“आईचं प्रेम”

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

“आईचं प्रेम”

Santosh Rane
“आईचं प्रेम”

आई चैत्राची पालवी
माया, ममतेचा झुला
वात्सल्याच्या गंधातूनी
घर आंगण खुलवी

आई वैशाखाच ऊन
छत्र छायेची माऊली
भोगी दुःखाचे चटके
उभी होऊन सावली

वाट पाही पावसाची
ज्येष्ठ मेघांच्या आडून
भेट माय लेकरांची
येते कंठात दाटून

मेघ मल्हाराची धून
आई आषाढाच्या सरी
तिचं विठ्ठला नमन
चालूनी संसाराची वारी

आई श्रावण क्षितीज
ऊन पावसाचा खेळ
तिच्या डोळ्यातून उमटे
सप्तरंगी धनुष्यी मेळ

गौरी गणपतीचा थाट
आई हिरवा भादवा
खेळ झिम्मा फुगडयांचा
लेकी - सूनांना भेटवा

पिवळ्या केशरी झेंडू माळा
विश्वमातेचा नवरात्री सोहळा
नऊ मास नऊ दिस
आई सोसे गर्भवास


आषाढ अश्विन अमावस्या
केली दिव्यांची आरास
आई तुझेच पूजन
तोची आम्हा मातृदिन


आई दीपावलीची शोभा
आई कार्तिकाचा मास
मला दाविलास देव
टिपूर चांदण्या रात्रीस

भक्ती भरलेला मास
कृष्ण स्वये मार्गशीर्ष
तुझ्यामुळे आलो जन्मास
लाभले देवाचे आशिष

पौष माघाच्या थंडीत
भास्कर मकर राशीत
तीळ-गुळ पोळ्या झाल्या फस्त
बाळ शिरे मायेच्या उबेत

नाना रंगांच्या दुनियेत
आई सावध फाल्गुन
जाळी दुर्गुणांची होळी
वसंत घालूनी ओंजळी

बारा मासांची रचना
आहे आईच्या देहात
देवही अखंड डुंबला
न्हाला आईच्या प्रेमात

संतोष कृष्णा राणे
सांताक्रूझ (पूर्व)
९२२४३१६३१०