गुढीपाडवा आणि तरुणाई...

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

गुढीपाडवा आणि तरुणाई...

Bharat Malkar
गुढीपाडवा आणि तरुणाई...

हवी-हवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्या सोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवं काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे हे लक्षण आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस विजयाचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभी करतो. आपण जसे १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करत असते.

आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात दोन वेळा केली जाते, एक इंग्रजी कालगणनेनुसार 'Happy New Year' ने आणि दुसरे हिंदू कालगणनेनुसार 'नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा' ने म्हणजेच गुढीपाढव्याने. १ जानेवारी आळसात उजाडतो कारण त्याला ३१ डिसेंबरचा अंमल असतो. १ जानेवारीच्या स्वागतापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीचीच सगळ्यांना ओढ असते. पण आपला गुढीपाडवा चैतन्य घेऊन उजाडतो. अभ्यंगस्नानांनी सुरु होणारा हा पाडवा प्रत्येक घरातील लहान-थोरांना नटून थटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढया उभारायचा दिवस असतो.

अशा या गुढीपाडवा आणि इतरही धार्मिक, सांस्कृतिक सणांपासून आपली तरुणाई दूर असते असं काही वेळा भासवलं जात. परदेशी संस्कृतीचे अनुकरण करते अशीच ओरड असते, परंतु ते खोटे आहे. महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीची वाढत चाललेली जादू पाहता, तरुणांकडून हिंदू आणि मराठी सण मात्र तेवढयाच पारंपारिक पद्धतीने साजरे होताना दिसत आहेत. किंबहुना ते वाढतच आहेत. आत्ताच्या इंग्लिश जमान्यात वावरणारी, सतत सोशल नेटवर्कशी जोडलेली आणि खुली अर्थव्यवस्था, खुली बाजारपेठ यामुळे सतत परदेशी वाऱ्या करणारी किंवा सतत परदेशी घटनांशी निगडीत असलेली ही तरुणाई पश्चात पद्धतीने काही कार्यक्रम नक्कीच करत असतात मात्र आपले सणही आपल्या घरच्यांसोबत तेवढयाच आनंदाने, उत्साहाने आणि पुढाकाराने साजरे करताना दिसतात. त्यातील धार्मिकता काहीशी अंशी कमी झालेली असेलही परंतु आपले सण साजरे करण्याची त्यांची धावपळ मात्र नक्कीच आनंद मिळवून देत असते.

१ जानेवारीच्या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जी तरुणाई पार्ट्यामध्ये बेधुंद होवून जल्लोष, धांगडधिंगाणा करत असते तीच तरुणाई आपल्या हिंदू नववर्षाचे स्वागत मात्र नम्रतेने, शालीनतेने आणि आत्मियतेने करत असतात. सकाळी-सकाळी नटून-थटून फेटे परिधान करून वडिलधाऱ्यासोबत शोभयात्रांमध्येही तेवढयाच आत्मियतेने भाग घेत असतात. त्यामध्ये ते नेहमीच एक पाऊल पुढे असतात. आणि हाच खरा भारतीय आणि पाश्चात संस्कृतीतील फरक आहे. हा वेगळेपणा, ही संस्कृती अशीच टिकून राहिल्यास आणि तरुणाईचा असाच सहभाग राहिल्यास महाराष्ट्रातील सणांचे महत्व त्याचबरोबर मराठी भाषा आणि मराठीची अस्मिता उत्तोरोत्तर बहरत जाईल आणि ती प्रभावीपणे जोपासलीही जाईल यात दुमत नाही.

तर मग चला, शुभसंकेताचे पडघम वाजवत येणारा हा आपला नववर्षाचा पाहीला दिवस आपण सर्वजण अगदी मनापासून आणि उत्साहात साजरा करूया. शुभ गुढीपाडवा….!!!

भरत माळकर -मुंबई