जीवाची दुबई

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जीवाची दुबई

Upendra Bajikar                                                                                                                                 उपेंद्र बाजीकर, दुबई  
                                                                                                                         udbajikar@gmail.com
     

 

   युवर अटेंशन प्लीज......
  फ्लाइट नंबर एस. जी.51-
  पुणे टू शारजाह.... रेडी टू फ्लाय
  अशी अनाउन्स्मेंट झाली....
आणि विमानाने झेप घेतली...
एरवी घरावरून जाणारे विमान पाहण्यासाठी रस्त्यापर्यंत धावत जाणारा मी आज अगदी खरच विमानात बसलो होतो आणि  आयुष्यातला पहिला वहिला विमानप्रवास करत होतो....
सार्यांसाठी पहिला विमानप्रवास उत्कंठावर्धक आणि उत्साहाने भरलेला असतो असे म्हणतात,. मला मात्र हा प्रवास खूप क्लेशदायक होता...
कारण वयाची चाळीशी पूर्ण झाल्यानंतर आयुष्याला नव्याने सुरूवात करण्याचा हा प्रवास होता....
योग्य की अयोग्य अशा हेलकाव्यांवर झुलविणारा हा प्रवास होता....
मनाचा आतला आवाज आणि कुटुंबाकडून लाभलेलं भक्कम पाठबळ यांच्या शिदोरीवर सुरू झालेला हा प्रवास होता..........
हा विमान प्रवास सुखरूप होईल ना इथपासून ते पुढचा जीवनप्रवास कसा होईल या चिंतेचे दाटलेले ढग मला विमानाच्या खिडकीतून दिसत होते आणि फक्त थांबलेले एक विमान आतून बघताना काही वर्षांपूर्वी झालेल्या आनंदाचे आभाळही भरलेल्या डोळ्यासमोर येत होते.
दुबईचं आकर्षण तस मनामध्ये खोलवर दडलेल होतचं. जगभरातून पर्यटक तिथे येतात, तीथे बघण्यासारख बरच काही आहे, नवलाईची अनेक ठिकाणे आहेत, सोने स्वस्त आहे अशा गोष्टी ऐकून होतो म्हणून ‘जीवन मे एक बार जाना दुबई’ अशा ओळी आम्ही कधीतरी आळवत होतो. माझा मेहुणा भूषण पीतांबरे नोकरीनिमित्ताने तिथे स्थायिक झाला आहे,त्यामुळे भविष्यात पर्यटक म्हणून एखादी सहल घडेल अशी खात्री मनामध्ये होती. तो परत निघाला की त्याचा मग कधी येताय दुबईला हा प्रश्न ठरलेला असायचा आणि बघू पुढल्या वर्षी हे आमचे उत्तरही ठरलेले असायचे. मात्र दुबईवारी इतक्या लवकर घडेल आणि तेही तिथे काही वर्षे राहायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु हाती आलेली संधी पुन्हा मिळणार नाही हा विचार अधिक प्रबळ ठरला. येणार्या काळात दुबईत नोकरीच्या अधिकाधिक संधी मिळतील, 2020 साली दुबईत होणारे दुबई एक्स्पो 2020 हे जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल असे काही चित्र डोळ्यासमोर आले आणि दुबई प्रवेशाचा निर्णय झाला.
पण दुबईला गेल्यानंतर करायचे काय ? नोकरी कशी मिळणार? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा होता. मराठी पत्रकारितेच्या अनुभवाचा उपयोग तिथे कसा होणार? समजा काही मिळाले नाही आणि तसेच परत यावे लागले तर काय करायचे? असे एक ना अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे होते. मात्र आयुष्याला नवे वळण देणारी एक संधी खुणावत होती. स्वतची प्रगती,कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि मुलाच्या भविष्याचा विचार करून दुबईला जाण्यासाठी सज्ज झालो.
अर्थात एवढ्या निर्णयापर्यंत येउनदेखील पुढील मार्ग सोपा नव्हता. ज्या तरुण भारत मधल्या नोकरीने मला स्वताची नवीन ओळख करून दिली आणि जिथल्या समाज जीवनाशी माझे अतूट धागे बांधले गेले होते त्या तरुण भारत आणि बेळगावशी असणारा तो धागा सहजासहजी तोडून टाकणे शक्य नव्हते. तरी देखील आयुष्यात काही वेळा कटू निर्णय घेणे भाग पडते अन् निर्णय होतात तसे करण्याची वेळ आली. हा निर्णय जेव्हा मी संपादक किरण ठाकूर यांच्या कानावर घातला तेव्हा त्यानी मला प्रोत्साहन दिले आणि तुझी प्रगती होत असेल तर जरूर जा असा मोलाचा सल्ला दिला. त्यांचे आशीर्वाद हे लाखमोलाचे ठरले. त्यांचे मोठेपण अनेकानी अनेक प्रकारे अनुभवले आहेच परंतु मलाही ते एक दीपस्तंभ ठरले आहेत एवढे नक्की.
आता आपल्या आयुष्याची गाठ दुबईसोबत बांधली जाणार आहे, बेळगाव काही वर्षांसाठी सुटणार आहे, तरुण भारत सुटणार आहे, तिथली माणसे दुरावणार आहेत या भावनेची एक वावटळ मनात घोंघावत राहिली. मी निघालोय ही कल्पना मला आणि इतरांनाही सहन होण्यापलीकडची होती. यातल्या यातना अनेकानी अनुभवल्या. त्यांच्यासोबत नोकरी करताना त्यांच्यासोबत रहाणे आणि सोबतीने काम करणे याच्या पलीकडे फार काही केलेले नव्हते. तरी मी त्यांच्या सोबत असणे हा त्यांच्याही जीवनाचा एक भाग होता. त्यामुळेच माझा पाय तिथून निघणे खूप कष्ट्प्रद होते. स्वताच्या मनावर बंध घालण मला अवघड होत असताना मी इतरांना कसा सावरणार होतो? माझे हळवेपण जाणणारी अन् जपणारी अनेक मंडळी मला निरोप देताना हळवी होऊन गेली होती. मी नसलो तरी काही अडणार नाही पण काही अडल तर माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती होती. केवळ स्वार्थाचा विचार करून मी हा निर्णय घेतोय की काय अशी बोचदेखील मनाला कुरतडत होती. जोडलेल्या अनेक माणसांकडून शुभेच्छा आणि हार-तुर्यांचा वर्षाव होत होता. त्यांचं हे प्रेम स्वीकारणेही मला जड जात होतं.
घरच्या आघाडीवरही तीच परिस्थिती होती. सतत माझी काळजी करणारी बायको-भूमिका आणि आई-बाबा, बहिणी यांना सोडून दूर राहण्याची मनाची तयारी करण अवघड गेलं .चिरंजीव कृतार्थला सोडून निघताना खूप त्रास झाला. मनावर दगड ठेऊन घरचे आणि बाहेरचे अशा सर्वांचा निरोप घेऊन दुबई प्रवासाला प्रारंभ केला.
दि.9 फेब्रुवारी 2014 हा माझा दुबई प्रवेशाचा दिवस. शारजाह विमानतळापासून दुबईला घरी पोचेपर्यंत दुबईची आगळी झलक बघायला मिळाली. आतापर्यंत सिनेमातून आणि पर्यटन कंपन्यांच्या जाहिरातीमधून दिसणारे दुबईचे रूप आता प्रत्यक्ष बघायला मिळत होते. पर्यटक म्हणून 4-8 दिवसांसाठी येऊन जाणार्या मंडळींसाठी एवढे चित्र मोहक आहे. मात्र येथे नोकरी करून स्थायिक होणार्यांसाठी ही जीवाची दुबई म्हणजे एक वेगळाच जीवनानुभव आहे.
नियोजनबद्ध प्रगती
सन 2020 मध्ये एक्स्पो 2020 हे जागतिक स्तरावरील भव्य औद्योगिक प्रदर्शन भरविण्याचा मान दुबईला मिळाला आहे,ज्यामुळे दुबईला जगातील एक उच्च दर्जाचे प्रगत शहर असा लौकिक लाभाणार आहे. ‘सोन्या चांदीच्या पेठा’ असे शब्द आपण गाण्यातून ऐकले आहेत. मात्र इथे तशा पेठा खरोखरीच बघायला मिळतात. दुबईला हा लौकिक मिळवून देण्यासाठी तेथील सरकारचे कुशल आणि दूरदृष्टीने परिपूर्ण असे नियोजनाबद्ध प्रयोग सहायभूत ठरले आहेत. त्यामुळेच सुमारे 30 वर्षांपूर्वी वाळवंट असणारे दुबई आता पर्यटनाचे नंदनवन बनले आहे. प्रशासनाचे नियोजन, व्यावसायिक-उद्योजकांचा हातभार आणि नागरिकांचे काटेकोर नियमपालन यांच्या त्रिवेणी संगामातून हे शक्य झाले आहे. भ्रष्टाचाराच्या किडीचा प्रादुर्भाव येथे झालेला नाही. नागरीकांकडून योग्य प्रमाणात कराचा भरणा करवून घेउन त्याचा विनियोग देशासाठी कसा करावा याचे उदाहरण म्हणून दुबईकडे पाहता येईल.पारदर्शक आणि सुलभ आर्थिक व्यवहारांमुळे नागरिकांचा महसूल थेट सरकारी खजिन्यात जमा होतो आणि त्याचा विनियोग आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो. सरकारी नोकर्यांमध्ये स्थानिकाना प्राधान्य तर आहेच,त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रात असणार्या परदेशी नोकरदार आणि कामगार वर्गाचे हित साधणारी सक्षम यंत्रणाही आहे.
 संयुक्त अरब अमिरात हा देश सात मोठया विभागांनी (आपल्याकडची छोटी राज्ये म्हणता येतील) मिळून बनला आहे. अबुधाबी,दुबई,शारजाह,अल आईन,फुजैराह, रसेल खैमा आणि अजमान हे ते सात विभाग. अरबी समुद्रा किनार्याचा बंदर स्वरुपात विकास साधून दुबईने आपल्या प्रगतीचा प्रवास सुरू केला. आज युरोप आणि आशिया खंडाला जोडणारे एक मध्यवर्ती केंद्र म्हणून दुबई ओळखली जाते. जगभरातून आलेले अनेक जनप्रवाह दुबईने आपल्या जीवनात सामावून घेतले आहेत. मग सर्वात जवळ असणारा भारत यापासून अलिप्त कसा राहील? दुबईतील सर्वच क्षेत्रात भारतीयांचा व्यापक संचार आहे. भारतामधे उच्च किंवा आधुनिक शिक्षण घेतलेल्या मंडळीना तर येथे मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे बँकिंग,वैद्यकीय,व्यवस्थापन,उद्योग, आयटी, सेवाक्षेत्रे,बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रांमधून भारतीयांचा वरचष्मा स्वाभाविकच आहे्. हॉटेल, उद्योग,व्यापार, अशा क्षेत्रांमध्ये प्रगती साधलेली अनेक मंडळी येथे भेटतात. इतकेच नव्हे तर भारतीय कष्टकरी ,श्रमजीवी कामगार वर्गही  दुबईत मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यामुळे छोट्या भारताचे एक स्वरुप येथे पाहण्यास मिळते. बरेचदा दुबई म्हणजे जणू आपली मुंबईच वाटते आणि तेही स्वाभाविक आहे. मुंबईप्रमाणेच येथेही अनेकविध जनप्रवाह एकमेकांत मिसळून गेले आहेत, विविध भाषा आणि संस्कृतींचा एकत्र मिलाफ येथेही आहे. भारतीय,पाकिस्तानी आणि बांगलादेशियांच्या हिंदी भाषांचे मिश्रण येथे आहे् हिंदी, मल्याळम आणि तमिळसह भारतीय भाषिकांचे वर्चस्व सर्वत्र दिसते. काही भागात मराठी भाषिकांची संख्याही बरीच आहे. कार्यालयीन कामकाजात इंग्लिशचा वापर सर्रास आहे, तसेच अरबी भाषेलाही तितकेच महत्व दिले जाते. कष्टकरी वर्गापासून ते उच्चभ्रू राहणीमानाचे अनेक पैलू येथे दिसतात. भारतीय मध्यमवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी बाजारपेठ सज्ज असते. समाधानकारक उत्पन्न मिळवून उत्तम जीवनशैली अंगिकारण्याचा मार्ग दुबई दाखविते. पाठीमागे राहिलेले आपले आप्तजन आणि मित्रपरिवार यांच्यासाठी काही तरी करण्यासाठी इथल्या मंडळींची धडपड सुरू असते. दुबईमध्ये जाउन चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येईल अशी अटकळ आपण इतरांच्या अनुभवावरून बांधलेली असते. परंतु त्यासाठी बरेच कष्टही करावे लागणार आहेत हेही जाणून घ्यायला हवे. आपल्या भारतीय प्रमाणवेळेचा (!) प्रयोग येथे चालत नाही. अंगी भिनलेला आळस झटकावा लागतो.  सकाळी 8 ला उठून 11 पर्यंत ऑफीसला पोचणे, त्यानंतर 5 वाजेपर्यंत घड्याळाच्या काट्याकडे बघत दिवस ढकलणे अशी ‘ड्यूटी’ येथे चालत नाही. क्षेत्र सरकारी असो किंवा खासगी,पाट्या टाकण्याची संस्कृती येथे नाही. अशी कार्यपद्धती बदलण्याचे कष्ट आपणाला घ्यावे लागतात. सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी इथल्या कामकाजची वेळ आहे. 7 ला ऑफीसात  पोचायचे म्हणजे  किमान 5.30 ला उठून तयार व्हावे लागते भोजन विरामाचा एक तास वगळता रोजची 10 तासांची सेवा तत्परतेने  द्यावी  लागते. कामातील कुचराईला येथे कारवाईचा बडगा असतो. अर्ध्या किंवा एक दिवसाच्या वेतनकपाती सारखी कारवाई त्वरेने केली जाते. त्यामुळे आपले काम दक्षतेने पार पाडावेच लागते. या कार्यपद्धतीमुळे कामकाजचा वेग वाढतो. निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण होऊ शकतात आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठता येते. उद्दिष्टे पूर्ण करणार्या कंपन्याना अधिक कामे मिळणे स्वाभाविक ठरते. यामाधूनच उद्योजकता आणि आर्थिक प्रगतीची सांगड घातली जाते. त्यामुळेच दुबईने औद्योगिक क्षेत्रातही आपली हुकुमत गाजविण्याचे पर्व आता सुरू झाले आहे. सगळीकडे कामगार वर्गाची मानसिकता सारखीच असते, परंतु येथे कामचुकारपणा खपत नाही हे लक्षात आले की आपली जबाबदारी ओळखण्याचे भान येते आणि कामे पार पाडण्याची तत्परता दिसू लागते. याच सूत्राचा अवलंब येथील कंपन्या करतात. आपण आपल्या भाषेत याला 'राबवून' घेणे असे म्हणू शकतो. परंतु कठोर परीश्रमाला पर्याय नाही हे सत्य येथे अंगी रुजवावे लागते.परदेशात जाउन आपल्याला  कमाई करायची आहे आणि त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत याची पक्की खूणगाठ बांधून कामगारवर्गाला कृतीशील व्हावे लागते. तसे करणार्या मंडळींसाठी नव्या संधींची उपलब्धता होत राहते. तसेच योग्य मोबदलादेखील मिळतो. हीच मानसिकता भारतात काम करताना रुजत नाही असे दिसते, अन्यथा संधींच्या शोधात आपणाला परदेशाकडे जाण्याची गरज भासली नसती.
सध्या अमीराती दिरामची भारतीय रुपयातील किंमत सोळा रुपये इतकी आहे. मात्र आपण एक दिरामचा चहाचा एक कप घेतला तर सोळा रुपये खर्च केले अशी तुलनात्मक धास्ती येथे बाळगून चालत नाही. स्थानिक उत्पन्न आणि खर्च यांचा विचार करणे योग्य ठरते. स्वस्तदरामधील खाद्यपदार्थांकरीता दोन ते चार दिराम (म्हणजेच 32 ते 64 रुपये) खर्च होतात. स्थानिक  कंपन्या हा सगळा हिशोब विचारात घेउन वेतन निश्चीत करत असतात.  भारत,पाकिस्तान, नेपाळ ,बांगलादेश, फिलीपाईन्स,श्रीलंका येथून येणार्या नोकरदार वर्गाला सेवेत सामावून घेणे स्थानिक कंपन्याना स्वस्तात पडते. आपल्याकडे आपण  पाच हजार रुपये हा पगार कमीच म्हणू, पण इथल्या दिराममध्ये पाच हजार म्हणजे आपल्याकडचे ऐंशी हजार होतात हे कळते तेंव्हा आपण सुखावतो. कंपनी आणि नोकरदार दोघांसाठी हा व्यवहार फायद्याचा ठरतो.  त्यामधूनच हे धोरण पुढे सरकत राहते.
जागतिक स्तरावरील बाजारपेठ
भरपूर कष्ट करा, भरपूर पैसे कमवा आणि भरपूर खर्चही करा अशी इथली जीवनशैली आहे. अधिक कष्टाचा मोबदला अधिक मिळतो, पण आपल्या राहणीमानानुसार खर्चही तितकाच होतो. शिक्षण, आरोग्य आणि निवास व्यवस्था या मुख्य गरजा येथे खर्चिक आहेत. चांगल्या वसाहतींमध्ये राहण्यासाठी दरमहा किमान चार ते पाच हजार रुपये घरभाडे मोजावे लागते. समाधानकारक जीवनशैलीसाठी दरमहा दहा हजार रुपये इतकी तरी कमाई असायला हवी. अर्थात ही श्रेणी आपण आपल्या परीने निश्चीत करू शकतो. मात्र दुबई सरकारकडून आता निवासी व्हिसासाठी हाच निकष ग्राह्य ठरविण्याचा प्रस्ताव आहे. या शहराकडे आकर्षित झालेल्या मंडळींच्या स्वागातकरीता येथील बाजारपेठ सज्ज आहे. ग्राहकराजाला आपल्याकडे खेचून घेण्याकरीता येथील बाजारपेठेत निकोप स्पर्धेचे चित्र दिसते. चित्तवेधक आकारातील भव्य ईमारती,एकाच छताखाली बर्याच गोष्टी उपलब्ध करून देणारे भव्य मॉल्स, तेथील मनोरंजनाची साधने आणि खाद्यपदार्थांचे काउंटर्स यांची भुरळ ग्राहकराजाला पडणे स्वाभाविकच.  भव्य असा दुबई मॉल आणि इतर प्रचंड आकाराचे मॉल्स फिरून पाहण्यातील आनंद काही वेगळाच आहे. आपल्या बजेटचा विचार करून खरेदी करण्यासाठी इतर असंख्य सुपर आणि हायपर मार्केट्स उपलब्ध आहेत. अगदी स्वस्तात मस्त खरेदीचा आनंद देणारी सेल स्वरुपातील खरेदीची संधी देणारी दालनेही आहेत. त्यामुळे सार्यांसाठी सारे काही असे जाहिरातछाप वाक्यही येथे सार्थ ठरते. रोजच्या जीवनात उपयुक्त ठरणार्या अनेक वस्तू सोप्या आणि सुटसुटीत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात दुबई मार्केट अग्रेसर आहे. कल्पकतेमधून तयार केलेल्या स्थानिक वस्तू जगभरातील नामांकित ब्रॅण्ड्सची उत्पादने यांची विपुल श्रेणी ग्राहकांना भुरळ घालते. जागतिक स्तरावरची उत्तम बाजारपेठ बनलेल्या दुबई शहराने अनेक चीजवस्तुंसाठी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे. प्रामुख्याने सोने, चांदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी दुबई नावाजली जाते. पर्यटकांसाठी येथील शॉपिंग हाच एक आनंदसोहळा असतो. आपल्या बजेट प्रमाणे समाधानकारक खरेदी झाली तर दुबईची सहल सार्थकी लागली म्हणता येते. येथील सुलभ करप्रणालीमुळे अशा वस्तू येथे आपल्याकडच्या तुलनेने स्वस्त मिळतात. याव्यतिरिक्त फॅशनेबल वस्त्रप्रावरणे, सेँटच्या बाटल्या, सौंदर्यप्रसाधने,मधुर चवीची चॉकलेटस्, यांचीदेखील रेलचेल दिसून येते. यांची निर्मिती आणि पॅकिंग करणारे मोठे उद्योग आखाती देशांमध्ये विस्तारले आहेत. त्यामुळे नवनवे उद्योग विकसीत होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. पर्यटकंबरोबरच येथे स्थायिक झालेले भारतीय आणि अन्य देशीय बांधव हे देखील या बाजारपेठेचे मोठे ग्राहक आहेत. या बाजारपेठेमुळेच दुबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा भक्कम बनला आहे.
पर्यटनाची जोड
इथल्या पर्यटनाविषयीच्या सुरस अरेबीयन कथा वर्णाव्यात तितक्या थोड्याच ठरतील. एकापेक्षा एक अदभूत अशा पर्यटनस्थळांनी अवघ्या जगाला आकर्षून घेतल आहे. अशा रम्य ठिकाणांना भेटी देताना आपला हात काहीसा सैल सोडावा लागतो. तशी तयारी असल्यास दुबईचा फेरफटका अविस्मरणीय ठरतो. जगप्रसिद्ध अशी बुर्ज खलिफाची ईमारत किंवा बुर्ज अल अरब सारखे जगवेगळ्या आकारातील हॉटेल पाहणार्याना थक्क करतात. तर डेज़र्ट सफारी आणि ग्लोबल व्हिलेजची भ्रमंती आपले मन मोहवितात. समुद्राच्या मध्यभागी जहाजाच्या आकारात बांधलेले बुर्ज अल अरब, 137 मजले असणारे बुर्ज खलिफा, खजूर झाडाच्या आकाराप्रमाणे विकसीत केलेले पाम जुमेरा बीच आणि अतीभव्य असे अटलंटीस हॉटेल ही सरी दुबईची ओळख बनून दिमाखात उभी आहेत. यासह अनेक वेगवेगळ्या आकारातील इमारती येथे पाहावयास मिळतात. हे वैभव पर्यटकांना मोहविते. जगातील आश्चर्यांची नव्याने यादी करायची झाली तर त्यामध्ये बुर्ज खलिफाचे नाव घालावे लागेल. जगातील सर्वात अद्भूत बांधकामाचा एक नमुना म्हणून जीवनात एकदा ही इमारत बघावी. याच ठिकाणचे दुबई फाउंटन, भव्य इमारती ही जोड आकर्षणे येथे आहेतच.
ग्लोबल व्हिलेज हे आगळे प्रदर्शन नोव्हेंबेर ते मार्च या काळात येथे भरते. जगभरातील शंभरहून अधिक देशातील कला,संस्कृती,व्यापार आणि खाद्यविहार यांचा सुरेख संगम येथे साधला जातो. आपण जणू एकाच फेरीत शंभर देशांना भेटी दिल्याचा आनंद या प्रदर्शन भेटीने मिळतो. दरवर्षी लाखो पर्यटक या प्रदर्शनाला भेट देतात. पर्यटकांसाठी ठळकपणे सांगण्यासारख्या या गोष्टींबरोबरच येथे प्राणीसंग्रहालय,म्युझियम,वॉटर पार्क अशी अनेक मनोरंजक साधने उपलब्ध आहेत.
सर्वसमावेशक खाद्यसंस्कृती
दुबईची खाद्यसंस्कृती हा खरे तर एका स्वतंत्र पुस्तकाचा होऊ शकेल इतका हा मोठा विषय आहे. स्थानिक इस्लामी संस्कृतीची देणगी असलेले बादशाही खाद्यपदार्थ हा इथल्या जनमानसाचा अभिमान आहे. तर जगाच्या कानाकोपर्यातून आलेल्या खाद्यप्रवाहांनी हे वैभव अधिकच समृद्ध केले आहे. प्रत्येकाला त्याच्या पसंतीनुसार अनेक पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी येथील हॉटेल व्यवसाय सज्ज आहे. आपल्या नियमीत आहारात असणार्या पोळी भाजी, इडली-सांबार आणि दोश्यापासून ते वडा-पाव, सामोसा असे पदार्थ येथे सहज मिळतात.त्याचबरोबर भेळ,चाट आणि पाव-भाजीचा आस्वादही घेता येतो. साउथ इंडीयन,पंजाबी आणि गुजराथी जेवण मिळते. करामा किंवा बर दुबई भागात यासाठी खास ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपली पोटाची गैरसोय कुठेही होत नाही. विविध प्रकारचे भारतीय मेनू येथे मिळतात अगदी मालवणी मासादेखील. आपल्या संमिश्र आहार पद्धतीचे एकत्रित रूप आपण येथे अनुभवतो.  पोटपूजा आणि चवीचे सुरेख समाधान लाभू देण्यात दुबई मागे राहत नाही हे विशेष.
मात्र आपण दुबईत आलोय तर काही वेगळी चव चाखावी असा विचार करीत असाल तर तशीही सोय आहे. पिझा आणि बर्गरचे वेगवेगळे प्रकार, चिकन रोल, बिर्यानी आणि इतर पदार्थ सहज मिळतात. ‘शोर्मा’ हा इथला खास लोकप्रिय असा फास्ट फूडचा प्रकार आहे. आपल्याकडील पोळीचा रोल म्हणता येईल असा हा मांसाहारी प्रकार असतो. रोटीमध्ये चिकन-मटनाचे मिश्रण भरून हा पदार्थ बनावितात. अल्प किमतीत मिळणारा आणि चविष्ट असा हा पदार्थ देणारी शोर्मा सेंटर्स ठिकठिकाणी दिसतात. बेकरीतून तयार होणारा आणि आपण मसाला बन म्हणू शकू असा 'जातर' नावाचा प्रकारही लोकप्रिय आहे. चण्याच्या पीठ पासून तयार होणारे हमूस, वेगवेगळया भाज्या मिळून तयार होणारे ग्रील असे काही पदार्थ आवडीने खाल्ले जातात.
ऑलिवची फळे आणि तेल, ड्राय फ्रूट्स यांचा अधिक वापर करून पदार्थ बनविले जातात. फळांचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो. मांसाहार प्रेमींसाठी दुबईत मोठी व्हरायटी आहे. मात्र आपल्याला रुचणारे पदार्थ कोठे मिळतील याची माहिती घेऊन मगच हॉटेलात प्रवेश करणे योग्य ठरते.  आम्हा महाराष्ट्रीय मंडळींची आहार संस्कृती चिकन, मटण आणि मासे इतकीच मर्यादीत आहे.  मात्र येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बीफ आणि पोर्कचे असंख्या प्रकार देणारी अनेक हॉटेल्स नावाजाली जातात. पठाणी, पाकिस्तानी,लेबनिज,फिलिपिनी, थाई आणि इतर अनेक देशांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ येथेही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था येथील हॉटेल उद्योग करतो.  विविध संस्कृतींच्या सुरेख मिलाफाला या आहार संस्कृतीचा स्वाद लाभला आहे.
छोटा भारत येथे वसतो
आपल्याकडे आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत असे मानतो. दुर्दैवाने आजही आपल्याला याच गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो.रस्ते,पाणी आणि वीज यासाठी रस्त्यांवर उतरावे लागते. मात्र दुबईतील बदलत्या जीवनप्रवाहांमुळे येथील जीवनाचे प्राधन्यक्रमही बदलले आहेत. कार, एसी आणि इंटरनेट या तीन गोष्टींवर दुबई चालते असे म्हणावे लागते. प्रगतीचा वेग राखण्यासाठी या बाबींचा विनियोग महत्वाचा ठरतो. सुलभ संचारासाठी कार, रोजच्या कामकाजासाठी इंटरनेट आणि उकाड्यापासून रक्षणासाठी एसी या इथल्या प्रमुख आवश्यकता बनल्या आहेत. प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आधी मूलभूत सुविधांची पूर्तता गरजेची आहे ही बाब ओळखून दुबई प्रशासनाने तशी व्यवस्था केली आहे. वाहतुकीसाठी सुलभ संचारप्रणाली, उत्तम रस्ते, आठ पदरी उड्डाणपूल, योग्य सिग्नल व्यवस्था यांची कृतीशील योजना राबविली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोयही स्तुत्य म्हणावी अशी आहे .इथली मेट्रो रेल्वे, बस आणि टॅक्सी सेवा आपल्याला सोयीची ठरते. या सुविधांमुळे दुबई हे शहर परिपूर्ण बनले आहे. या सर्व सेवा सुविधांची उपयुक्तता प्रगतीच्या वेगामध्ये रुपांतरीत झाली आहे. ही व्यवस्था पाहून आपल्या मागासपणाची खंतही काही वेळा जाणवते.
शालेय अभ्यासक्रमात आपण वर्षात तीन ऋतू असतात असे शिकलो आहोत, परंतू आखाती देशांत पावसाळा हा ऋतू गायब आहे. उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू येथे असतात. केंव्हातरी लहरीप्रमाणे बरसून जाणार्या सरी हीच काय ती पावसाची ओळख. मे महिन्यात उकाडा वाढला की आपण ढगाकडे पाहू लागतो आणि जुलै अखेरपर्यंत आता पाउस पुरे झाला म्हणू लागतो. मात्र त्या उलट येथे मे ते सप्टेंबर हा काळ प्रचंड तापणार्या झळांचा असतो. साधारणपणे 42 ते 45 अंशापर्यंत तापमान पोचते. त्याचबरोबर समुद्री भागामुळे आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. या कडक उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी दक्षता घ्यावी लागते. प्रशासनकडून याविषयी सूचना दिल्या जातात. कार्यालयीन कामकाजापासून ते श्रमजीवी वर्गाच्या वेळा पत्रकात बदल करावा लागतो. भाजून काढणार्या भट्टीसमोर उभे राहिल्याचा भास या उन्हामध्ये होतो. थोडेसे चालले तरी थकून आणि घामाने भिजून जाण्याची वेळ येते. उन्हाळ्याचा हा तापदायक अनुभव घेताना आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे ठरते. हिवाळा मात्र बराच आल्हाददायक असतो, म्हणून पर्यटकांसाठी हाच ऋतू सोयीचा असतो. दुबईच्या अर्थकारणाची मुख्य धारा इथल्या उद्योग आणि व्यवसायामधून विकसीत झाली आहे.त्याला पर्यटन आणि मनोरंजनाची जोड मिळाली आहे. त्यामुळे जगभरातून इथे येणार्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळे येथे जणू छोटा भारत निर्माण झाला आहे.  त्यामुळे बॉलीवुडचे चित्रपट देखील येथे मोठी गर्दी खेचतात. सिने कलावंतासाठी देखील दुबई हे आवडीचे ठिकाण आहे.  प्रांतीय अस्मितेचा मुद्दा बाजूला सारून आपण सारे भारतीय असल्याची एकच भावना बर्याच वेळा प्रकट होते. शारजाह-दुबईमधले क्रिकेट सामने असोत किंवा कलाकारांचे स्टेज शो असोत, अशाप्रसंगी सारा भारत एकत्र येतो. तेंव्हा आपण भारतापासून दूर नाही असे समाधान काही क्षणांसाठी लाभते. भारतीयांच्या कष्टाला योग्य मोबदला देणारी, स्वप्नवत दुनियेची सफर प्रत्यक्षात घडविणारी आणि आयुष्य नव्याने जगण्याचे धडे देणारी वास्तवातील 'स्वप्ननगरी' अशी ही दुबई आहे. पर्यटक म्हणून फक्त जीवाची दुबई करण्यापुरताच नव्हे तर दुबईच्या या भव्य जडण घडणीतही भारतीयांचा जीव गुंतला आहे हे नक्की.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: जीवाची दुबई

Kshitij Belanki
Beautifully written Baji.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: जीवाची दुबई

Anant kangralkar
सर  छान लिहिला आहे आपला अनुभव....तुमच्या लिखणामुळे आम्ही घडलो हे विसरु शकणार नाही.त्यामुळे मला  तुम्ही परत यावे असे वाटते.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: जीवाची दुबई

ROHAN  PASTE
In reply to this post by Upendra Bajikar
सर, खूप छान लिहिला आहात. खूप दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. तुमचे लेखन वाचायची सवय लागली आहे. आता पुन्हा तुम्ही लिहिते झालात, याचा आनंद वाटत आहे. तुम्ही नेहमी असेच विविध विषयावर लिहित जा. तुमचे पुढचे लेखन वाचण्यासाठी मी आतुर आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

CORRECTION

Upendra Bajikar
In reply to this post by Kshitij Belanki
चुकीची दुरुस्ती- वरील लेखामध्ये अमीरातीमधील सात विभागात अल आईन चा उल्लेख चुकीने झाला आहे. त्यातिकाणी उम अल क्वेन  असे वाचावे.