निसर्गकवि- बालकवी

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

निसर्गकवि- बालकवी

Vinita Deshpande
बालकवी हे नाव घेताक्षणी नितळ निळे आकाश, त्यात स्वच्छंद भरारी घेणारी पाखरं, निश्चल पर्वत रांगा, त्यांच्यामधून खळखळ वाहणारे झरे, मेघांचा कापूस, पावसाच्या सरीत भिजलेली गर्द वनराई, शांत रम्य वन, वनात कुंजन करणारे पक्षी, अशी अनेक दृश्ये डोळ्यापुढे उभे रहातात. बालकवींनी सृष्टीसौंदर्याची विविध रुपे बघण्याची दृष्टी रसिकांना दिली. निसर्गातील सारे सौंदर्य प्रत्येक मराठी मन बालकवींच्या शब्दांतून अनुभवतो असे म्हटल्यास अतिरेक होणार नाही. श्रावणाची चाहुल आजही आपल्याला "श्रावणमासी हर्ष मानसी" या शब्दांत ऐकू येते, आपला आनंद आपण आनंदी आनंद गडे या ओळीतून व्यक्त करतो, आपले जीवन गाणे कुठलेही असले तरी त्याचा उल्लेख आपण "माझे गाणे एकची गाणे" असा करतो, केव्हाही नजरेस पडणारे हिरवे शेत बघून "हिरवे हिरवे गार गालिचे" हे शब्द नकळत ओठावर येतात, एक नाही अशा अनेक ओळी आपल्या जीवनात एकरुप झाल्या आहेत. कदाचित यालाच कवितेचे संस्कार म्हणतात. बालकवींच्या कविता आणी मराठी रसिकाचा गोफ हा असाच अनंतकाळापर्यन्त अखंड रहाणार यात शंकाच नाही.
 
         ऑक्टोबर१९०७ सालचा प्रसंग, जळगाव इथे भरलेल्या एका कविसंमेलनात वि.मो.महाजनी, चंद्रशेखर, अनंततनय, माधवानुज, लोंढे यांसारखे दिग्गज कवींच्या उपस्थितीत सोळा-सतरा वर्षाच्या एका तरुणाने शब्दाश्ब्दातून रसिकांना मंत्रमुग्ध केले, याच तरुणाला अर्थात त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना "बालकवी" म्हणून गौरविण्यात आले आणि बालकवींचा काव्यप्रवासाला आरंभ झाला. बालकवींना पहिली कविता स्फुरली ती वयाच्या तेराव्या वर्षी आणि ती ही एका फुलबागेत. निसर्गप्रेमातूनच या कवितेचा जन्म झाला होता.  
                हे फुल या उडत्या स्वर्गातील
                माणिक हे बाई झुलते आहे !
                हे तान्हे सृष्टीचे गोजिरवाणे
                कौतुकली मधुवंदना हसली वदली
 बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा जन्म १३ऑगस्ट१८९०रोजी खानदेशातील धरणगाव येथे झाला. एरंडोल, यावल, नगर, धुळे येथे तांचे शिक्षण झाले. बालकवींना लहानपणापासून असलेली निसर्गाची ओढ वयासोबत उत्कट होत गेली. ही उत्कट ओढ वाढता वाढता बालकवींचे सारे लक्ष- सर्व इंद्रिय सृष्टीसौंदर्य या एकाच तत्वावर केंद्रीत होत गेली.
               सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे
               चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे
               प्रितिसारिका गीत तियेचे ऐकावे कानी
               बनवावे मन धुंद रंगुनी काव्यसुधापानी
               अंधाराचे पाश मनाचे हे गळुनी जावे
                         चित्त वाटते तरळ तुझ्यापरि खगबाळा व्हावे.
    "अष्टदिशांचा गोफ" या रचनेतील या ओळी. निसर्ग व स्वप्नसृष्टीतील तदृपता अशा भारावलेल्या अवस्थेत बालकवींनी अनेक रचनांची निर्मिती केली. "फुलराणी" ही या अवस्थेतील एक सर्वांगसुंदर रचना, आणि याच अवस्थेतील  अजून एक उत्तमोत्तम रचना म्हणजे "अरुण" :
                 उठ कोकिळा, भारद्वाजा! उठ गडे आता
                        मंगलगानी टाका मोहुनी जगताच्या चित्ता
                  सरिते! गाणे तुझे सुरामंधि या मिळवी बाई
                  साध्या भोळ्या तुझ्या गायना खंड मुळी नाही
                            पिवळी कुरणे या गाण्याने हर्षोत्कट झाली
                            गाऊ लागली, नाचू लागली, वेडावुनी गेली
                            चराचरांच्या चित्ती भरले दिव्याचे गान
                   मूर्तगान हे दिव्य तयाला गाणारे कोण?
                   दिव्य गायने, दिव्य शांतता, दिव्याचे झोत
                   वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत ह्रदयात.
     हे दीर्घकाव्य एका कल्पनासृष्टीत रमलेले आहे. बालकवींच्या कवितेतील निसर्गाबद्दल लिहायचे म्हणजे ब्रम्हदेवाने
  सृष्टी्सौंदर्याची उधळण करायची, बालकवींनी ती शब्दात गुंफायची, त्याच शब्दांतून आपण सर्वांना सृष्टीचे रुप अनुभवायचे इतकी सहज व स्वाभाविक क्रिया आहे. बालकवी नुसतेच शब्दचित्र उभे करत नाही तर त्यात रंग, स्पर्श, गंध, नाद, ताल, सुर, लय यांच्यासह सादर करतात. इथेच कवीचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. निसर्गसौंदर्याच्या स्वप्नसृष्टीत इतके तल्लीन व समरस झाले होते की इतर कुठलेही सौंदर्य त्यांना भुरळ घालु शकले नाही. "औदुंबर" ही कवीची दहा ओळींची कविता म्हणजे निसर्ग आणि जीवनाची सांगड घालणारे अत्यंत सुंदर शब्दचित्र.
          ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
          निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन
          चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
          शेतमळ्याची दाट लागली हिरवी गरदी पुढे
          पायवाट पांढरी तयांतुनी आडवीतिडवी पडे
          हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
          झांकळुनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर
          पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
             ही रचना म्हणजे आशा-निराशा, सुख-दु:खाच्या अनुभवांचा प्रवास आहे. हिरवळ अर्थात स्वप्न हातात घेऊन एक अल्लड प्रवास सुरु होतो, तो बेटांतून, कधी शेतातील पांढर्‍या अर्थात दु:खाच्या पायवाटेवरुन कधी हिरव्या कुरणांमधुन अर्थात सुखाच्यावाटेवरुन, काळ्या डोहाजवळ अर्थात आयुष्याच्या स्थितप्रज्ञस्थितीपर्यन्त येऊन पोहचतो. आयुष्यातील चिंतन अवस्था शेवटच्या दोन ओळीत कवीन यथार्थ व्यक्त केली आहे.    
              सृष्टीसौंदर्यात एकरुप झालेल्या बालकवींच्या कवीमनाला मानवी जीवनातील अस्थिरता अस्वस्थ करत असे. हे जग वेदना, निराशा व दु:खाने भरलेले आहे या जाणीवांच्या तीव्रतेमुळे ते व त्यांचे मन मोहमयी जगाच्या नेहमीच दूर गेलेले आढळते. कवीचे प्रत्येक काव्य कल्पनाविलासात हरवलेले आहे. मन-निसर्ग यांची सांगड घालतांना बालकवींची कविता व्यवहारी जगाच्या पाशातून सुटून मोकळी होते आणि एका नव्या विश्वात विहार करतांना आढळते.
              तुला बघावे गुंगावे ! गुंगतच चुंबुनि घ्यावे
              गुंगतच होऊनि जावे! त्वदाधीन जीवभावे
                    गुं गुं गुं गुं जोवरती ! जडतेची पडते माती
              तरलित हो ह्रदयज्योती! दिव्यसूर श्रवणी येती
              मग त्याला धरुनी सोल ! एकेकच गुंफित बोल
         "कवीची इच्छा" या रचनेतील या ओळीतून कवीचा मानस प्रत्ययास येतो. कवितेत गुंगुन जाणे हीच त्यांची एकमेव इच्छा होती व त्यातच ते दंग होते.
             "तो एक खाणीतील अनगड हिरा आहे" हे कविवर्य विनायकांनी बालकवींना उद्देश्यून काढलेले उद्गार आहेत. कविवर्य विनायकांनी रेव्हरंड टिळक आणि बालकवींची भेट घडवून आणली. उत्तरोत्तर टिळक-बालकवींचा स्नेह वाढत गेला. सन १९१०च्या सुमारास बालकवी टिळकांच्या अहमदनगर येथिल घरी रहाण्यास आले. त्यांच्या नगरच्या वास्त्व्यातील अनेक स्मृती लक्ष्मीबाई टिळक यांनी "स्मृतिचित्र" यात टिपल्या आहेत. बालकवी "तुतारी" मंडळाचे सदस्य
होते, याच मंडळात त्यांची व गोविंदाग्रजांशी मैत्री वाढली. बालकवींचे निसर्गप्रेम त्यांच्या स्नेहींना चांगलेच ठाऊक होते. निसर्गाचे अमर्याद सौंदर्य बघून त्यांना कुठलेच भान रहात नसे. कवीचा नगर-पुणे-जळगाव प्रवास सतत होत असे. अनेक तकालीन मासिक, वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून त्यांची कविता प्रसिद्ध होत होती. बालकवीच्या लेखनकाळाचा आढावा घेता, तो काळ वैचारिक क्रांतीचा होता. कवीचे समकालीन कवी मित्र तत्कालीन विचारप्रवाहाने प्रेरीत होऊन लेखन करित होते. परन्तु बालकवींची कविता या वास्तववादी परिस्थितीहून अलिप्त होती. समाजातील व्यथा, निराशा, वेदना, अन्याय, अज्ञान, असमता यासारंखे विषयांवर लेखन करणे हा त्यांचा उद्देश्य कधीच नव्हता. आणि तो व्यक्त करण्याचा कणखरपणा त्यांच्या शब्दात नव्हता. कवितेत व्यक्त दु:ख ही बालकवींची वैयक्तिक होती. तत्कालीन परिस्थितीशी बालकवी चांगलेच परिचित होते, परन्तु त्या परिस्थितीचा स्वीकार त्यांनी केला नव्हता किंवा त्यात ते एकरुप झाले नव्हते. वास्तवात जगणे बालकवीच्या स्वभावातच नव्हते. उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन, अर्थार्जनासाठी करावी लागणारी वणवण या वास्तवात सतत खुणावणारे निसर्गसौंदर्य अशा त्रिविध मनस्थितीत त्यांची घालमेल होत असे. या अस्वस्थ भावनांच्या कल्लोळात अनेक व्याकूळ काव्यांचा जन्म झाला. भावनांचा उद्रेक कवीच्या आत्ममग्न रचनेत प्रचितीस येतो.
              कसे हाकारु! शीडाविण दुबळे तांरु?
                            तुडुंब सागर भरला आहे
                            दुष्टकाल झंझानिल वाहे
                   तुफान तेणे खेळत राहे
              कसे हाकारु! शीडाविण दुबळे तांरु?
    अस्वस्थ अवस्थेत स्फुरलेली बालकवींची सर्वोत्तम रचना म्हणजे "ह्रदयाची गुंतागुत" :
              ह्रदयाची गुंतागुत कशी उकलावी?
              ही तीव्र वेदना मनामनाची ठावी
              ही बुद्धी सांगता मन ऐके ना तीते
              हे चित्त वदे ते पटेच ना बुद्धीते
   निराशा आणि अस्वस्थता यातून कवीला बाहेर पडता आले नाही, याचा प्रत्यय देणारी ही रचना. या रचनेत स्वत:ला पडणार्‍या या प्रश्नांचे उत्तर कवी शोधत आहे.
              वैराग्य बरा की सुखद बरा अनुराग
              परि हाय प्रीतीचे उगाच माझे सोंग
              ते कर्म बरे की बरवा कर्मत्याग?
              दुर्दैव तसे, मज नव्हे त्याग ना भोग.
  अस्वस्थता, निराशा, उदासीनता बालकवींच्या रचनेत वारंवार प्रत्ययास येतात. त्यांच्या एकूण अठ्ठावीस वर्षांच्या आयुष्यात, सुरवातीचा काळ सोडता ही अस्वस्थता त्यांना शेवटपर्यन्त घेरुन होती. परिस्थितीशी सामना करण्याऐवजी ते व त्यांची कविता या अस्वस्थतेत एकरुप होऊन गेली. या अवस्थेत रचलेल्या रचनांमधून त्यांची विषण्णमनस्थिती लक्षात येते.
               कोठुनि येये मला कळेना
               उदासीनता ही ह्रदयाला
               काय बोचते हे समजेना
               ह्रदयाच्या अंतर्ह्रदयाला
  ही विषण्णमनस्थिती बालकवींच्या काव्यातील सृष्टीसौंदर्य कधीच विद्रुप करित नाही. तर दु:खमय मनाला ती कशी भासतात याचे वर्णन त्यांनी "पाखरास" या रचनेत केले आहे:
               पाखरा, गाइले का तुला कधीही न कुणी
               नच अश्रु गाळिले कुणी वनी येवोनी
               निश्वास धावती सौख्यामागे सारे
               दु:खाचा वाली कुणा कुणीही न बा रे!
    हे पाखारु म्हणजे कवीने स्वत:साठी योजलेली प्रतिमा आहे. माणसांच्या वनात सारे सुखाच्या मागे पळतांना पाहून त्यांच्या कवीमनाला जगण्यातला व्यवहार खिन्न करतो. त्यांच्या या खिन्न मनाला भोवतालचा आनंद प्रसन्नता देत नाही. उलट मृत्युखेरीज या विषण्णमनस्थितीतून मुक्तता मिळणार नाही ही विकोपाची भावना या कवितेते  कवीने व्यक्त केली आहे. ह्रदयाचे स्पंदन थांबताच यातनाही संपुष्टात येतील हा भावाशय या रचनेत गुंफला आहे.      
             येईल एक परि धन्य दिवस सौख्याचा
             जो करिल तुझ्यासह अंत तुझ्या गीतांचा
             फिरवून फरारा गोफण तो झाडील
             काट्यांवर उपडे भग्न ह्रदय पाडील
             मग एकच धडकी, एकच अंतिम बोल
             बोलून तुझे हे जळते ह्रदय निवेल.
      बालकवीसारख्या संवेदनशील कवीला प्रेमाने भुरळ पाडली नाही तर नवलच. पण त्यांच्या काही पूर्ण काही अपूर्ण अशा एकूण दोनशे कवितांमधून त्यांची प्रेमकविता शोधणे अवघडच आहे. त्यांच्याेहाच कवितेतील प्रणय कुठे अल्लड कुठे अतृप्त आहे. देहाची आसक्ती त्यांच्या रचनेत कुठेच आढळून येत नाही. प्रेम हा विषय बालकवींच्या कवितेते वारंवार डोकावला असला तरी त्याला पूर्णत्व प्राप्त झालेले आढळत नाही. कदाचित निसर्गकविता हीच त्यांची प्रेमकविता असावी. "प्रेमाचे गाणे" या रचनेतून त्यांनी प्रेम व्यक्त केले ते असे:
            प्रेमावाचूनी सर्व सुने                  संध्या म्हणो कोणी
            जग भासे बापुडवाणे                  याते मी अक्षय मानी
            मोठ्या उल्हासे म्हणुनी                म्हणो कोणी ’ती भूल खरी’
            प्रेमाचे रचितो गाणी                   नाही मी म्हणणार परि
              आकाशी ते                           सौख्य मावळे
              जगी विलसते                         दु:ख कोसळे
              दिशात हसते                          उदास सगळे
           विश्व वेष्टिले प्रेमाने                     प्रेम वाटते परि दुणे    
           प्रेमावाचुनी सर्व सुने {१}                 प्रेमावाचुनी सर्व सुने {२}
                                                 
    बालकवींच्या कवितेवर कोणा एका विशेष कवीचा प्रभाव होता किंवा कुणाचे अनुकरण होते महणणे चुकीचे ठरेल. त्यांची कविता सर्वस्वी त्यांची होती. त्यांनी जे जे अनुभवले त्याचे सूर त्यांच्या शब्दातून उमटले. आपल्याच भावविश्वात जरी बालकवींची कविता गुरफटलेली होती, तरी त्यांना तत्कालीन परिस्थितीची जाण जागृत होती याचा प्रत्यय त्यांच्या "धर्मवीर" या रचनेत येतो.
              आद्य ॠषींनी जी केली तेजाची पूजा पहिली
              ती करणे ज्यां ज्यां लोका ते सारे सावध ऐका
              गर्जू द्या हिंदीस्तान, ऐकूनी भासे हे गान
              धर्मवीर हिंदीस्तान, देवाचा कलिजा प्राण
  "सृष्टीतील सौंदर्य उकलून दाखविण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. तारकांचे संगीत मला नेहमी ऐकू येते. आकाशाची शोभा आणि जलाशयाची गती, स्थिती यातून मला संदेश येतात ........... " असे बालकवी आपल्या मित्रांजवळ सांगत असे. बालकवींच्या कविता वाचतांना त्यांचा कविस्वभावाची प्रचिती शब्दाशब्दाला येते. बालकवींचे काव्यसामर्थ्य म्हणजे इतरांपेक्षा त्वरेने होणारा निसर्गातील सौंदर्यसाक्षात्कार. हा साक्षात्कार ते हळुवारपणे उकलुन सांगत. ते सांगताना त्यांच्या आत्यंतिक भावनावशता प्रत्ययास येते. त्यांचे मन अतिशय मृदु होते, एखाद्या निरागस बालकाप्रमाणे. अशी मृदु व निरागस व्यक्ति स्वप्नाळू वृत्तीची असतात. कवीच्या रचनेत कुठे कुठे नाजुकतेचा कोवळिकतेचा अतिरेक होतो असे वाटते. परन्तु रचना परत परत वाचल्यावर लक्षात येते की रचनेतील संवेदनशीलता-कोमलता कवितेचा आत्मा आहे, इथेच त्यांचे श्रेष्ठत्व आणि समर्थता सिद्ध होते. स्वप्नसृष्टीत गुंगुन कल्पनाविलसित रचना हेच कवीचे काव्यविशेष आणि वैशिष्ट्ये आहेत.
         बालकवी आणि त्यांची कविता मोजक्या शब्दात सांगणे खरच अवघड आहे. अनेकांनी त्यांच्या रचनांचा अभ्यास करुन ग्रंथनिर्मिती केली आहे. काव्याचा विषय कुठलाही असला तरी बालकवींच्या कवितेला निसर्ग एखाद्या वेलीसारखा बिलगुन असतो. बालकवींच्या संदर्भात उल्लेखनीय कविता, विशेष कविता वैगरे शब्द त्यांच्या काव्यापुढे थिटे वाटतात. सर्वच रचना सर्वोत्तम आहेत.
              स्वप्नीही स्वप्ने बघत, स्वप्नातच व्हावा अंत
              मरण्याचे स्वप्नही गोड, जगण्याचे स्वप्नही गोड
              भासाची सर्वही सुमने, चला चला चुंबित वदने
              होईल मग सर्वचि गोड, मरण गोड - जगणे गोड
  बालकवींचे हे शब्द खरे ठरलेत. त्यांचे स्नेही श्री सोनाळकर यांची तातडीने निघून येण्याची तार मिळाली, त्याच विचारांत तल्लीन झालेले बालकवी भादली स्टेशनजवळील पायवाटेवरुन चालत होते. आपल्याच विचारात ते इतके मग्न होते की मालगाडीचा गडग आवाजही त्यांना ऐकू आला नाही. रुळ ओलांडतांना मालगाडीचा धक्का लागून त्यांच्या प्राणपाखराने दिव्यत्वाकडे झेप घेतली. एका तल्लीन- तदृप अवस्थेत या निसर्गकवीची इतिश्री झाली.
          बालकवीच्या एका अपूर्ण पत्रातील काही वाक्ये :
"एक लहानसे पान घेतले तर त्याच्यावर वार्‍याच्या अनंत लहरी, सूर्याचे अनंत किरणे, बाष्पाच्या अनंत कणिका, बीजाने त्या अंगी दिलेली बाह्यपदार्थ संग्रहणाची शक्ती, वृक्षावर त्याचे झालेले परिणाम, फांदिला लागलेले आघात इ. अनेक अनंत संस्कार झाले आहेत. हाच किंवा याहिपेक्षा गहन विचार केला तर आपणास मनुष्यत्व व्यक्तित्वाची कल्पना येणार आहे."  

विनीता देशपांडे