|
ती स्वप्नामधील दुनिया,
आगळाली,मी आगळासा.
देहापल्याड जाऊनी मी,
प्रसवतो मम वेगळासा. ......॥१॥
ऊघडोनी आठवकुठार,
पसाभर घेऊनी विचार.
फ़ेकितो वारू ,होऊनी स्वार,
नव्या दुनियेत पापण्यांआड.....॥२॥
शब्दांची करूनी चित्रे,
मम जाणीव मजसी पूरे,
भोगण्या सुखदु:खांचे बाड,
मी जन्मतो पापण्यांआड. ......॥३॥
क्षणी भोगतो सुखे हरखतो,
झणी दु:खाने मी विव्हळतो
कधी मोदाने सुखे विहरतो,
कधी भयाने मी घाबरतो. ..॥४॥
कधी फ़ेडीतो घेणी देणी,
कधी उकलतो कूट कोडी,
कधी नात्यांमधे गुंततो
कधी कुणाशी मी तंडतो. ....॥५॥
मीच कर्ता मी करवीता,
स्वप्नदुनियेचा मी नियंता.
मनी वसे ते सत्य होतसे,
स्वप्नसाय ती देही पसरे......॥६॥
भोगताना भोग जाणीवा,
जागता जगी अजाणता
विखुरत जाती स्वप्नपाकळया,
बंद, पापण्यां आडची दुनिया. ..॥७॥
- अनुराग
|