धुळवड

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

धुळवड

Bharat Malkar
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते. धूळ उडवून ही धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे. पोर्णिमेच्या दिवसापासून चालू झालेल्या या सणाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी वाड्या-वाड्यातील गावकरी डोल-ताश्या, सनई घेऊन वाजत-गाजत गावातील एका ठराविक ठिकाणी गोळा होतात. या ठिकाणाला 'मांड' म्हणतात. पुरेशे गावकरी गोळा झाल्यावर होळी उभारण्यासाठी लागणाऱ्या आंब्याच सरळ किंवा माडाच उंच झाड तोडतात. त्याची उंची साधारणता ४० ते ५० फुट असते. तत्पूर्वी त्या झाडाची गावातील प्रमुखांव्दारे पूजा केली जाते. तोडलेलं ते झाड ज्याठिकाणी होळी उभारायची असते त्या मंदिराच्या ठिकाणी घेवून जातात. तिथे घेऊन गेल्यावर त्या तोडलेल्या झाडाची बाहेरची साल काढली जाते आणि त्यावर आंब्याच्या पानं बांधून वरच्या टोकाला भगव्या रंगाचा झेंडा बांधतात. अशाप्रकारे ही होळी सजवून झाल्यावर जमिनीमध्ये होल मारून ती उभी केली जाते. हि होळी उभी करण्यासाठी जी कसरत आणि मेहनत घेतली जाते ती वाखाण्याजोगी आणि स्पुर्तीदायक असते. कुटल्याही मशिनरींचा वापर न करता एकीच्या बळावर हे गावकरी ती होळी लीलया उभी करतात. त्यानंतर ब्राम्हणांच्या सहाय्याने पुन्हा तिची पूजा होते. त्यानंतर ४-५ फुटाचा गवताचा घेरा करून त्या गवताला डोल-ताश्यांच्या गजरात अग्नी दिली जाते. त्यानंतर त्या होळीला कोकणी पध्दतीने गाऱ्हाण घालतात. त्यामध्ये एक वाक्य असते 'जोकोण आजपासून शिमगो संपापर्यंत बोंबटात नाय तो………. (कोकणी शिवी)' हेही त्यामध्ये असते. शिमगा संपेपर्यंत दर संध्याकाळी वाड्या-वाड्यातील गावकरी डोल-तश्याच्या गजरात 'हव्वा हव्वा' असे जोर जोरात ओरडत, नाचत होळीला भेटायला जातात. या ओरडण्याला आणि नाचण्याला 'रोंबाट' म्हणतात. 'रोंबाट' हा प्रकार या होळी सणाचा एक आकर्षक भाग असतो, लहान-थोर, हवशे-नवशे या 'रोंबाटा' मध्ये बेधुंद होवून नाचत ओरडत असतात.  शिमग्यातील दिवसाच्या वेळी गावा-गावातील काही लोक आपल्या वेशभूषा मध्ये बदल करून, वेगवेगळी सोंग घेवून घरोघरी 'शबय' मागायला येत असतात. शबय मागण्याची पद्धतही हटकि असते. 'शबय-शबय-शबय…… आयनाचा बायना घेतल्याशिवाय जायना' हे ठरलेलं वाक्य. तसेच पुरुषाला साडी नेसवून राधा बनवली जाते आणि घरोघरी गाण्यांच्या तालावर नाचवलं जात. असे वेगवेगळे काही गंमतीशीर, काही पारंपारिक उपक्रम या होळी सणामध्ये होत असतात. सणाच्या शेवटच्या दिवशी माणसांनाच घोड्यांसारख सजवून घोडेमोडणी आणि देवाच्या प्रसादाने होळीच्या सणाची सांगता करण्यात येते.
असा हा बोंबाबोंब  करणाऱ्या सणाची रंगत अलीकडच्या काळामध्ये   कमी झालेली दिसते. असे म्हटले जाते की होळी सणामध्ये गावातील वाड्या-वाड्यातील भांडणे नव्याने उगाळून काढली जातात. त्यामुळे बऱ्याच गावातील हा सण कोर्ट कचऱ्या पर्यंत जावून बंद स्थितीत पडलेला आहे. जर का गावकऱ्यांनी अशाप्रकारचे वाद थांबवून हा सण पूर्वीप्रमाणेच तेवढ्याच पारंपारिक श्रद्धेने आणि पवित्र्याने साजरा केल्यास याचे आकर्षण नव्याने अनुभवास येईल.
 
 
भरत माळकर -भांडूप