पडला. या सोहळ्याला अनिल कपूर, रणबीर सिंग, अनुष्का शर्मा, जावेद जाफरी, मुकेश भट आदी मंडळी तर हजर होतीच. त्याशिवाय या सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या स्टेज शो मध्ये करीना कपूर, वरून धवन, परिणीती चोप्रा यांनी आपले परफॉर्मन्स दिले. सलमान खान आणि प्रियांका चोप्रानेही हजेरी लावून आयोजकांच्या कल्पकतेचे सार्थक केले. असा हा दुबई महिमा आज बॉलीवूड विश्वाला व्यापतो आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या लोकप्रियतेची मोहोर फक्त भारतावरच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या चाहत्यांवर उमटविली आहे. प्रामुख्याने पाकिस्तानी, नेपाळी आणि बांगलादेशी सिनेरसिकांना बॉलीवूडचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे या सर्व सिनेरासिकांचा एकत्रित समुच्चय असणाऱ्या दुबई आणि अमिरातीच्या इतर विभागात बॉलीवूडपटांना उदंड प्रतिसाद मिळतो. छोट्या भारताचे प्रतिरूप असणाऱ्या दुबईतील अनेक मल्टीप्लेक्सना बॉलीवूडपटांचा व्यवसायरुपी आधार महत्वाचा वाटतो. बॉलीवूडसाठी देखील आज परदेशातील मार्केट्स म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. भारतामध्ये निर्माण होणारी एखाद्या चित्रपटाची हवा इथल्या प्रेक्षकांचा उत्साह वाढविते. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शित होणारा नवा चित्रपट कोणता असेल याची आतुरतेने वाट पाहणारे रसिक येथेही आहेत. शुक्रवार हा चित्रपट प्रदर्शनाचा पहिला दिवस तर आहेच, त्याचबरोबर अमिरातीसाठी हक्काच्या साप्ताहिक सुट्टीचाही दिवस असतो. त्यामुळे नव्या चित्रपट प्रदर्शनाला इथे मिळणाऱ्या प्रतिसादाने बॉलीवूड भविष्याच्या प्रतिसादाची गणित मांडत. विशेषत: गल्ला जमविणारे सलमानपट, किंग खानची आगामी आकर्षणे इथल्या रसिकांना मल्टीप्लेक्सकडे खेचून आणतात. त्याचबरोबर दीपिका पदुकोण, करिना कपूर, कतरिना कैफ यांचीही किमया इथल्या रसिकमनांवर आहे. दुबईच्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन बॉलीवूड चित्रपटांची यशस्विता मिरवत अस म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही.

दुबईतील अनेक बड्या मॉल्समध्ये ५० ते शंभर खुर्च्यांची सुसज्ज मल्टीप्लेक्स आहेत. या मल्टीप्लेक्सच्या पडद्यांवर होणारे बॉलीवूडपटांचे दर्शन सिनेरसिकांची हौस भागविते. रमजान ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा सलमानी पायंडा रूजण्यामागे इथल्या लोकप्रियतेची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच किक असो किंवा बजरंगी भाईजान असो, सलमानला दोनशे कोटीची गणित मांडण्यात दुबईचा हातभार लागतोच. भारतात सलमानविषयी जनमत काही असो, त्याच्या चित्रपटांना इकडे मात्र उदंड प्रतिसाद मिळतो.

अर्थात ज्याप्रमाणे चित्रपटांच्या मार्केटींगचे तंत्र आता विकसित झाले आहे, त्याचा पुरेपूर लाभ उठविण्यासाठी बॉलीवूडने कोणतीही उणीव ठेवलेली नाही. सिनेमांचे ट्रेलर, प्रोमोज, स्टेज शो, जाहीर कार्यक्रमांतून हजेरी लावून आपला नवा चित्रपट पाहण्याचे आवाहन करणे ही सारी कौशल्ये पणाला लावली जातात. त्याकरिता देखील या कलावंत मंडळींच्या दुबईवाऱ्या नेहमीच होत असतात. जगभरातील ब्रांडेड चीजवस्तूंचा खजिना दुबईतच मिळत असल्याने येथे होणाऱ्या बॉलीवूड सोहळ्यांमध्ये सहभागासाठी कलाकार सदैव तयार असतात.

आजच्या हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खरतर दुबई हा परदेश राहिलेला नाही. आपल्या सिनेमाच्या यशस्वीतेची गणित मांडून अनेक परदेशात चित्रीकरण करताना दुबईला अनेक कलावंतांनी जवळचं मानलं आहे. त्याचबरोबर भारतातून बाहेर पडून दोन चार दिवसांच्या मनमुराद भटकंतीसाठी दुबई हे अत्यंत सोयीस्कर ठिकाण आहे. दोनचारशे कोटींच्या संपत्तीचे मालक असणारी ही स्टार मंडळी अगदी पुणे- मुंबई असा प्रवास सहज करावा तशी दुबईवारी करतात. खासगी विमाने किंवा हेलिकॉप्टरने अवघ्या तासा- दोन तासात दुबईला पोचण हे काही आता या कलाकारांसाठी नवीन नाही. आपल्याकडच्या असंख्य नागरिकांना जीवनात एकदा तरी परदेशवारी घडावी अशी सुप्त इच्छा मनामध्ये दाबून ठेवावी लागते. परंतु बॉलीवूडकरांसाठी मात्र आता हा डाव्या हातचा मळ झाला आहे. आपल्याला हव्या असणाऱ्या महागड्या ब्रांडेड चीजवस्तूंच्या खरेदीसाठी फक्त शॉपिंगच्या कारणास्तव इथे फेरफटका मारणाऱ्या सिने कलावंतांची सरबराई करणाऱ्या कंपन्यांचेही येथे चांगलेच प्रस्थ आहे. त्यामुळे बॉलीवूड कलाकारांचा येथील संचार हा अत्यंत सहज सुलभ झाला आहे. त्याचप्रमाणे इथल्या भारतीयांसाठी देखील हे आकर्षणाचे केंद्र आहे.  

दुबई म्हंटल की आपल्यासमोर बॉलीवूडच्या अंडरवर्ल्ड  कनेक्शनचा मुद्दाही उपस्थित होतो. कुख्यात डॉन दाउद इब्राहिम बरीच वर्षे दुबईत आश्रयाला होता, त्याची स्वत:ची आणि नातलगांची आर्थिक गुंतवणूक दुबईत आहे. याविषयी सध्याही जोरदार चर्चा होते. अभिनेत्री मंदाकिनी हिने दाउदबरोबरच दुबईत आपला संसार थाटल्याचीही सुरस कथा बॉलीवूड वर्तुळात चघळली जाते. संगीतकार नदीम याने गुलशनकुमार हत्या प्रकरणानंतर दुबईतच आश्रय घेतल्याचेही बोलले जात होते. अशा अनेक कारणांनी बॉलीवूडचे दुबई कनेक्शन यापूर्वी चर्चेत आले आहे. मात्र आता सर्व गोष्टी चर्चेतून मागे पडल्या आहेत. दुबईतील अनेक प्रमुख मार्गांवर असणाऱ्या होर्डीग्जवर सलमान, शाहरुख, कतरिना, करीना आणि दीपिका झळकत आहेत. छोट्या भारताचे प्रतिरूप असणाऱ्या अमिरातीमध्ये आपल्या उद्योगांचे बस्तान बसविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या जाहिरातींमध्ये अर्थातच प्रथम प्राधान्य आहे ते या बॉलीवूड स्टार्सनाच.

दुबईमध्ये असणाऱ्या या बॉलीवूडच्या प्रभावाचा खरा ठसा स्पष्ट होतो आहे तो इथे होणाऱ्या सिनेक्षेत्राच्या गुंतवणुकीमुळे. कोट्यवधींच्या उलाढालीचे व्यवहार करणाऱ्या सिनेकलावंतांना दुबई हे गुंतवणुकीचे सुरक्षित ठिकाण वाटते आहे. दुबईतील सुलभ करप्रणाली आणि पारदर्शक आर्थिक व्यवहार यामुळे कलाकार मंडळी येथे आपली गुंतवणूक करू लागली आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या मंडळींना देखील गाईड अभिमानाने हा शाहरुखचा बंगला आहे, किंवा हा टॉवर सलमानच्या मालकीचा आहे, असे सांगताना दिसतात. सिनेक्षेत्रातील बड्या मंडळींच्या इथल्या मालमत्तांची माहिती रंजक तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या आगामी धोरणांची कल्पनाही देणारी आहे.

अमिरातीमधील रसेल खैमा विभागात नव्याने निर्माण होणाऱ्या डना आयलंड या बेट क्षेत्रामध्ये शाहरुख खानने मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच सध्या दुबईतील महागड्या आणि उच्चपदस्यांची वसाहत असणाऱ्या पाम जुमेरा भागात एक आलिशान बंगलाही खरेदी केला आहे. रॉयल इस्टेट्स ही वसाहत विकसित करण्यासाठी शाहरुख खानने गुंतवणूक केली आहे.

जगप्रसिद्ध अशा बुर्जखलिफा या टॉवरमध्ये १९ व्या मजल्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीची सदनिका आहे. पती राज कुंद्रा याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची भेट म्हणून शिल्पाला ही  सदनिका बहाल केल्याची बातमी माध्यमांनी प्रसारित केली आहे.

दुबईतील डाऊनटाऊन क्षेत्रात असलेल्या टॉवरमध्ये काही सदनिका सोहेल खान याच्या मालकीच्या आहेत. अभिनेता सलमानच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील येथे काही सदनिकाची खरेदी केली आहे. स्वत: सलमान याने पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे.

बिग बी चे चिरंजीव अभिषेक आणि सुनबाई ऐश्वर्या यांनी जुमेराह गोल्फ इस्टेट्स विभागात आलिशान बंगल्याची खरेदी केली आहे. रणबीर कपूर, अक्षयकुमार- ट्विंकल यांनी देखील आलिशान बंगल्याचे बुकिंग केले आहे.

टफ गाय म्हणून नावाजल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीनेही येथील बांधकाम व्यावसायिकांना गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले आहेत. ड्रेस डिझायनर म्हणून काम पाहणारी त्याची पत्नी माना शेट्टी हिने दुबईचे अनेक फ्याशन शो चे आयोजन केले आहे. त्यामुळे या दाम्पत्याच्या येथे नियमित वाऱ्या सुरु असतात.

बॉलीवूडच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील नामवंत मंडळींनी दुबईला आपलेसे केले आहे. त्यामध्ये अंजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या पाम जुमेरातील बंगला खरेदीची चर्चा माध्यमांतून चांगलीच रंगली होती. फुटबॉलपटू डेव्हिड बेकहाम, विम्बल्डन विजेता बोरिस बेकर, अभिनेत्री हिलरी स्व्याक ही आणखी काही प्रतिथयश मंडळी दुबईत आपली मालमत्ता बनवून आहेत.

एकूणच भारतीयांच्या नसानसात भिनलेलं बॉलीवूड प्रेम हे साहजिकच परदेशातील भारतीयांनी सातासमुद्रापार पोचविलं आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड गाजवणाऱ्या कलावंत मंडळींनी या प्रेमाची एन्कॅशमेंट करण्याची पुरेपूर संधी साधली आहे. त्यामुळे दुबईतील बॉलीवूड प्रेमाचा हा सागर सध्या भरतीच्या टप्प्यावर आहे एवढे नक्की.
                                                                                                         
                                                                                                                                      udbajikar @ gmail.com