जुन्या काळचे सोनेरी दिवस, नितळ संस्कृती.....

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जुन्या काळचे सोनेरी दिवस, नितळ संस्कृती.....

साजीद यासीन पठाण
जुन्या काळचे सोनेरी दिवस, नितळ संस्कृती आपल्या हातून निसटून गेल्याची खंत मनाला राहून राहून वाटते, कधी कधी वाटतं निवांत बसावे आणि आपल्या हातून निसटून गेलेल्या त्या त्या क्षणांना डोळ्यांच्या कोंदणात साठवून घ्यावे. त्या विचारांचे जहाज घेवून आठवणींच्या मुक्त सागरात मनसोक्त हिंडून यावे.  लहानपणच्या हळव्या भावनांना  आठवताना आपण केलेल्या उत्साहवर्धक, रोमांचकारी गोष्ठी समोर आणाव्यात आणि त्या धुंद  करणाऱ्या वातावरणामध्ये चिंब भिजून जावे. पुन्हा एकदा आट्या - फाट्या, सूर पारंब्याचा खेळ खेळावा. पुन्हा लहान होऊन रात्री आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन इतिहासातील साहसकथा, किंवा संस्कारकथा ऐकण्याचा अनुभव घ्यावा. जलद बातमीच्या, channel च्या जमान्यात ये आकाशवाणी है अशी हिंदी सुरुवात करून सांगीतलेल्या बातम्या, प्रभातीचे रंग, छायागीत इत्यादी कर्णमधुर कार्यक्रम ऐकावे. प्रभाती कानावर येणाऱ्या वासुदेवाच्या वाणीतून समाजावर केलेलं भाष्य ऐकावं. दारामध्ये टाकलेला शेणाचा सडा आणि त्यावर रेखाटलेली रांगोळी यांना डोळ्यात  साठवून घेत वडिलधाऱयांपुढे नतमस्तक व्हावं . मॉम, मम्मी या शब्दांपलीकडे जाऊन आय, माय या शब्दातील गोडवा, आर्तव अनुभवावं. परंतु आता ती दुनिया काळाच्या पडद्याआड गेल्याचे शल्य मनाला नेहमीच राहील. केबल च्या जमान्यात आणि सिमेंटच्या जंगलात आता ते गाव ही बदलून गेल्याचं दुःख अश्वथाम्याच्या जखमेसारखे माझ्या मनाला सतत आतल्या आत सलत राहतं.

- साजीद पठाण

कुणीतरी अगदी खरं म्हटलंय -
 
“रखरखत्या, खडबडीत  हातांनी आलंबलं घेणारी ती आय नाय,
आणि श्रद्धेने नतमस्तक व्हावे, असे कुठेच उरले पाय नाय !”

जुन्या आठवणींना ताज्या करणाऱ्या प्रा. अरुण म्हात्रे सर आणि परतवाडा जि. अमरावती येथील श्री. अनिल पाटील
यांच्या  दोन कविता तुम्हा मराठी साहित्यिक वाचक मित्रांसाठी देत आहे. ज्या कविता वाचताना माझं  मन नेहमी जुन्या काळामध्ये हरवून जातं. मला स्वतःला खूप हळवं करतं. तुम्हाला पण जुन्या आठवणीत रमताना पटत असेल कि खरंच,

"गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"
- साजीद पठाण
-
श्री. अनिल पाटील त्यांच्या “गाव” या कवितेमध्ये ते  म्हणतात –

कोकिळेचा सूर गेला, कावळ्याची काव आता,
कालचा तो ओयखीचा, गाव नाही गाव आता !

सांज होता सांज वक्ती, माय सांगे आज लेकी,
नेम नाई चांदण्याचा, दार खिडक्या लाव आता !

ढेकलावानी मुरीनं, कायजीनं जिंदगीच्या,
जींदगानी मानसाची, कागदाची नाव आता,

रंग प्यारा धर्म प्यारा, होत गेला माणसाले
फाटन्याले देश माहा, वावळीचा ताव आता !
 
खापरीवानी कवाची, आज आली जींदगानी
काय कवलाचा भरोसा, घर नव्यानं छाव आता !

ओठ माहे दात माहे, गाव माहा देश माहा
सांग कोनाले दाखवू , कायजाचे घाव आता !
     
                            - कवी श्री. अनिल पाटील

आणि निघून गेलेल्या त्याच दिवसाविषयी जेष्ठ कवी प्रा. अरुण म्हात्रे म्हणतात -

" ते दिवस आता कुठे ? जेंव्हा फुले बोलायची,
दूर ती गेली तरीही सावली भेटायची,
ते दिवस आता कुठे ? ....

गवतही भोळे असे कि साप खेळू द्यायचे,
सोडताना गाव त्यांचा कात हिरवी व्हायची,
ते दिवस आता कुठे ? ....

 वर निळी कौले नभांची, डोंगरांची भिंत ती,
ते नदी काठी भटकणे, हीच शाळा व्हायची,
ते दिवस आता कुठे ? ....

 फाटके होते खिसे अन नोट ही न्हवती खरी,
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची
ते दिवस आता कुठे ? ....

                    - कवी प्रा. अरुण म्हात्रे