दुबईत घुमलेला 'नमो'कार

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दुबईत घुमलेला 'नमो'कार

Upendra Bajikar
दुबईत घुमलेला 'नमो' कार
                                            - उपेंद्र बाजीकर   udbajikar@gmail.comश्रोत्यांनी खचाखच भरलेलं स्टेडियम...

चाळीस हजारांहून अधिक संख्येचा जनसमुदाय...

सायंकाळची वेळ असूनही भाजून काढणाऱ्या गरम झळा...

घामाघूम होऊन आणि हातातल्या रुमाल, कागदांनी वारा घेत ‘त्यांची’ तब्बल दोन तास प्रतिक्षा सुरु आहे...

आपल्या नेत्याच्या दर्शनासाठी आणि त्याचे शब्द ऐकण्यासाठी हजारो जण आतुरले आहेत...

भारतामध्ये निवडणुकीसाठी होणाऱ्या सभेचं हे दृश्य नाही, तर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' नावाच्या गरुडाचं भारतीय समाजावर असलेलं प्रभुत्व सिद्ध करणारं प्रतिबिंब होतं...
 मोदी नावाची ही लाट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आपला प्रभाव दाखवित होती आणि अरबस्थानाच्या वाळवंटात 'नमो' कर अखंडपणे घुमत होता.

लघुभारताचे प्रतिरूप असणाऱ्या दुबईतील क्रिकेट स्टेडियमचा प्रत्येक कोपरा उत्साह आणि जल्लोषामध्ये इतका चिंब झाला होता की, उन्हाची आणि घामाची पर्वाही राहिली नव्हती. 'नरेंद्र मोदी' या नावानं भारतीय समाजमनावर घेतलेली मजबूत पकड परदेशातही तितक्याच प्रभावीपणे प्रकट होण्याचा हा प्रयोग म्हणजे एक वेगळीच अनुभूती होती. संभाव्य प्रचंड गर्दी आणि उष्म्याचा धसका घेऊन त्यांच्या सभेचा वृतांत टी. व्ही. वरच (थेट प्रक्षेपणाद्वारे) पाहण्याचा सोयीस्कर पर्याय निवडला. मात्र तूर्तास मुक्काम पोस्ट दुबईच असल्याने या 'नमो' काराची वेगळी अनुभूती शब्दबद्ध करावीशी वाटली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकौशल्याचे अनेक पैलू माध्यमांमधून उलगडत असतात. अर्थात त्यांच्या परदेश दौऱ्याची चर्चा आणि चेष्टा व्हॉटसअपवरही रंगते. मात्र अशा माध्यमांमधील कुचेष्टेचे वार झेलत नमोंच्या जयघोषाचा ध्वनी सर्वदूर घुमतोच आहे. दुबईत घुमलेल्या जयघोषाचा प्रतिध्वनीदेखील आणखी काही वर्षे इथल्या भारतीयांच्या मनामध्ये घुमत राहील, यात शंका नाही.
 
मोदींच्या घोषणेप्रमाणे 'अच्छे दिन' आले की नाही? मोदींची एकाधिरशाही पक्षनेत्यांनादेखील बोचते आहे का? त्यांच्या नावाची लाट अजूनही आहे का, की ओसरली? अशा प्रश्नांची चर्चा भारतात गल्लोगल्ली होतेच आहे. मात्र या सगळ्या टीका आणि उपहासांच्या काट्याकुट्याचा रस्ता तुडवित मोदींचे सरकार वाट चालते आहे. आपण मोदींचे समर्थक व्हावे की विरोधक ह्या संभ्रमाचे वादळ झेलतानाही त्यांच्या लोकप्रियतेची जादू नाकारता येत नाही, असे मात्र कबूल करावेच लागते.

अबुधाबीतील मशिदीच्या भेटीपासून ते त्यांनी केलेल्या दुबईतील प्रभावी भाषणापर्यंतच्या संस्मरणीय प्रवासातील प्रत्येक गोष्टीने इथल्या भारतीयांना प्रभावित केले आहे. त्यांच्या विरोधकांनी केलेल्या त्यांच्या 'मार्केटिंग' ची टीका खरी की खोटी हे सांगता येणार नाही. परंतु त्याचा प्रभाव आहे हे नाकारता येणार नाही. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणल्यास अर्थव्यवस्थेला मजबूती येईल हा विचार त्यांनी कृतीशिलतेने गतिमान केला आहे.

दुबईतील त्यांच्या सभेसाठी ऑनलाईनद्वारे पूर्वनोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याची माहिती स्थानिक वृत्तपत्रामधून प्रसिद्ध होताच धडाधड हिट्स सुरु झाल्या. 'नमो इन दुबई' या नावाच्या वेबसाईटवर अवघ्या चार दिवसातच पन्नास हजाराहून अधिकांनी नोंदणी केली. त्यामुळे सभेचे आयोजक असणारया भारतीय निवासी संघाला नोंदणी स्थगित करावी लागली. स्टेडीयमची क्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे संघाने जाहीर केले. तेवढे होऊनही स्टेडीयमच्या बाहेर स्क्रीनची व्यवस्था करून त्यांच्या भाषणाचा लाभ घेण्याची संधी देण्यात आली.

पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी स्टेडीयमवर भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर झाले. गायन- नृत्याच्या या कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी तर उपस्थितांना लाभली होती. परंतु कार्यक्रमाचे प्रमुख केंद्रस्थान असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची प्रतिक्षा साऱ्यांनाच होती.

दुबईतील प्रमाणवेळेनुसार रात्री ९.१५ च्या सुमारास नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय अशा घोषणेने केली. तसेच आपण भारताबाहेरच्या लघुभारतात आल्याचे जाहीर करून उपस्थितांची मने जिंकली. भारत आणि दुबई यांच्या दरम्यान दररोज ७०० विमाने ये-जा करतात. परंतु भारताच्या पंतप्रधानाला येथे येण्यासाठी ३४ वर्षे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केरळी नूतन वर्षाच्या शुभेच्छा मल्याळम भाषेत देऊन बहुसंख्य केरळी समुदायाला भारावून टाकले. तसेच अबुधाबी येथे मंदिरासाठी जागा देण्याच्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थितांना उभे राहून मानवंदना देण्याचे आवाहन केले. दहशतवादी कारवायांना पाठबळ देणाऱ्या शक्तींच्या विरोधात कृतीशील होण्यासाठी आपण अमिरातीशी आपले हितसंबंध दृढ केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी उपस्थितांनी 'मोदी मोदी' असा जयघोष करून संपूर्ण मैदानात चैतन्य पसरविले.

भारत देश आज प्रगती साधतो आहे. मात्र ही प्रगती भारताबाहेर असणाऱ्या लाखो भारतीयांच्या मदतीतूनच शक्य होणार आहे. त्यामुळेच आता या भारतीयांसाठी विशेष मदतीचा हात पुढे करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. संयुक्त अरब अमिरातीमधून सुमारे ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात होण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच भारतावर विश्वास आहे म्हणूनच ही गुंतवणूक शक्य झाल्याचेही स्पष्ट केले. हे प्रेम केवळ नरेंद्र मोदी या व्यक्तीवर नसून संपूर्ण भारतीय जनतेवर आहे असेही मत मांडले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळात भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, या मागणीसाठी संयुक्त अरब अमिरातीचा पाठींबा लाभल्याची माहिती त्यांनी दिली. येथे राहणाऱ्या भारतीयांना आवश्यक मदतीसाठी भारतीय दुतावासात विशेष सहाय्यक विभाग सक्रिय केल्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्या प्रभावशाली भाषणाने भारतीयांची मोठी गर्दी खेचू शकण्याचे सामर्थ्य असणारा नेता अशी मोदींची प्रतिमा आता भारताबाहेरही दृढ होऊ पाहते आहे एवढे मात्र या दौऱ्याने सिद्ध केले आहे.

तब्बल ३४ वर्षांच्या काळानंतर संयुक्त अरब अमिरातीला भेट देणारे भारतीय पंतप्रधान असा उल्लेखनीय गौरव मोदी यांनी मिळविला. या दौऱ्याचे बाकी फलित काय असा प्रश्न जनसामांन्यांना पडणार नाही, परंतु अबुधाबीमध्ये एका मंदिराच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करवून घेण्याची मोदी यांनी केलेली किमया निश्चितच स्वागतार्ह आहे. अर्थात अबुधाबीमध्ये झालेल्या या शुभारंभामध्येच दौऱ्याची सार्थकता साध्य करून मोदींनी बरेच काही साधले आहे. अमिरातीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी चक्क प्रोटोकॉल दूर सारून मोदींचे स्वागत केले. हा स्वागत सोपस्कार पार पडण्याची जबाबदारी परराष्ट्र मंत्र्यांकडेच असते. अमिरातीचा कारभार चालविणारे सर्वेसर्वा असणारे शेख बंधू यावेळी उपस्थित होते, हे ही विशेष.

स्वागत समारंभानंतर मुख्य दौरा सुरु झाला. सर्वप्रथम मोदी यांनी अबुधाबीतील शेख झायेद मशिदीला भेट दिली. त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजार असलेल्या भारतीय गर्दीने त्यांना 'मोदी-मोदी' च्या अखंड गजरात मानवंदना दिली. मशिदीच्या परिसरात मोदींच्या स्वागताचा गजर होणे आणि तोही अमिरातीच्या इस्लामिक राष्ट्रात होणे ही अशक्यप्राय किमया येथे घडली. शेख झायेद मशिदीचा भव्य परिसर, तेथील स्थापत्यकौशल्य आणि वास्तूरचनेची  मोदींनी अगदी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्याचप्रमाणे तेथील अभिप्राय वहीत आपले मनोगत नोंदविले.

मोदी जे काही करतील त्याची चर्चा करणं हा आता माध्यमांच्याही आवडीचा खेळ झाला आहे. त्यामुळे मोदींच्या ह्या मशीद भेटीवेळी अनेक न्यूज वाहिनींवर वेगवेगळ्या पक्षनेत्यांची मते आजमावण्याचा टाईमपास खेळ सुरु झाला होता. भारतामध्ये मोदी मशिदीत जात नाहीत. इफ्तार पार्टीत सहभागी होणे टाळतात असे असताना त्यांची ही 'भेट' म्हणजे ढोंग आहे का, अशा वक्तव्यांना अगदी उधाण आले होते. मात्र जेथे मोदी प्रत्यक्षात होते ती अमीरातीची भारतीय जनता मात्र सारे भेद विसरून फक्त मोदींच्या गजरातच भारावून गेली होती. त्यामुळेच मोदींनी शेख बांधवांच्या समवेत काढलेले सेल्फी देखील तितकेच चर्चेचा विषय ठरले. मोदींच्या सेल्फीचा मुद्दा माध्यमांसाठी नवे 'खाद्य' ठरले होते.

अबुधाबीतील कष्टकरी कामगार वर्गाची भेट घेण्यासाठी ठरविलेल्या भेटीनुसार 'आयकॅड' येथील लेबर कॅम्पमध्ये मोदींनी कामगारांशी संवाद साधला. आपण कुठल्या राज्यातून आलात? इथे किती वर्षे राहता असे प्रश्न विचारून मोदींनी या कामगारवर्गाशी संवाद तर साधलाच, त्याचबरोबर सामुहिक फोटोसाठी पोझही दिली. या कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीमध्ये अबुधाबी येथे मंदिराच्या जागेसाठी मंजुरी देण्याची अधिकृत घोषणा झाली.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांचा प्रारंभ मसदर शहराच्या दौऱ्याने झाला. केवळ सौरउर्जेचा वापर करून दैनंदिन व्यवहार, कामकाज चालविण्याची येथील अत्याधुनिक तांत्रिक प्रगती पाहून मोदींनी प्रशन्सोद्गार काढले. त्यानंतर गुंतवणूकदारांची बैठक घेऊन भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने अल्प किंमतीमधील  गृहबांधणी तंत्रज्ञान विकसीत करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया, पर्यटन उद्योग आणि उद्योजकता या दृष्टीने गुंतवणूक होण्याबाबत येथे चर्चा झाली. भारतातून अमिरातीमध्ये येणाऱ्या सामग्रीचे योग्य हस्तांतरण करण्यासंदर्भात उहापोह झाला. त्याचबरोबर अमिरातीप्रमाणे पायाभूत सुविधा निर्मितीचे उद्योग भारतात सुरु करण्याची सूचना पंतप्रधानांनी मांडली. त्याला उद्योजक वर्गातून प्रतिसाद मिळाला.

सायंकाळी अमिरातीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमधून दोन्ही देशातील हितसंबंध दृढ करण्याचा प्रमुख मुद्दा चर्चेस घेण्यात आला. दहशतवादी कारवाया करणाऱ्या संस्था आणि त्यांना मदत करणारी राष्ट्रे यांच्याबाबतीत ठाम भूमिका घेऊन प्रभावी पावले उचलण्याचा निर्णय झाला. कायद्याचे उल्लंघन करून होणारे आर्थिक गैरव्यवहार, अंमली पदार्थ तस्करी आणि तत्सम गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी परस्पर सहकार्याचा मुद्दाही संमत करण्यात आला. सायबर क्राईम आणि तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर अंकुश ठेवण्याचे धोरणही निश्चीत करण्यात आले. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थांची संयुक्त बैठक दर सहा महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले. सागरी सुरक्षेच्या महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा झाली.

नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यानंतर भारत आणि अमिरातीचे संबंध दृढ होण्याची शक्यता स्पष्ट आहे. त्याचबरोबर भारतातील अनेक उद्योगांना अमिरातीमध्ये प्रवेशही सुकर होणार आहे. अमिरातीसह इतर आखाती देशांमधील विविध उद्योगांची कामे भारतीय कंपन्यांकडे चालून येण्याची चाहूल लागली आहे. संगणक क्षेत्र, बी. पी. ओ., व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतीय सहभाग वाढण्याचे सुचिन्ह निर्माण झाले आहे. नव्याने काही उद्योग- व्यापारांच्या शाखा दोन्ही देशांसह जगभरात पसरण्याच्या आशावादाचे बीज या दौऱ्याने रोवले आहे. एजीस, टाटा कन्सलटन्सी या कंपन्यांनी आपले जाळे आखाती देशात पसरविले आहे. त्यांनी नव्या व्यवसायांच्या शाखा भारतात सुरु करण्याचा मानस जाहीर केला आहे. त्यामुळे व्यवसाय आणि रोजगाराची नवी दालने खुली होण्याचा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.

'अच्छे दिन केंव्हा येणार?' या प्रश्नावर नेहमी निरुत्तर होणाऱ्या तुम्हा आम्हा सामान्य भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तराची अपेक्षा आहे. ते उत्तर मिळेल कि नाही याची शाश्वती देता येत नाही. ज्या उत्साहाने मोदींना जनतेने देशाचे सिंहासन बहाल केले, तो उत्साह अद्याप टिकून आहे असेही खात्रीने सांगता येत नाही. मात्र मोदींच्या लोकप्रियतेचा आणि त्यांच्या नावाच्या जादूचा प्रभाव आज जगभरात वाढतो आहे याबद्दल शंका घेण्यासाठी तूर्तास जागा नाही, एवढेच म्हणावे लागेल.Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: दुबईत घुमलेला 'नमो'कार

ROHAN  PASTE
अप्रतिम लेख सर. भलेही दुबईत 'नमो' कार घुमला असला तरी सध्या ई-साहित्यवर तुमच्या लेखणीचा आवाज घुमत आहे. इथे बेळगावात बसून दुबईतील मोदींचा दौरा अनुभवल्याचे प्रत्यय आले. खूप छान... असेच तेथील अनुभव, माहिती आम्हाला मिळत राहो. पुढच्या लिखाणाला शुभेच्छा !!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: दुबईत घुमलेला 'नमो'कार

rupali
 दुबईत 'नमो' कार घुमला
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: दुबईत घुमलेला 'नमो'कार

upendra bajikar
In reply to this post by ROHAN PASTE
thanks rohan