परक्या घरकुलाची गोष्ट

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

परक्या घरकुलाची गोष्ट

Upendra Bajikar
परक्या घरकुलाची गोष्ट
                                                       - उपेंद्र बाजीकर udbajikar@gmail.comपहाटेचे पाच वाजताहेत... थोड्या फार मिनिटांच्या अंतराने प्रत्येक खोलीतल्या वेळेचा गजर होतो आहे...
अन त्या वेगवेगळ्या अलार्म ट्युन्सच्या साथीने पहाटवेळी दिवेलागण सुरु होते आहे.
 ढगांमधून डोके वर काढून सूर्यदेवाने आपले दर्शन देण्यापूर्वीच दिवेउजेडात आपला दिनक्रम सुरु करण्याचा प्रघात हा दुबईतल्या दिनचर्येचा भाग आहे. सकाळी सात वाजता ऑफिसात हजर व्हायचं म्हणजे त्यासाठीची पूर्वतयारी पाच सव्वापाचपासून सुरु करावी लागते आणि तुम्हाला नेण्यासाठी येणारी गाडी सव्वासहा वाजता तुमच्या इमारतीसमोर उभी राहते... दुबईतील श्रमजीवी- कामगार वर्गाच्या या दिनचर्येच्या साक्षीदार आहेत इथल्या लेबर कॅम्पच्या इमारती. तात्पुरत्या आश्रयासाठीची 'हक्काची' खोली देणारं हे परकं घरकुल हजारो बांधवांनी आपलं मानलं आहे, त्यामुळेच येथील वास्तव्याच्या जीवनाभुवाची गोष्टच निराळी आहे.
 
घरकुलं म्हंटलं कि तिथे आपलेपणा, जिव्हाळा या शब्दांशी आपसूकच नातेबंध जोडला जातो. घरपण जपण्यासाठी सतत सजग ठेवणारं, सातत्याने त्याचाच विचार करायला लावणारं आणि प्रत्येक गोष्टीबाबत आपलेपणा जपणारं तेच आपलं घरकुल असं आपण मानतो. मात्र परदेशात नोकरी करताना मिळणारं तात्पुरतं परकं आश्रयस्थानच आपलं घरकुल बनून आपली सोय पाहतं. आज इथं तर उद्या तिथ अशा भटकंतीची जाणीव रुजवून आणि इथलं बस्तान केव्हाही हालवावं लागेल, याची तयारी ठेऊन अशा कॅम्पसमधून  हजारो बांधव राहतात. कष्टाच्या कामांचा थकवा आणि कार्यालयीन कामकाजाच्या ताणतणावानंतर आवश्यक अशा विश्रांतीसाठी हक्काची जागा म्हणून अशा निवासव्यवस्थेची सोय दुबईमध्ये आहे. औद्योगिक वसाहतींचे प्राबल्य असणाऱ्या अबुधाबी, दुबई, शारजाह आणि इतर शहरांमधील अशा कॅम्पसच्या  वसाहतीनी इथल्या समाजजीवनाशी जोडलेला, तरीही एक समांतर असा जीवनप्रवाह या वसाहतींनी निर्माण केला आहे. परदेशात एकाकी राहून आपल्या आप्तेष्टांसाठी राबणाऱ्या कामगारवर्गाचे जीवनबंधच या वसाहतींशी बांधले गेले आहेत. अमिरातीमधल्या  अनेक विमानतळांवरून येथे दाखल होणाऱ्या परकीय बांधवांचे स्वागत करणाऱ्या वाहनांचा संचार येथे रात्रंदिवस सुरु असतो.
खासगी क्षेत्रातील हजारो उद्योगसमूह आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा कॅम्पमधून त्यांची निवासव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता स्वमालकीच्या किंवा भाडेतत्वावर घेतलेल्या इमारती उपलब्ध करवून घेतल्या जातात. कंपन्यांची ही   गरज ओळखून बांधकाम व्यावसायिकांनी त्यानुसार याची पूर्तता केली आहे. कमीतकमी जागेमध्ये अधिकाधिक लोकांना सामावून घेणारी दहा बाय बाराची खोली आणि आवश्यक सोयींची व्यवस्था हे इथल्या घरकुलाचे स्वरूप. ऑफिसमध्ये  काम करणारा स्टाफ आणि श्रमाची कामे करणारे कामगार यांच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था येथे असते. लेबर कॅम्पमध्ये एका खोलीत एकावर एक अशा बंक बेडच्या सहाय्याने सहा जणांची निवास व्यवस्था होते. कामावरून परतल्यानंतर बेडवर आडवे होणे किंवा रूमबाहेर भटकणे या दोन पर्यायांची निवड करण्याची संधी (?) याद्वारे लाभते. या सुविधांचा लाभ ना खंत, ना खेद या तत्वावर घेण्याचे धडे इथली व्यवस्था पावलोपावली देते.


चाळ संस्कृतीशी साधर्म्य
पूर्वीच्याकाळी मुंबईत गिरणी कामगार वर्गासाठी बांधलेल्या चाळींच्या संस्कृतीशी साधर्म्य साधणारा हा निवाससंस्कार आहे. त्यामुळे लेबर किंवा स्टाफ कॅम्प म्हणजे आधुनिक चाळ संस्कृतीचेच स्वरूप म्हणावे लागेल. दिवसभर कष्ट करून थकलेल्या आणि पोटासाठी राबणाऱ्या जीवांच्या पाठीला आधार देणारी कॅम्पमधली खोली आपलीच वाटण्याचं नाते इथे निर्माण होते.
कॅम्पसमधीलकामगारवर्गाच्या तुलनेत स्टाफसाठीच्या खोल्यांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध असतात. फक्त दोन किंवा तीन जणांचे वास्तव्य, खोलीसाठी बाथरूम- टॉयलेटची सुविधा ह्या सोयी येथे लाभतात. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी वर्गाचा दर्जा उंचावल्याचे समाधानही मिळते. कॅम्पच्या खोल्यांमधून एसी आणि इंटरनेटची सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आलेले असल्याने येथील विश्रांतीपर्व सुखाचे ठरते. आख्खा दिवस कामाच्या रगाड्यात जात असला तरीही हक्काच्या विश्रांतीचं आणि मन रमविण्याचं ठिकाण म्हणजे आपली खोलीच. वैयक्तिक स्वच्छतेपासून ते भोजन व्यवस्थेसाठी योग्य म्हणून या सुविधेचा लाभ घेता येतो. आपल्या घराचं स्थान या खोलीला प्रदान करून एकमेकांच्या सोबतीने इथले जीवन व्यतित करणारे समदु:खी बांधव येथे भेटतात.
रोजच्या वेळापत्रकात जखडले गेलेले तरीही सोबतीने जीवन व्यतित करणारे कॅम्पमधील सहकारी हे आपले इथले सगेसोयरे बनतात. रोजच्या घडामोडी आपल्याबद्दलच्या गप्पाटप्पा आणि गावाकडच्या आठवणींची देवाणघेवाण रूममेट्सबरोबर होतं. बाजारपेठेत किंवा फिरायला एकत्रित जाणं, पदार्थ बनवून खाणं, जेवण करणं आणि गरजेप्रसंगी एकमेकांना शक्य ती मदत करण्याची संस्कृती येथे जपली जाते. आपल्या रूममधील किंवा शेजारील एखादा सहकारी आजारी पडला असेल तर त्याची चौकशी करणे, त्याच्या कंपनीत किंवा घरच्यांना कळविणे असा मदतीचा हात पुढे करण्याचा संस्कार येथे टिकलेला आहे.
कॅम्पच्या या वसाहती म्हणजे इथली मोठी उपनगरेच बनली आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सोयीसाठी आवश्यक वस्तूंची पूर्तता करणारी बाजारपेठही निर्माण होणे स्वाभाविकच. दैनंदिन गरजांची पूर्तता करणारी व्यवसाय केंद्रे येथे विकसित झाली आहेत. हाती येणाऱ्या कमाईतील मोठा भाग घरच्यांसाठी राखून आपल्या बजेटमध्ये महिन्याची दोन टोकं गाठण्याची धडपड इथला श्रमजीवी वर्ग करत असतो. त्या वर्गासाठी योग्य दरातील चीजवस्तूंची व्यवस्था इथल्या मार्केटमधून करून दिली जाते. रोज लागणारा भाजीपाला, कांदे, मिरच्या, बटाटे, टोमॅटो आदींची उपलब्धता मुबलक असते. दुध, दही, ताक, शीतपेय, पॅकबंद खाद्यपदार्थ यांचीही सहज उपलब्धता होते. छोट्या सुपर मार्केट सारखीच व्यवस्था येथे असते. त्यामुळे सायंकाळी रूमवर परतल्यानंतर या मार्केटचा फेरफटका मारून उद्याची सोय करण्याचा दिनक्रमही येथे रुजला आहे. ब्रेड, चपाती, रोटी यांची पाकिटे देणाऱ्या बेकरी प्रमाणेच ताजे गरम पराठे, पठाणी रोटी, पाकिस्तानी रोटी देण्याच्या भट्ट्या (ज्यांना बेकरी असेच नाव आहे.) इथल्या रोजच्या जगण्याचा आधार आहेत. त्यांची खरेदी करून आपल्याला कालवण बनवून रोजचे भोजन करणाऱ्या मंडळींसाठी इथली रोजची फेरी ठरलेली असते. अगदी मांसाहार प्रेमींसाठी अंडी, चिकनपासून ते बीफ, पोर्क, माशांचे प्रकारही रोज खरेदी केले जातात.
या वसाहतीमधून छोट्या विक्रेत्यांचे बस्तानही बरेचवेळा  दिसते. फळफळावळे किंवा इतर किरकोळ वस्तूंची विक्री करून काही मंडळी पैसे कमविण्याचा प्रयोग करतात. घाऊक बाजारातून अल्पदराने आणून केळी, संत्री, आंबे, सफरचंद, द्राक्षे अशा फळांची विक्री करण्याची ठरलेली जागा असते. प्रामुख्याने बांगलादेशी मंडळी यात अधिक आहेत. दिवसभर काही कार्यालये किंवा बंगल्यामधून  साफसफाईची कामे करणे त्यानंतर सायंकाळच्या वेळी अशा विक्री कौशल्यातून जोडकमाई करण्याचे कसब या मंडळीनी साधले आहे. त्यांची ही विक्री सेवा इथल्या ग्राहकवर्गाकडून  स्वीकृत झालेली आहे.

बाजारातून सामग्री आणून झाली खरी, परंतु त्याचे पदार्थामध्ये रुपांतर कसे करणार? आपल्या पसंतीनुसार एखादी फर्मास चीज कशी बनविणार याचा प्रश्न सोडविण्यासाठी कॅम्पसमधील सामूहिक किचन सज्ज असते. आपल्या इमारतींमध्ये असणारे किचन आणि तेथे वाट्याला येणारे एखादे छोटे कपाट हे आपले स्वयंपाकघर असते. इथल्या कर्मचाऱ्यांच्या पोटासाठीचा सोबती म्हणजे हे किचन असते. दररोज सायंकाळच्या वेळी अनेक जण येथे येतात, आपली शेगडी निवडतात आणि पदार्थ शिजवण्याचा अन्नसंस्कार पार पाडतात.वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या प्रांतातून पोटासाठी इथवर आलेली अनेक मंडळी या किचनमध्ये एकत्र येवून आपल्या संस्कृतीप्रमाणे आहार बनवून घेतात. तू काय बनवतोयस? असा प्रश्न एकमेकाला विचारात अनेक प्रांताची आहारसंस्कृती माहित करून देण्यासाठीचं हे संमेलनच असतं जणू. भाजी, डाळ, आमटी, मासे, चिकन बनविण्याच्या प्रत्येक प्रांताच्या वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्रित संगम येथे दिसतो. कुणी केरळी पद्धतीने मासे आणि सांबार बनवीत असतानाच शेजारी कुणी पठाणी आपल्या पसंतीचा पदार्थ शिजवत असतो. पराठे आणि रोटी असे प्रकार आपल्या कौशल्याने बनवणाऱ्या पंजाबी महाभागांना बघून मी त्यांना आदरभावाने वंदन केले आहे. सायंकाळी बनविलेल्या या कालवणाचा ठेवा दुसऱ्या दिवशी ऑफिसात नेवून दुपारची सोयही  साधण्याचा वसा येथील मंडळी जपतात.
पोटापाण्याचा हा प्रश्न सुटल्यानंतर इतर दैनंदिन गरजांच्या सुविधाही येथील वसाहतींमध्ये उपलब्ध असते. सलून असो, किंवा आरोग्यसेवा आणि औषधविक्री करणाऱ्या स्टोअर्सची सुविधा येथे असते. स्वयंपाक न करणाऱ्या मंडळींसाठी मेस, हॉटेल्स यांची सोय आहे. चहा- सामोसा देणाऱ्या छोट्या टपऱ्यापासून ते मल्टीक्युझिन रेस्टोरंटपर्यंतच्या सुविधा येथे असतात. त्यामुळे या वसाहतींमधील वास्तव्य सुलभ आणि सुसह्य होते. कॅम्प्समधून राहणाऱ्या मंडळींना उपयुक्त ठरतील अशी चलन विनिमय केंद्रे, विमानतिकिटे  देणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, फोटो स्टुडिओ अशी सेवाही येथे असते.महिला वर्गासाठी स्वतंत्र कॅंप्स

प्रामुख्याने पुरुष कामगार वर्गासाठी अशा लेबर कॅम्प्समधील इमारतींची व्यवस्था आहे. मात्र फिलीपाईन्स आणि आफ्रिकन देशातील काही महिला कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी स्वतंत्र लेबर कॅम्प बनविले आहेत. मॉल्समधील सेल्सगर्ल, विविध कार्यालयांमधील ऑफिस स्टाफ, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी महिलांची सोय अशा कॅम्प्समधून  करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि नियम कार्यवाहीची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. स्त्री- पुरुष समानतेचे कृतीशील स्वरूप येथे पहावयास मिळते.
कॅम्पच्या या वसाहती शहराच्या मुख्य भागांपासून दूर असल्याने इथपर्यंत पोचण्यासाठी बस, मेट्रो, खासगी वाहन यांचा आधार घ्यावा लागतो. सुटीच्या दिवशी भटकंतीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या मंडळीसाठी अधिक बसेस आणि सुविधा देण्याचे धोरण राबविले जाते. ही बाब गरजूंसाठी सोयीची ठरते. कॅम्प्समधून बाहेर जाणारी मंडळी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेत असतात.
कॅम्पवासियांना गरजेची ठरणारी आणखी एक सेवा म्हणजे मोबाईल सेवा आहे. आपल्या मायदेशी फोन  कॉल्स करण्यासाठी आपल्या फोनमध्ये ' बॅलेन्स' राखून ठेवणे गरजेचे असते. हा बॅलेन्स ट्रान्सफर करून देणारे युवा व्यावसायिक आपल्याला पावलोपावली गाठ पडतात. आपण या वसाहतींमधील मार्केट परिसरात फिरताना आपल्याला बॅलेन्स चाहिये? असा प्रश्न विचारून भंडावतात. अनेकांसाठी तो गरजेचाही असतो. तसेच त्यामधून कमिशनपोटी मिळणाऱ्या दोन- चार दिरामसाठीची ही धडपड असते.

या सुपर मार्केट्स परिसरात क्रिकेटच्या मोसमात उत्साही वातावरण असते. कारण एखाद्या कोपऱ्यात मोठ्या स्क्रीनचा टी. व्ही. लावून मॅच पाहण्याची सोय करण्यात येते. नुकत्याच झालेल्या विश्वचषक सामन्यांच्या आणि आय. पी. एल.  स्पर्धेच्या वेळी तर या उत्साहाला उधाण आले होते. वेगवेगळ्या देशांमधून इथे येणाऱ्या बांधवांसाठी हा क्रिकेटप्रेमाचा धागा समानतेचा ठरतो. भारत, पाकिस्तान आणि  बांगलादेशीय मंडळींची बैठक येथे एकत्रित भरते. आपापल्या प्रिय देशाच्या खेळांचा आस्वाद घेण्याकरिता उत्सुक मंडळींच्या क्रिकेटवेडाची झलक येथे प्रकट होते.
 
घरापासून दूर, तरीही आपलेच म्हणावे असे वास्तव्याचे हे निवासस्थान दुबईने या कॅम्पच्या रूपाने दिले आहे. आपल्या रोजच्या व्यवहारातील घडामोडींची साक्षीदार बनून कॅम्पमधील ही खोली आपली सोबत करते. कंपनीच्या निर्णयानुसार खोली बदलाची व्यवस्थाही होऊ शकते. मात्र जीवनप्रवाह अशाच पद्धतीने सुरु राहतो. एखाद्या जागी फार दिवस राहिलो तर त्या जागेचा मोह होण्याची शक्यता असते, म्हणून साधू, संत- महंत मंडळी एका जागी फार दिवस राहत नाहीत, असे म्हणतात. लेबर कॅम्पमधील  जगणे हा असाच उदात्त विचार रुजविणारा जीवनप्रवाह आहे, असे मला वाटते. आपला मायदेश दूर ठेऊनदेखील तेथील आप्तेष्टांसाठी जगणाऱ्या मंडळींना आपल्या घरकुलाची आठवण ठायीठायी येत असतो. त्याचे प्रतिबिंब कॅम्पमधील सोबत्यांशी चर्चेवेळी उमटत असते. कामकाजाचा डोंगर झेलताना देखील तिथल्या आठवांची सोबत दिलासा देत असते. 'घर कब आओगे?' अशा गीतांच्या ओळीप्रमाणे सातत्याने सामोरा येणारा, परत कधी येणार? हा प्रश्न अंगावर झेलत या परक्या घरकुलातील प्रवास सुरु असतो. आणि यालाच 'जीवन ऐसे नाव' असे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही सुरु असतो.